चेंबूरमध्ये इमारतीत अडकला होता कोल्हा; उपचाराअंती कांदळवनात सुटका

    03-Jan-2023
Total Views |
jackal



मुंबई (प्रतिनिधी) -
चेंबूरमधील रहिवासी भागातून पकडलेल्या सोनेरी कोल्ह्याला मंगळवारी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. शनिवारी हा कोल्हा अशक्त अवस्थेत चेंबूरमधील रहिवासी भागात आढळला होता. मुंबईतील दक्षिण- पूर्व किनारपट्टी प्रदेशातून कोल्ह्याच्या बचावाची ही पहिलीच घटना आहे. ( jackal chembur )


मुंबई महानगर प्रदेशाला कांदळवनाच्या जंगलाने वेढलेले आहे. या जंगलात सोनेरी कोल्ह्यांचा (गोल्डन जॅकल) प्रामुख्याने अधिवास आढळतो. वरचेवर या कोल्ह्यांचा वावर कांदळवनांना लागून असलेल्या रहिवासी भागामध्ये आढळतो. चेंबूरमधील सेंट्रल अॅव्हेन्यू स्ट्रीट येथील एका इमारतीमध्ये ३१ डिसेंबर रोजी कोल्हा अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन'चे (डब्लूडब्लूए) सदस्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथील एका इमारतीमध्ये कोल्हा अडकल्याचे दिसल्यावर बचाव कार्य करुन त्याला पकडण्यात आले. कांदळवनापासून दूरवर असलेल्या या परिसरात कोल्हा भरकटलेल्या अवस्थेत आल्याची शक्यता वर्तवण्यात आली. कोल्ह्याच्या पायाला जखमा असल्याने तो अशक्त अवस्थेत होता. त्यामुळे पशुवैद्यकाच्या देखरेखीअंतर्गत त्याच्यावर उपचार करण्यात आले.


चार दिवसांच्या उपचाराअंती कोल्हा पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याकरिता सशक्त झाला. त्यामुळे मंगळवारी त्याला कांदळवन कक्षाचे मध्य मुंबई परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सुरेश वरक आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सर्वसामान्यपणे मुंबईच्या पूर्व किनारपट्टी प्रदेशात म्हणजेच भांडुप, विक्रोळी भागातील कांदळवनामध्ये कोल्ह्यांचा वावर आढळतो. याठिकाणाहून अनेक वेळा जखमी कोल्ह्यांचा बचाव करण्यात आला आहे. मात्र, दक्षिण-पूर्व मुंबईतील वाशी खाडी पूलाच्या खालच्या भागात असलेल्या ट्रोम्बे, माहुल, शिवडी या परिसरातील कांदळवनांमध्ये आजवर कोल्ह्यांचा वावर आढळून आलेला नाही. अशा परिस्थितीत चेंबूर येथे घडलेली कोल्हा बचावाची ही घटना पहिलीच आहे.

चेंबूर येथून अशक्त अवस्थेत पकडलेल्या कोल्ह्याला उपचाराअंती त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी मध्य मुंबई वनपरिक्षेत्रातील कांदळवन क्षेत्रामध्ये त्याची सुटका करण्यात आली. या भागामध्ये कोल्ह्याच्या बचावाची ही पहिलीच वेळ आहे. - सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी, मध्य मुंबई - कांदळवन कक्ष