मुंबई : भारतीय हवाई दलाच्या महत्त्वाच्या एअरबेसवर हल्ला करणाऱ्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. शाहिद लतीफ असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जानेवारी २०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी सियालकोटमधील मशिदीमध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे. शाहिद हा सियालकोट भागातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर होता. 'छोटा शाहिद भाई' आणि नूरू अल दिन या नावांनीही त्याला ओळखले जात होते. विशेष म्हणजे २०१० मध्ये काँग्रेस सरकारने सद्भावना दाखवत या दहशतवाद्याला पाकिस्तानकडे सोपवले होते.
१ जानेवारी २०१६ मध्ये पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या महत्त्वाच्या हवाईतळावर हल्ला झाला होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एअरबेसमध्ये घुसून छुप्या पद्धतीने हल्ले करण्यास सुरुवात केली होती. शाहिद लतीफ यानेच या हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यात ७ सुरक्षा जवानांसह ८ जण ठार झाले होते.
तसेच याआधी भारतात शाहिद लतीफ याला १९९४ मध्ये UAPA कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१० मध्ये त्याची शिक्षा पुर्ण झाल्यानंतर त्याला पाकिस्तानकडे सोपवण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर तो पुन्हा भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ लागला. त्यानंतर आता भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या शाहिद लतीफ याची पाकिस्तानातील सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे.