कशासाठी? पोटासाठी! शात्-अल्-अरबसाठी!

    13-Oct-2023
Total Views |
Iraq, Iran to build bridge on Shatt Al-Arab linking both countries


अवघ्या ३२ किमीच्या या जोडणीमुळे एकीकडे तुर्कस्तान, सीरिया, रशिया, अझरबैजान, तर दुसरीकडे सौदी अरेबिया, कुवेत, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान एवढ्या विस्तृत प्रदेशातली अनेक व्यापारी शहरं बसरा आणि आबादानशी म्हणजेच इराणच्या आखाताशी किंवा पर्यायाने हिंदी महासागराशी जोडली जाणार आहेत.


आज आपण ज्या देशाला तुर्कस्तान म्हणून ओळखतो, तो खरं म्हणजे तुर्कवंशीय लोकांचा मूळ देशच नव्हे. त्याच मूळ नाव अनातोलिया. इसवी सनाच्या ११व्या शतकामध्ये मध्य आशियातील उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान इत्यादी तुर्क वंशीय देशांमधून पश्चिमेकडे स्थलांतर करणार्‍या सेल्जुक तुर्क टोळ्यांनी अनातोलिया व्यापला. तिथल्या मूळ ग्रीक भाषा बोलणार्‍या लोकांना हाकलून दिलं किंवा बाटवून गुलाम बनवलं. अनातोलियाचा तुर्कस्तान बनला.या तुर्कस्तानात टॉरस नावाची एक विशाल पर्वतरांग आहे. या रांगेतून दोन महान नद्या उगम पावतात. एक तैग्रिस आणि दुसरी युफ्रेटिस. या नद्यांच्या खोर्‍यांमध्ये विविध सभ्यता भरभराटल्या. असीरियन, बाबिलोनियन, मेसोपोटेमियन इत्यादी. सध्या या खोर्‍यांमुळे बनलेल्या देशाला म्हणतात इराक.

इराक देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येत, या दोन्ही नद्यांचा संगम होतो, त्या ठिकाणाला म्हणतात ‘अल् कर्ना’ आणि तिथपासून एकत्रितपणे पुढे वाहत जाणार्‍या जलप्रवाहाला म्हणतात ‘शात्-अल्-अरब’ म्हणजे ‘वेगवान नदी.’ संगमाच्या ठिकाणी साधारण २५० फूट रुंद असणारी ही नदी पुढच्या २०० किमीच्या प्रवासात आणखी रुंद होत जाते. बसरा या अत्यंत प्राचीन आणि विख्यात बंदराजवळ ती इराणच्या आखातात विलीन होते, तेव्हा तिचं मुख २ हजार, ६०० फूट रुंद झालेलं असतं.हीच स्थिती आपण वेगळ्या शब्दांत अशीही मांडू शकतो की, इराणच्या आखातात शात्-अल्-अरबच्या मुखापाशी बसरा हे प्रख्यात बंदर वसलेले आहे. भारतात मुसलमानी राजवटी असताना बसर्‍याला अतोनात महत्त्व होतं. कारण, चीनपासून युरोपकडे जाणार्‍या रेशीम मार्गाला जवळच्या, अशा बंदरांपैकी बसरा हे एक बंदर होते. शिवाय खुद्द बसरा परिसरातल्या सागरातच सापडणारा नैसर्गिक मोती हा संपूर्ण जगात ’बसरा मोती’ याच नावाने प्रसिद्ध होता.

शात्-अल्-अरब नदी आणखीही काही कारणांनी प्रसिद्ध होती. ती इराक आणि इराण या दोन देशांमधली नैसर्गिक सरहद्द होती. शात्-अल्-अरबच्या पूर्वेला इराणी किंवा पर्शियन वंशाचे शिया पंथीय मुसलमान होते, आहेत. शात्-अल्-अरबच्या पश्चिमेला अरब वंशाचे सुन्नी पंथीय मुसलमान होते, आहेत. प्राचीन काळी अरब आणि इराणी दोघेही अत्यंत ज्ञानसंपन्न, समृद्ध आणि भरभराटलेले होते. पण, इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबस्तानात इस्लामचा उदय झाला आणि अरब लोक संपूर्ण जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगू लागले. ती त्यांनी बर्‍यापैकी साध्यसुद्धा केली. इ. सन ६३३ ते ६५६ या अवघ्या २३ वर्षांच्या काळात अरबांनी शेजारचा इराण जिंकला नि पूर्ण बाटवलासुद्धा; पण लढाया, कत्तली, बाटवाबाटवी, बायका पळवणं वगैरे करण्याच्या छंदाने अरब हे ज्ञानविज्ञान, भाषा, सभ्यता या क्षेत्रांत मागे राहिले नि इराणी हे मुसलमान बनूनसुद्धा यांत श्रेष्ठ राहिले. म्हणून तर भारतातल्या सुलतानांचा पंथ सुन्नी असला नि ते सारखे अरबस्तानातल्या मक्का-मदिनेच्या आठवणी काढत असले, तरी त्यांच्या राज्यकारभाराची अधिकृत भाषा ही फारसी म्हणजेच पर्शियन किंवा इराणी होती.

पुढे तर अरबांनी ज्यांना जिंकून, बाटवून गुलाम बनवलं अशा तुर्कांनी आपल्या मालक अरबांनाच जिंकलं आणि आपल्या विशाल साम्राज्यातले मांडलिक बनवून टाकलं. इसवी सनाच्या १७व्या शतकात मुसलमानी जगतात तीन विशाल साम्राज्य होती. पहिलं कॉन्स्टन्टिनोपल उर्फ इस्तंबूलचं तुर्की साम्राज्य. दुसरे काजविन किंवा तब्रीझ, या राजधानीतून राज्य करणारं सफाविद घराण्याचं पर्शियन साम्राज्य आणि तिसरं दिल्लीचं मुघल साम्राज्य.जसं शात्-अल्-अरबच्या पश्चिम तीरावर म्हणजे इराकच्या हद्दीत बसरा हे प्रख्यात बंदर, तसंच पूर्व तीरावरचं आबादान, हेही इराणच्या हद्दीतलं तितकंच प्राचीन आणि प्रख्यात बंदर. इसवी सनाच्या १९व्या शतकाच्या अखेरीस ‘ऑटोमोबाईल इंजिन’चा शोध लागला. त्या इंजिनाचा वापर करून बनवलेलं मोटार, हे स्वयंचलित वाहन बाजारात आलं आणि इतिहासाने अक्षरशः एक प्रचंड वळण घेतलं. या नव्या इंजिनसाठी आगबोट किंवा आगगाडीप्रमाणे दगडी कोळसा हे इंधन चालणार नव्हतं. त्याला हवं होतं तेल.

म्हणजेच नव्या, आगामी काळातल्या वेगवान व्यापारी नि लष्करी वाहतुकीसाठी मोटारी, ट्रक्स या वाहनांसाठी भरपूर तेल लागणार होतं. हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात आला; अर्थातच व्यापारी डोकं असलेल्या इंग्रजांच्या. मग जगभरात हे तेल कुठे-कुठे उपलब्ध होईल? तर मध्य-पूर्वेत, अरबस्तानच्या वाळवंटात नि अवतीभवती. मग इंग्रजांनी हर प्रयत्नांनी तुर्की साम्राज्याचे तुकडे उडवून शक्य तितकी मध्य-पूर्व आपल्या हाताखाली घातली.या घालमेलींमधून बसरा आणि आबादान या बंदरांना नवी ओळख मिळाली. इराक आणि इराण या देशांमधलं तेल जगभरात वाहून नेणारी आणि त्या बदल्यात त्या दोन्ही देशांना अमाप परकीय चलन मिळवून देणारी आधुनिक व्यापार केंद्रे.

आता आधुनिक व्यापार केंद्र म्हटल्यावर तिथे रेल्वे मार्ग हवाच. गंमत पाहा कशी ती! आधुनिक कालपुरूष जणू काही इंग्लंडवर प्रसन्न होता. आगबोटीप्रमाणे आगगाडी हे आधुनिक साधनही इंग्लंडमध्येच सर्वप्रथम लोखंडी रुळांवरून धावलं. दि. २६ सप्टेंबर १८२५ या दिवशी पहिली रेल्वे गाडी इंग्लंडात स्कॉकटन् ते डार्लिंग्टन मार्गावर धावली. १८३० साली अमेरिकेत आणि फ्रान्समध्ये रेल्वे सुरू झाली. पाठोपाठ सर्वच युरोपीय देशांमध्ये रेल्वे आली. भारताचं भाग्य थोर म्हणून त्याला जगन्नाथ शंकरशेट उर्फ नाना हा द्रष्टा पुरूष लाभला. नानांनी हर प्रयत्न करून भारतात रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव लॉर्ड डलहौसीच्या गळ्याखाली उतरवला. दि. १६ एप्रिल १८५३ या दिवशी भारतातलीच नव्हे, तर संपूर्ण आशिया खंडातली पहिली रेल्वे मुंंबईत धावली.१८५८ साली इंग्रजांनी तुर्कस्तानात पहिला रेल्वे मार्ग बांधला. अरबस्तानात शिरकाव करून तिथे रेल्वे बांधणं; मात्र त्यांना साध्य झालं नाही, ते काम आणखी ५० वर्षांनी म्हणजे १९०८ साली स्वतः तुर्कांनीच केलं, त्यांनी दमास्कस ते मदिना असा रेल्वेमार्ग बांधला, त्याला नाव मिळालं ‘हेजाझ रेल्वे.’

पुढच्या काळात इंग्रजांनी, फे्ंरचांनी आणि जर्मनांनी मध्य-पूर्वेतल्या किंवा भूमध्य समुद्राकाठच्या अरब देशांमध्ये म्हणजे इराक, सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन आणि इजिप्त ते मोरोक्को या परिसरांत अनेक छोटे-मोठे रेल्वे मार्ग उभारले, साधारणपणे ते मुख्य बंदर आणि अंतर्भागातली व्यापारी शहरं यांना जोडणारे होते; पण युरोपीय देश, अमेरिका किंवा भारताप्रमाणे रेल्वेचं फार मोठं जाळं मात्र या देशांमध्ये पसरलं नाही.दुसर्‍या महायुद्धानंतर अरब देशांना आपल्या तेलाची खरी शक्ती समजली. मग त्यांनी आपली संघटना बनवून, तेलाच्या किमती वारंवार चढवून अवघ्या जगाला हैराण करून सोडलं. या काळात प्रचंड टनभाराचे राक्षसी टँकर्स त्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी सज्ज अशी अत्याधुनिक बंदर यंत्रणा, अशी जलमार्गी व्यापारी वाहतूक वाढली. विमान वाहतूकही भरपूर वाढली. रेल्वे वाहतूक अगदी आफ्रिकेतल्या गरीब आणि मागास देशांमध्येही वाढली. पण, अरब देशांमध्ये मात्र म्हणावी तशी वाढली नाही. इराणचं आबादान आणि खुर्रमशहर हे नवं बंदर; तशी इराकचं बसरा आणि अल् फॉ ही नवं बंदरंही आता नुसतीच वाहतुकीची बंदरं राहिलेली नसून, फार मोठी तेलशुद्धीकरण केंद्र आहेत.

बसर्‍याहून इराकच्या अंतर्भागात जाणारी आणि आबादानहून इराणच्या अंतर्भागात जाणारी रेल्वे आहे. पण, १९८०चं इराक-इराणं युद्ध, १९९१चं कुवेत प्रश्नावरून झालेलं पहिलं आखाती युद्ध आणि २००३ पासून आजपर्यंत सुरूच असलेली आखातातली तणावपूर्ण स्थिती, यामुळे हे रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले गेलेले नव्हते. नितांत आवश्यकता असूनही जोडले गेलेले नव्हते.गेल्या महिन्यात म्हणजे दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी बसरा इथे एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला. गेल्या कित्येक शतकांचं शत्रुत्व बाजूला ठेवून इराण आणि इराक एकत्र आले. इराकचे पंतप्रधान मुहम्मद-अल- सुदानी आणि इराणचे उपराष्ट्राध्यक्ष मुहम्मद मुखबीर यांनी बसरा इथे एका कार्यक्रमात बसरा-आबादान रेल्वेमार्ग उभारणीचा पायाभरणी समारंभ केला. हा मार्ग १८ महिन्यांत पूर्ण व्हायचा आहे. काळ कितीही पुढे-बिढे गेला तरी सर्वसामान्य जनतेला धर्माचीच भाषा पटकन कळते. यामुळे इराणचा प्रवक्ता आनंद व्यक्त करताना म्हणाला की, “हा मार्ग अवघ्या ३२ किमी असणार आहे. पण, त्यामुळे आम्हाला करबला आणि नजफ ही इराकची शहर जवळ येणार आहेत.”

मुहम्मद पैगंबरांचे नातू हसन आणि हुसेन हे यादवी युद्धात मारले गेले होते. त्यांना मानणार्‍या पैगंबर अनुयायांनी नंतर शिया हा वेगळा पंथ काढला. करबला आणि नजफ या इराकच्या अंतर्भागातल्या शहरांमध्ये हसन-हुसेनशी संबंधित शियापंथीय पवित्र स्थाने आहेत. इराण शिया आहे. म्हणजे आता इराणी भाविक गाडी न बदलता आबादानहून थेट करबलापर्यंत जाऊ शकतील. सर्वसामान्यांना हेच पटकन कळतं आणि आवडतं.अवघ्या ३२ किमीच्या या जोडणीमुळे एकीकडे तुर्कस्तान, सीरिया, रशिया, अझरबैजान, तर दुसरीकडे सौदी अरेबिया, कुवेत, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान एवढ्या विस्तृत प्रदेशातली अनेक व्यापारी शहरं बसरा आणि आबादानशी म्हणजेच इराणच्या आखाताशी किंवा पर्यायाने हिंदी महासागराशी जोडली जाणार आहेत. परंपरागत हाडवैर, बंड, लढाया, आचरट महत्त्वाकांक्षा इत्यादी आड न येता, हा रेल्वेमार्ग जर प्रत्यक्षात उतरला आणि सुरळीत चालू राहिला, तर जागतिक व्यापार क्षेत्रात खरोखरच एक नवं पर्व सुरू होईल. तसं ते व्हावे, अशी आशा आपण करुया.



-मल्हार कृष्ण गोखले