इस्रायल-‘हमास’च्या संघर्षानंतर भारतविरोधी शक्तींनीही बेटकुळ्या फुगवण्यास सुरुवात केल्याचे दिसते. मग पाकिस्तानी असो वा खलिस्तानी, त्यांनी भारतालाही ‘हमास’सारखा खुनी हल्ला सहन करावा लागेल, अशी फुटकळ धमकी देण्याचे उद्योग केले. म्हणा, अशा धमक्यांना मोदी सरकारने यापूर्वीही कधी भीक घातली नव्हती आणि भविष्यातही हे धमकी देणारे ‘अज्ञातां’च्या हस्ते कधी यमसदनी धाडले जातील, हेही सांगणे अवघडच. पण, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशीच खलिस्तानींची सध्याची गत!
‘हमास’च्या या खुनी हल्ल्याचा आनंदोत्सव साजरा करत खलिस्तानवाद्यांनी नाहक भारताला छेडण्याचा उद्योग केला. ‘सीख्ज फॉर जस्टिस’ अर्थात ‘एसएफजे’ या भारतात बंदी असलेल्या संघटनेचा खलिस्तानी म्होरक्या गुरपतवंतसिंग पन्नूने ‘बुलेट की बॅलेट’ असा फिल्मी स्टाईल प्रश्न उपस्थित करत, भारत सरकारविरोधात गरळ ओकणारा एक हास्यास्पद व्हिडिओ जारी केला. हा व्हिडिओ तुफान व्हायरलही झाला. पण, पन्नूच्या धमकीमुळे नव्हे, तर पन्नूसुद्धा कसा पप्पूच आहे, असे म्हणत जगभरातील नेटकर्यांनी त्याची मनसोक्त खिल्ली उडवली. कारण, एखाद्या हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकालाही लाजवेल, अशा सनसनाटी शैलीत पन्नू भारताविरोधी गरळ ओकत होता. विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी पन्नूने आपल्या या व्हिडिओमध्ये पंजाबवरील ताबा भारताने न सोडल्यास जसा पॅलेस्टाईनच्या हक्कांसाठी ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला केला, तसाच हल्ला भारतावरही करू, म्हणत फुकाची आगपाखड केली.
पंजाबची थेट पॅलेस्टाईनशी तुलना करून पन्नूने खलिस्तानवाद्यांची बुद्धीच मुळात पंगू असल्याचे दाखवून दिले. कारण, पॅलेस्टाईन आणि पंजाबमधील स्थितीमध्ये जमीन-आसमानचा फरक. पण, फक्त यानिमित्ताने भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा मुद्दाम मलीन करण्यासाठी पन्नूने केलेला हा सुमार प्रयत्न. निज्जरच्या प्रकरणावरून कॅनडा आणि पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांनंतरही बहुतांशी देशांनी कॅनडाला सामंजस्याचा सल्ला देत भारताचीच बाजू घेतली होती. परंतु, पन्नूसारख्यांच्या स्वतंत्र खलिस्तानची खोटी आशा बाळगून वर्षानुवर्षे पाकिस्तानची चाकरी करणार्यांना भारताच्या वाढत्या ताकदीने आणि दबदब्यानेच धडकी भरली. त्यात निज्जरबरोबरच आणखीही खलिस्तानींची कॅनडा, युकेमध्ये हत्या झाल्यानंतर पुढचा नंबर आपलाच असू शकतो, याची पन्नूलाही खात्री पटलेली दिसते. म्हणूनच पन्नूची जीभ सारखी वळवळत असून, ‘हमास’सारख्या हल्ल्याची भारताला धमकी देण्याचा भ्याडपणा त्याने केला.
एवढ्यावरच या पुचाट पन्नूची पप्पूगिरी थांबली नाही. पूर्वी कॅनडामधील भारतीय दूतावासातील अधिकार्यांचे पोस्टर्स झळकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी खलिस्तानवाद्यांनी दिली होती. आता कॅनडाच्या भूमीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचेही असेच पोस्टर्स झळकावत त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यापर्यंत, या खलिस्तानवाद्यांची मजल गेली. या घटनेची गंभीर दखल घेत, भारताने कॅनडा सरकारला फटकारले आहेत. शिवाय परराष्ट्रमंत्र्यांच्या सुरक्षेतही खबरदारीचा उपाय म्हणून वाढ करण्यात आली आहे.तसेच दि. २१ ऑक्टोबरला खलिस्तानी आणि पॅलेस्टिनींनी मिळून ‘जी ७’ राष्ट्रातील भारतीय दूतावासांवर हल्ला करावा, असे आवाहनदेखील पन्नूने केले.
त्यामुळे पॅलेस्टाईनच्या मुद्द्याशी, रोषाशी उगाच खलिस्तानचा ओढूनताणून संबंध जोडून, लोकांची माथी भडकाविण्याचाच हा प्रयत्न. पण, यावरून हा पन्नू केवळ पप्पूच नाही, तर त्याला पॅलेस्टाईनबाबत भारतीय परराष्ट्र धोरण नेमके काय, याचीही साधी माहिती नाही. प्रारंभीपासूनच भारत सरकारची भूमिका ही पॅलेस्टाईन या स्वतंत्र राष्ट्रासाठी अनुकूल राहिली आहे. नुकताच त्या भूमिकेचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही पुनरुच्चार केला. पण, भारताचे समर्थन पॅलेस्टाईनला आहे, दहशतवादाचा नंगानाच करणार्या ‘हमास’ला नव्हे. पण, असो. हे कळण्याइतपही पन्नूच्या मेंदूची पत नाही, हेच पुनश्च सिद्ध झाले.खलिस्तानी पन्नूला पंजाबचा एवढाच पुळका असेल, तर केवळ भारतातील पंजाबच कशाला, पाकिस्तानातील पंजाबवरही तितक्याच अधिकारवाणीने हक्क सांगावा आणि स्वतःचा खेळ संपत नाही, तोवर असाच खयाली खलिस्तानीचा खुळखुळा वाजवत बसावा!