ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे कालवश; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    09-Jan-2023
Total Views |

Dr. Vishwas Mehendale  
 
 
 
 
मुंबई : दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आज 9 डिसेंबर सकाळी मुलूंड येथे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ते आजारी होते. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आजच मुलुंड येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
 
 
डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत एकूण १८ हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली आहेत. 'यशवंतराव ते विलासराव', 'आपले पंतप्रधान' ही त्यांची गाजलेली काही पुस्तकं. दूरदर्शनचे पहिले मराठी वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. मराठी बातम्या दिल्ली आकाशवाणीवरुन वाचणारे ते पहिले वृत्तनिवेदक होते. याशिवाय ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक होते. या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते. त्यांनी काही गाजलेल्या नाटकांमध्येही काम केलं होते. रंगभूमीवरचा त्यांचा वावर वाखाणण्याजोगा होता.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिंदे यांनी ट्विटरवरही पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, "दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..."