मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी एक नवी माहिती पुढे आली आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यानुसार १३ ऑक्टोबर रोजी होणारी सुनावणी आता एक दिवस आधी म्हणजेच १२ ऑक्टोबरला होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले होते. परंतु, त्यात आता बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. ही सुनावणी १२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता होणार आहे.
१३ ऑक्टोबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जी-२० देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यादिवशी उपलब्ध नसतील. त्यामुळे ही सुनावणी एक दिवस आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.