खिचडी घोटाळ्याचं उद्धव ठाकरे कनेक्शन? किरीट सोमय्यांचा आरोप
18-Oct-2023
Total Views |
(Uddhav Thackeray & Kirit Somaiyya)
मुंबई : कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील आठ ठिकाणी ही छापेमारी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जम्बो कोविड केंद्राच्या खिचडी पुरवठादारांशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेने खिचडीचे कंत्राट दिलेल्या कंपन्यांवर ईडीने छापेमारी केली आहे. महापालिका उपाआयुक्त संगिता हसनाळे, आदित्य ठाकरेंचे मित्र सुरज चव्हाण यांच्यासह अर्धा डझनहून अधिक ठिकाणी छापेमारी सुरु करण्यात आली आहे.
यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, ईडीचा महापालिका उपाआयुक्त संगिता हसनाळे, आदित्य ठाकरेंचे मित्र सुरज चव्हाण आणि अर्धा डझनहून अधिक ठिकाणी छापे सुरु आहेत. १३२ कोटीच्या घोटाळ्याचे पैसे संजय राऊतांची मुलगी, त्यांचे भाऊ आणि त्यांचे मित्र अमोल गजानन किर्तीकरच्या खात्यात गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब हिशेब तर द्यावाच लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
काय आहे खिचडी घोटोळा प्रकरण?
कोरोना काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मुंबई महापालिकेने या मजुरांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना दिले होते. तसेच या मजुरांना २५ लाख रुपयांचे खिचडीचे पाकीट पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ८.१० कोटी रुपये मिळाले होते. त्यातील ४ कोटी रुपये बोगस कंपन्यांना ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात आला होता. या घोटाळ्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या मित्रपरिवाराचा संबंध असल्याचेही ते म्हणाले होते.