अजितदादांनी केलेल्या बंडामुळे पुरत्या घायाळ झालेल्या पवारकन्येने भाजपबरोबर संघावरही नुकताच निशाणा साधला. अजितदादांवर टीका करताना सुप्रियाताईंनी थेट संघावर टिप्पणी करून आपल्या वैचारिक कुवतीचेच दर्शन घडविले. “हेडगेवारांचे नाव घेऊन मते मिळणार नाहीत. म्हणून काही लोक यशवंतराव चव्हाणांचे नाव घेत आहेत,” असा जावईशोध ताईंनी लावला. अहो ताई, हेडगेवार असोत किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी असोत यशवंतराव चव्हाण असोत किंवा बाळासाहेब ठाकरे ही सर्वच मंडळी मतदानापेक्षा कायमच राष्ट्रीय भावनेसाठी कार्यरत होती, हे तुम्हाला कधी कळणार? असो. ज्या संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांचा सुप्रियाताईंनी असा उपरोधिक केला, त्याच डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, स्वयंसेवकांच्या शिस्तीचे शरद पवारांनी कोडकौतुक केले होते, हे ताईंच्या कदाचित ध्यानीमनीही नसावे. “राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याग, समर्पण आणि अखेरच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी संघाच्या शिस्तीचे अनुसरण करावे,” अशा प्रकारची टिप्पणी पवारांनी 2019च्या निवडणूक प्रचारात केली होती. कारण, थोरले पवार संघाची ताकद आणि बलस्थानाशी परिचित आहेत. पण, त्यांच्या कन्येला अजूनही त्याचा पुसटसा अंदाजही आलेला नाही, हेच राजकीय घराणेशाहीचे दुर्देव. संघ 2025 मध्ये आपल्या देदीप्यमान कारकिर्दीचा शतकोत्सव साजरा करतोय. पण, आजवर राष्ट्रवादीसारखी फुटीची वेळ कधीही संघावर आली नाही. अनेक संकटे येऊनही संघ हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहिला. राष्ट्रवादीसारखे फाईव्ह स्टार, भपकेबाज, श्रीमंतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करणारे, शेख-आव्हाडांसारखे खुशमस्करे नेते संघात नाहीत; इथे राष्ट्रभावनेने समर्पित हेतूने काम करणारे सच्चे स्वयंसेवक आहेत.पवारांच्या कुटुंबकेंद्रित पक्षाप्रमाणे संघ कधीही व्यक्ती अथवा कुटुंबकेंद्रित नव्हता, तर तो राष्ट्रकेंद्रित होता, आहे आणि राहील. आणि म्हणूनच संघाच्या, हेडगेवारांच्याच विचारांचे सरकार केंद्रात आणि राज्यातही यशस्वी वाटचाल करीत आहे, तर पवारांच्या नावाने मतं मागणारेही आता विभागलेलेच! म्हणून अशाप्रकारे नाहक दोन महान व्यक्तिमत्त्वांची तुलना करुन सुप्रियाताईंनी दादांना कात्रीत पकडण्यासाठी केलेला हा प्रकार सर्वस्वी केविलवाणाच!
आंतराष्ट्रीय राजकारणात घडत असलेल्या इस्रायल- पॅलेस्टाईनमधील तणाव आणि इतर घडामोडींचा परिणाम देशाच्या अंतर्गत राजकारणावर उमटला नसता तरच नवल! भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसने आपल्या राष्ट्रीय कार्यसमितीत पॅलेस्टाईन समर्थनाचा प्रस्ताव सादर केल्याने काँग्रेसवर सर्वदूर टीकाही झालीच. काँग्रेसच्या या भूमिकेचे आश्चर्य ते काय. कारण, यापूर्वीही अशाचप्रकारे केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन देशविरोधी भूमिका घेण्याची काँग्रेसची जुनीच खोड. पण, बाळासाहेबांच्या वारशाची टिमकी मिरवणार्या उबाठा गटाने या प्रकरणीही मौन बाळगून काँग्रेसचीच री ओढलेली दिसते. काँग्रेसचा सहयोगी पक्ष म्हणून राज्यात नामधारी राहिलेल्या उबाठा गटाने पॅलेस्टाईन प्रकरणात ’नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेऊन हमासला थेट पाठिंबा दिला नाही आणि विरोधही केला नाही. जेव्हा सत्य-असत्याची परीक्षा घेतली जाते, अशा स्थितीत सत्य माहिती असूनही सत्याची बाजू न घेता तटस्थता स्वीकारणारा व्यक्ती सर्वात मोठा दोषीच समजला जातो. आज उबाठा गट त्याच स्थितीत आहे. काँग्रेसचा इतिहास हा मुळातच हिंसेला प्रोत्साहन देणारा आणि भारताच्या विपरित भूमिका घेणारा. दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ अतिरेक्यांच्या एन्काऊंटर वेळी भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूवर तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना अतीव दुःख झाले होते. त्यांना म्हणे अश्रूही अनावर झाले होते. पण, आज अशाच देशविरोधी, हिंदूविरोधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून, बाळासाहेबांचे चिरंजीव बसले आहेत आणि काँग्रेसच्या भूमिकेला शांतपणे समर्थन देत आहेत. मग तो विषय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विटंबनेचा असो, हिंदू-सनातन धर्माच्या विरोधात ओकली जाणारी गरळ असो किंवा अटलबिहारी वाजपेयींच्या नावाने होणार्या उद्यानाला ठाकरेंकडून नाकारली जाणारी परवानगी असो. या सर्व गोष्टी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेसमोर होत असूनही ते केवळ आणि केवळ आपली राजकीय दुकानदारी सुरू राहावी, यासाठी मूग गिळून गप्प आहेत. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनीही इस्रायलच्या हमासविरोधी कारवाईचे निर्विवाद समर्थनच केले असते. पण, उद्धव ठाकरेंकडून तशी अपेक्षाच बाळगणे दुरापास्त!