अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या स्पर्धेत महावितरणच्या संघास विजेतेपद

    17-Oct-2023
Total Views |
All India Electrical Sports Control Board Competition

मुंबई :
पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.

दिनांक १३ व १४ ऑक्टोबर या कालावधीत पंजाबातील पटियाला या शहरात आयोजित या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघाने एकूण पाच सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेचे आयोजन पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लि. यांनी केले होते.

या स्पर्धेत महावितरणच्या गुलाबसिंग वसावे यांनी १०० मीटर, २०० मीटर धावणे व ४०० मीटर अडथळा स्पर्धेत तीन सुवर्ण पदके पटकावली तर सचिन चव्हाण यांनी भाला फेक व प्रवीण बोरावके यांनी गोळा फेक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

धावण्याच्या ४x१०० रिले स्पर्धेत गुलाबसिंग वसावे, संभाजी जाधव, साईनाथ मसने व शुभम निंबाळकर यांनी रौप्यपदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे धावण्याच्या ४x ४०० रिले स्पर्धेत गुलाबसिंग वसावे, विजय भारे, शुभम निंबाळकर व प्रदीप वंजारी यांनी रौप्यपदक प्राप्त केले. तसेच विजय भारे यांनी ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.

या स्पर्धेत हनमंत कदम यांनी हातोडा फेक स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले तर साईनाथ मसने यांनी ११० मीटर अडथळा स्पर्धेत, हनमंत कदम यांनी गोळाफेक, साईनाथ मसने यांनी १०० मीटर धावणे व सोमनाथ कंठीकर यांनी लांब उडी या स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.

या स्पर्धेत महावितरणचा १७ सदस्यीय संघ सहभागी झाला होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रतिक वाईकर तर संघ व्यवस्थापक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांनी काम पाहिले.