कौशल्याची माळ ग्रामविकासाला
18-Oct-2023
Total Views |
मुंबई : “प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार उपलब्ध होईल,” असा विश्वास कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात तब्बल ५११ कौशल्यविकास केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याची माहिती मंत्री लोढा यांनी मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांना दिली.
कौशल्य विकासाला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने युवकांसाठी विशेष योजनांची आखणी केली आहे. केंद्राच्या पावलावरपाऊल ठेवून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावत युवकांना कौशल्यक्षम बनवण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. त्यातूनच प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळा ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे दुपारी ४ वाजता होणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी फायदेशीर असलेली ही योजना सुरुवातीला ५११ केंद्रांमध्ये सुरू केली जात आहे. कालांतराने आणखी ५०० ठिकाणी केंद्र सुरू करण्यात येईल. कौशल्यविकास केंद्रांमध्ये व्हर्चुअल क्लासरूम, अत्याधुनिक लॅबसह सुसज्जता असून या ठिकाणी ५० विद्यार्थी क्षमतेच्या दोन बॅच चालवल्या जातील. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
-मंगलप्रभात लोढा, कौशल्यविकास मंत्री