‘सावित्रीच्या लेकी’ ठरवणार कोकण शिक्षक आमदार

ठाण्यात महिला मतदारांचा टक्का वाढला...!

    05-Jan-2023
Total Views |

Thane

ठाणे : गोव्याच्या सीमेपासून थेट गुजरातच्या सीमेपर्यंत पसरलेल्या कोकण विधान परिषद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक या महिन्यात होत असून यावेळी येथील आमदार ‘सावित्रीच्या लेकी’ ठरवणार आहे. संपूर्ण मतदारसंघात एकूण ३७ हजार ७१९ पैकी १८ हजार ९७ महिला मतदार असून यापैकी ठाण्यात नोंद झालेल्या १४ हजार ६८३ शिक्षकांमधील ८ हजार ७६७ महिला आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते सलग दोन वेळा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, मागील निवडणुकीत मोते यांना डावलून शिक्षक परिषदेने वेणुनाथ कडू यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज मोते यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिक्षक परिषदेला भोवली आणि हा गड शेकापच्या बाळाराम पाटील यांनी सर केला.
 
 
आता पुन्हा या मतदारसंघासाठी निवडणूक होत असून दि. ३० जानेवारी रोजी मतदान होत आहे. अंतिम मतदार यादीनुसार संपूर्ण कोकण विभागात एकूण ३७ हजार ७१९ मतदार नोंदणी करण्यात आली आहे. यात १८ हजार ९७ स्त्री मतदार तर १९ हजार ६२२ पुरुष मतदार आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी ठाणे जिल्ह्यात एकूण १४ हजार ६८३ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. यात ८ हजार ७६७ स्त्री मतदार असून ५ हजार ९१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
 
 
मतपत्रिकेद्वारे मतदान...

 
कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असून मतदानाच्या दिवशी नैमेत्तिक रजा जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्यात २० मतदान केंद्रे असून जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना केली आहे. या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.