मुंबई : “देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे. तसेच,पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ’छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे,”असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात नुकत्याच आयोजित बैठकीत मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारी, डॉ. उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. “क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवादरम्यान खेळाडूंना विविध सोईसुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे,” अशा सूचनादेखील पालकमंत्री लोढा यांनी यावेळी केल्या.
आपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होऊ नयेत, यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो, दंड बैठक, मल्लखांब, लंगडी, विटी-दांडू, लगोरी, अखाडा कुस्ती, मानवी मनोरा (पिरॅमिड), रस्सीखेच, दोरीउडी, सूर्यनमस्कार, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव, तलवार बाजी, ढाल-तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करून 15 दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे.
- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर