आज पुन्हा एकदा कोविड काळातील मुंबई महापालिकेकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याची बातमी आली. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. आणि उबाठा गटाचे आदित्य ठाकरेंशी संबधित एका व्यक्तीवर कोविड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने धाड टाकली.आणि आता पुढचं नाव कोणाचं? कोण आहे कोविड घोटाळ्यातील पुढचा आरोपी? असे बरेच प्रश्न निर्माण झाले.
मागच्या २५ वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता आहे. याकाळात महापालिकेत गैरव्यवहार होत असल्याचे अनेक आरोप करण्यात आले. मागच्या काही काळात या आरोपांमध्ये वाढ झाली. किंवा आपण असं म्हणू शकतो की मागच्या काही काळात महानगरपालिकेतील अनेक गैरव्यवहार समोर आलेत. मात्र त्यावेळी वेगवेगळे घोटाळे करत मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम काही लोकांकडून थाबलं नाही, त्यातील एक घोटाळ्याचे प्रकरण आता उघडकीस आलेय.
मुंबई महानगरपालिकेने रोमिल छेडा यांना राणीच्या बागेतील 'पेंग्विन'चे ,कोविड हॉस्पिटलमधील 'ऑक्सिजन प्लांट' चे असे १७ विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. पंरतु आश्चर्यांची बाब म्हणजे रोमिल छेडा ह्यांच्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने आणि जयपूर हॉस्पिटलच्या राजस्थान सरकारने ही ब्लॅक लिस्ट केलं होत. कंपनीच्या माध्यमातून रोमिल छेडा यांनी १३८ कोटींचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा करण्याचे पैसे घेतले आणि फक्त ३८ कोटी किंमतीचा ऑक्सिजन प्लांट पुरवठा केला. या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरु केली. दरम्यान ईडीने सर्चरेडला सुरुवात केली.
पण आता आयकर विभागाची इन्ट्री ह्या कोविड घोटळ्यातील प्रकरणात झालीय. कारण ह्या घोटाळ्यासंबधित व्यक्तिच्या घरावर आयकर विभागाने ही छापेमारी केलीय. तसेच एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या छापेमारीत रोमिल छेडा यांच्या फर्मने एका करारात २० कोटी रुपयांचे सिलिंडर खरेदी केले आणि ८० कोटी रुपयांचे बिल दिले, ज्यामुळे बीएमसीचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच रोमिल छेडा यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली तेव्हा त्यांच्या घरातून १.२ कोटी रुपये रोख जप्त केले.
आता जाणून घेऊ कोण आहेत रोमिल छेडा? रोमिल छेडा हे एक कंत्राटदार आहेत. कोविड केंद्रांना खुर्च्या, पलंग आणि इतर वस्तू त्यांनी कोविड काळात पुरवल्या होत्या. पण ह्या वस्तु पुरवताना त्यांनी कोट्यवधी रुपयांची फुगलेली बिले सादर केली , असा आरोप ईडीच्या छापेमारीतून समोर आला आहे. दरम्यान कंत्राटदार राहुल गोम्स यांना ही कोविड जंबो केंद्रे बांधण्यासाठी बीएमसीने १५० कोटी रुपये दिले होते, असे ईडीने माहिती दिली आहे. त्याचबरोबर ईडीच्या छापेमारीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
त्यामुळे उंदीर घोटाळा, आश्रय घोटाळा, पिण्याच्या पाण्याचा घोटाळा, इलेक्ट्रिक बस घोटाळा , मृतांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा, खिचडी घोटाळा आणि आता ऑक्सिजन घोटाळ्यामुळे पुढे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोपामुळे दि. ५ ऑगस्ट रोजी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम ४२० आणि कलम १२० ब या दोन कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याआधी कोविड जंबो सेंटरचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली होती.
तसेच मध्यांतरी ईडीने जारी केलेल्या ८ हजार पानांच्या आरोपपत्रात कोविड जंबो सेंटरचे बोगस कागदपत्रे दाखल करून कंत्राट मिळवल्यानंतर कंपनीच्या भागीदारांनी BMC अधिकारी आणि इतर लोकांमध्ये ६० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने वाटप करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यावेळी संजय शहा आणि राजीव साळुंखे ,कर्मचारी अरविंद सिंग ,हेमंत गुप्ता , दहिसर केंद्राचे डीन डॉ. किशोर बिसुरे आणि संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांची नावे ईडीच्या आरोप पत्रात होती. आणि आता आयकर विभागाच्या छाप्यानंतर रोमिल छेडा ह्यांचे ऑक्सिजन घोटाळ्यासाठी नाव समोर आलंय. त्यामुळे आता लोकांच्या श्वासावर ही भ्रष्टाचाराची टांगती तलवार लटकताना दिसतेय, असे म्हणायला हरकत नाही.