मुंबई : शिवसेना हातून गेल्यानंतर आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे अनेक प्रकारची राजकीय समीकरणे जुळवताना दिसत आहेत. नैसर्गिक मित्र भाजपशी असलेली युती तोडून महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यापासूनच ठाकरेंच्या वैचारिक घसरणीला सुरुवात झाली होती. त्यातच लोकसभेसाठी ’इंडी’ आघाडी बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पराभवाचे मांडे खाणार्या विरोधकांच्या एकीत फूट पडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरे ‘इंडी’ आघाडीला सोडचिठ्ठी देण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसत असून ठाकरेंची समाजवादी मंडळींसोबत युती करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे महायुती-‘इंडी’ आघाडीसोबतच आता आणखी एक राजकीय समीकरण राज्यात दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार, उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गट आणि समाजवादी संघटनांसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. रविवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ‘एमआयजी क्लब’ येथे समाजवादी पक्ष आणि संबंधित संघटनांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळी दोन्ही घटकांमध्ये युतीची घोषणा होणार असल्याचेही जवळपास निश्चित झाले आहे. यापूर्वी उबाठा सेनेने वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड या टोकाचा वैचारिक विरोध असणार्या संघटनांसोबत युती करून राजकारणात काहीही शक्य आहे, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते.