मुंबई : वर्षानुवर्षे परस्परांचे राजकीय-वैचारिक विरोधक असलेली समाजवादी आणि शिवसेनेची मंडळी एका राजकीय व्यासपीठावर एकत्र येत आहेत. मुंबईत होणार्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे समाजवादी पक्षांच्या नेत्यांसह एकूण १५० विविध मंडळींना भेटणार आहेत. याच भेटीगाठीनंतर उबाठा गट आणि समाजवादी पक्षात युतीची घोषणा होणार असल्याचे समोर आले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. ”ज्या समाजवादी पक्षाने रामभक्तांच्या छातीवर गोळ्या चालवल्या, त्यांच्या सोबतच उद्धव ठाकरे यांची युती म्हणजे रामभक्तांचा अपमान आहे,” अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली आहे.
उबाठा गट आणि समाजवादीमध्ये होणार्या युतीबद्दल काय वाटतं?
जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि समाजवादी पक्षात युती होणार ही बातमी समोर आली, तेव्हापासून बाळासाहेबांचे चाहते अस्वस्थ असतील. ज्या समाजवादी मंडळींनी रामभक्तांवर बेछूट गोळ्या चालवल्या, ज्या चळवळीला बाळासाहेबांनी कायम विरोध केला, त्याच मंडळींसोबत बाळासाहेबांचा मुलगा युती करत असेल, तर हिंदुत्व आणि बाळासाहेबांसाठी हा काळा दिवस असेल. मुंबई आणि लगतच्या भागात काही कृत्य करण्याचे या मंडळींचे मनसुबे हाणून पाडण्याचे काम स्व. बाळासाहेबांनी आयुष्यभर केले. पण, त्यांचा पुत्रच जर समाजवादी लोकांच्या मांडीवर जाऊन बसत असेल तर उद्घव ठाकरेंना बाळासाहेबांचा मुलगा म्हणवून घेण्याचा पवित्र ’मातोश्री’वर राहण्याचा काही एक अधिकार नाही.
उद्धव ठाकरेंनी गेल्या साडेचार वर्षात भिन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत केलेल्या युतीची कारणे असावीत ? राजकीय प्रयोग की नव्या पटाची मांडणी ?
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिले असून आता त्यांचा डोळा जिहादी मतांवर आणि जिहादी पुरस्कारावर आहे. जेव्हा सनातन धर्मावर टीका झाली, तेव्हा ते मुग गिळून गप्प बसले. ममता बनर्जींच्या राज्यात हिंदुंवर होणारे अन्याय - शर्जील उस्मानीबाबत ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेली बोटचेपी भूमिका, काँग्रेसच्या भूमिका यावर ठाकरे शांत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही हिंदुंवर अन्याय झाला तर डरकाळी फोडून त्याला वाचा फोडणारा वाघ बाळासाहेब ठाकरे होते. काश्मीरमधील निर्वासित पंडितांना महाराष्ट्रात एक टक्का आरक्षणही देण्याचे श्रेय बाळासाहेबांना जाते. उलटपक्षी त्यांचे पुत्र उद्घव ठाकरे हे जिहादी विचारांना बळ देत असून भविष्यात हिंदूंना होणार्या अत्याचाराला तेच जबाबदार असणार आहेत. समाजावर होणारे आक्रमण शांतपणे आपण बघत असू तर आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. ठाकरे आणि त्यांची सहकारी मंडळी आज निमुटपणे हिंदुंवर होणारे अन्याय अत्याचार बघत आहेत. हिंदूंनी या मंडळींना आपल्या दरातही उभे करू नये.
प्रश्न : काँग्रेसने पॅलेस्टाईनच्या बाबत घेतलेल्या भूमिकेवर उबाठा गटाने ठाम भूमिका घेतल्याचे दिसत नाही. काँग्रेसच्या भूमिकेला उबाठाचे समर्थन आहे असं वाटतं का ?
उत्तर : काँग्रेसने कधीही दहशतवादविरोधी प्रखर भूमिका घेतलेली नाही, किंबहुना काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दहशतवादाला हिंदू समाजाशी जोडून भगवा दहशतवाद हा शब्द उच्चारला होता. काँग्रेस आणि त्याचे सहयोगी पक्ष जिहादी प्रवृत्तीला सहकार्य असून जे काम हमास पॅलेस्टाईनमध्ये करत आहे, त्याचे अनुकरण काँग्रेस भारतात करत आहे. काँग्रेसच्याच शासनात स्फोट आणि दहशतवादी कारवाया झाल्या, ज्या गेल्या 9 वर्षांत कधीही झाल्या नाहीत ते मोदी सरकारच श्रेय आहे. काँग्रेस केवळ सत्तेसाठी देशविरोधी भूमिका घेत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या देशविरोधी भूमिकेला समर्थन आहे.
प्रश्न : गरबा महोत्सवात केवळ हिंदूंना प्रवेश देण्याची मागणी आपण सकल हिंदू समाजासह केली. यावर आयोजक सकारात्मक भूमिका घेतील का ?
उत्तर : आयोजकांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे कारण हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. अशा कार्यक्रमातून अत्यंत नियोजनबद्धरित्या लव जिहादचे षड्यंत्र रचले जात आहे. अशा कार्यक्रमात आपले लोक घुसवून हिंदू महिला मुलींना कसे फसवायचे याचे व्यवस्थित प्रशिक्षण त्या मुलांना दिले जात असून या कामात मोठ्या प्रमाणात पैसे देखील पुरवले जात आहेत. सकल हिंदू समाज आणि इतर संघटनांसह आम्ही आयोजकांना आवाहन केले असून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, आपल्या मुली सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाउल उचलणे गरजेचे आहे. ज्यांना गरबा महोत्सवात यायचे आहे, त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, आम्ही त्यांचे धर्मांतर करू. गरबा महोत्सवात केवळ हिंदूंना प्रवेश देण्यात यावी ही आमची भूमिका आहे आणि ती कायम राहील.