वरुणराजाच्या साथीने रंगला ‘बीटिंग द रिट्रीट’

भारतीय सुरावटींनी विजय चौक मंत्रमुग्ध

    30-Jan-2023
Total Views |
 
Beating the retreat
 
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आणि वरुणराजाच्या साथीने भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप समारंभ अर्थात ’बीटिंग द रिट्रीट’ सोहळा रविवारी नवी दिल्लीतील विजय चौकात संपन्न झाला. यावेळी खास भारतीय सुरावटी विशेष आकर्षण ठरल्या.
 
देशाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास दि. 23 जानेवारीपासून प्रारंभ होतो आणि दि. 29 जानेवारी रोजी ’बीटिंग द रिट्रीट’ अर्थात सैन्यदलांच्या विशेष बॅण्ड वादनाने सोहळ्याचा समारोप होतो. हा सोहळा दरवर्षी रायसिना हिलवरील विजय चौकात आयोजित करण्यात येतो. यंदाच्या वर्षीदेखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या पहिल्या वनवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाईदल प्रमुख ‘एअरचीफ’ मार्शल विवेक चौधरी, नौदलप्रमुख अ‍ॅडमीरल आऱ. हरिकुमार यांनी केले.
 
यंदाच्या वर्षी ’बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यास विशेष साथ लाभली ती वरुणराजाची. दिल्लीमध्ये 26 जानेवारीच्या आसपास नेहमीच पाऊस पडतो. मात्र, यावेळी पावसाने ’बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यासदेखील हजेरी लावली. जोरदार कोसळणारा पाऊस, त्यामुळे वाढलेली थंडी, कमी झालेली दृश्यमानता अशी परिस्थिती असूनही सैन्यदलांच्या बॅण्डने आपला नियोजित कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणेच पार पाडला. यावेळी सोहळा बघण्यास आलेले सर्वसामान्य नागरिकदेखील पावसातही कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धपणे पाहत होते. मात्र, पाऊस आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे ‘3500 मेड इन इंडिया ड्रोन शो’ मात्र होऊ शकला नाही.
 
भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित भारतीय सूर हे यावर्षीच्या ’बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. समारंभाची सुरुवात झाली ती ’अग्निवीर’ या सामूहिक बॅण्डच्या वादनाने. ’अलमोरा’, ’केदारनाथ’, ’संगमदूर’, ’क्विन्स ऑफ सापुतारा’, ’भागीरथी’, ’कोकण सुंदरी’ या पाईप्स आणि ड्रम्सद्वारे मंत्रमुग्ध करणार्‍या सुरावटी सादर करण्यात आल्या. भारतीय वायुसेनेच्या बॅण्डने ’अपराजेय अर्जुन’, ’चरखा’, ’वायू शक्ती’, ’स्वदेशी’ तर भारतीय नौदलाच्या बॅण्ड ’एकला चलो रे’, ’हम रेडी हैं’ आणि ’जय भारती’ या धून वाजविल्या. भारतीय लष्कराचे ’शंखनाद’ या बॅण्डने ’शेर-ए-जवान’, ’भूपाल’, ’अग्रणी भारत’, ’यंग इंडिया’, ’कदम कदम बढाये जा’, ’ड्रमर्स कॉल’ आणि ’ए मेरे वतन के लोगो’ सादर केले.
 
समारंभाचे मुख्य सुत्रधार फ्लाइट लेफ्टनंट लिमापोकपम रूपचंद्र सिंह हे होते. आर्मी बॅण्डचे नेतृत्व सुभेदार मेजर दिग्गर सिंह आणि हवाई दलाच्या बॅण्डचे नेतृत्व कमांडर एम अँथनी राज आणि वॉरंट ऑफिसर अशोक कुमार यांनी केले. राज्य पोलीस आणि ‘सीएपीएफ’ बॅण्डचे नेतृत्व साहाय्यक उपनिरीक्षक प्रेम सिंह यांनी केले. नायब सुभेदार संतोष कुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली बगलर्स तर सुभेदार मेजर बसवराज वाग्गे यांच्या दिग्दर्शनाखाली पाईप व ढोल बॅण्ड वादन झाले.