प्रा. राजेंद्र महाजन हे व्यासंगी कलाशिक्षक जसे आहेत, तसे ते सृजनशील दृश्यकलाकार म्हणून अधिक रमणारे व्यक्ती आहेत. प्राचार्य महाजन सरांच्या माध्यमातून आणखी एका स्थायी शिक्षकाची संख्या, महाराष्ट्रातील कलाध्यापकांच्यातून कमी होणार आहे. वैयक्तिक प्रा. राजेंद्र महाजन यांच्या कलाध्यापनातील विविध कंगोरे शोधण्याबरोबरच त्यांच्या कलोपासनेतून साकारलेल्या कलाकृतींबद्दल मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
आई जशी ‘रिटायर्ड’ म्हणजे ‘सेवानिवृत्त’ होत नसते, तद्वतच शिक्षक किंवा गुरुजनसुद्धा सेवानिवृत्त होत नसतात. येथे ‘शिक्षक’ म्हणजे, ‘आर्ट टिचर्स डिप्लोमा’च्या, ‘शिक्षणशास्त्र’ या विषयातील ‘आदर्श शिक्षकाची लक्षणे’ जी कथन केली आहेत... अशाच ‘आदर्श-अभ्यासू-अभिमान वाटावा’ अशा शिक्षकाचा, कलाध्यापन आणि कलोपासनेचा प्रवास हा अभिनंदनीय तर आहेच. तथापि अनुकरणीयदेखील आहे. त्यांच्या विषयीची माहिती देणारा आजचा लेख आहे.
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील, चोपडा येथील भगिनी मंडळाच्या ‘ललित कला केंद्र’ या अनुदानित कला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थीप्रिय कलाध्यापक हे त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होताहेत मंगळवार, दि. ३१ जानेवारीला. परंतु, कलाध्यापक किंवा कलोपासक हा कधीही ‘सेवानिवृत्त’ होत नसतो. कलेला, निवृत्ती नसते. ती जितकी दीर्घकाळ टिकते तितकी ती अधिक प्रगल्भ बनत राहते. ज्ञान किंवा बुद्धी ही कधीही थांबत नसते. ज्ञान हे वाढतच जाते, तर बुद्धी ही अधिक प्रगल्भ होत जाते. खर्या शिक्षकाचा ‘ज्ञान आणि बुद्धी’शी सहयोग झालेला असतो. खरा शिक्षक हा संध्याकाळी, दिवसभरात केलेल्या ज्ञानदानाबद्दलचे चिंतन करतो. त्या चिंतनाद्वारे तो मनन करीत असतो आणि पुढे दुसर्या दिवशी, पुनश्च तो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी नव्या उत्साहाने उभा राहतो. खर्या शिक्षकाला विनम्रतेसह विद्यार्थ्यांप्रती तळमळ असते, ज्ञानदान आणि बुद्धी वाटप हेच अशा शिक्षकाचं लौकिक अर्थाने ‘व्यसन’ असतं.
चित्रकार आणि ज्येष्ठ कलाध्यापक प्रा. राजेंद्र महाजन हे त्यांच्या आडनावाला सार्थ ठरविणारे दृश्यकलाकार आहेत. त्यांचं कलाकार्य महान तर आहेच, शिवाय त्यांच्या कलाकार्याशी, समाजाच्या विविधांगी घटकांची नाळ जोडलेली आहे. खूपदा, कलाध्यापक हे स्वत:ची कलाप्रदर्शने आयोजित करतात. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी स्वत:च्या कलाप्रदर्शनाशिवाय सलग १२ वेळा विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भरविली आहेत. महात्मा गांधींच्या दृष्टिकोनातून ग्रामस्वच्छता, सर्वधर्म समभाव, शिक्षण, साक्षरता, म. गांधी-लाल बहादूर शास्त्री जीवनदर्शन, खेेड्याकडे चला, देशनिष्ठा अशा सामाजिक बांधिलकी जपणार्या विषयांवर, विद्यार्थीदशेतच- विद्यार्थ्यांकडून काम करवून घेऊन सामाजिक व शैक्षणिक संस्करांचा पवित्र उपक्रम त्यांनी अव्याहतपणे राबविला आहे. याशिवाय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने आयोजिलेले चित्रप्रदर्शनदेखील समाजमनावर बिंबविले गेले.
सानेगुरुजी जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या जीवनदर्शनाचा चित्रात्मक गोषवारा, नुसता कलेच्या विद्यार्थ्यांना नव्हे, तर इतर विषयांच्या विद्यार्थ्यांसह समाजालाही खूप काही संदेश देणारा ठरला. व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव, कुटुंब नियोजन, स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, मतदान करा, पाणी वाचवा, कोरोना-स्वाईन फ्लू अशा मानवी संवेदनांशी संबंधित विषयांवरील भित्तीचित्रांचे आयोजन, स्मृतिप्रवण ठरले. महाअवयवदान दिन, विज्ञान दिन, स्वातंत्र्याची ७५ वर्षे अशा विषयांवरील रांगोळी स्पर्धांची आयोजने करून, प्रत्येक कुटुंबातील महिलावर्गपर्यंत, उचित राष्ट्रहित संदेश पोहोचविण्याचे कार्य प्रा. राजेंद्र महाजन यांनी केले आहे.
समाजप्रबोधनासाठी, थेट समाजाशी जवळीक असणार्या विषयांनाच त्यांनी ‘चित्रविषय’ बनवून आगळेवेगळे समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यासाठी त्यांनी मटके, भोपळा, दारूच्या बाटल्या, सुपडे, खापरं, कागदी टोप्या अशा सर्वसामान्य परिचित घटकांचा, चित्रसंकल्पनांसाठी वापर केला. चोपडा परिसरातील गावे-खेडे-वनवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांच्या ‘आऊटडोअर’ कलाकामाला प्रोत्साहन देऊन स्वत: सहभागी होऊन गेल्या २८ वर्षांच्या कलाध्यापनात त्यांनी सुमारे १०० वर अभ्यास सहलींची समर्थपणे आयोजन केलीत.
अशी एक नव्हे, अनेक कामे सामाजिक आणि कला-सांस्कृतिकतेच्या सहयोगातून अथकपणे करीत असताना आपल्या वैयक्तिक कुटुंबापेक्षा वेगळे असे काही कलाध्यापन असते... असा साधा विचारही, मनाला न शिवू दिलेला हा गृहस्थ येणार्या जानेवारीच्या ३१ तारखेला, चोपड्याच्या ‘ललित कला केंद्रा’तून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. त्यांचा चोपड्यात निरोप समारंभाचा एक भव्य कार्यक्रम सुमारे २००च्यावर संख्येने असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार्यांपैकी बर्याच शिक्षकांनी त्यांच्या कलायोगदानाचा आदर्श तर घेतलाच पाहिजे. परंतु, अवलंबही करायला हवा इतकं स्पृहणीय काम, प्रा. महाजन सरांचं आहे.
सत्य हे रुचायला-पचायला जरी सुरुवातीला कठीण जात असलं तरी ते चिरंतन असल्याने, नष्ट कधीच होत नसतं. प्राचार्य महाजन सर यांचं कलाध्यापनातील योगदान हे वादातीत आहे. आता जशी ज्येष्ठ कलाध्यापकांनी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली की, रिक्त झालेल्या जागांवर नवीन शिक्षक नियुक्त करण्याची प्रथा लोप पावली आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे. स्थायी पदांवर स्थायी नियुक्तीचे शिक्षक नियुक्ती न करता कंत्राटी किंवा आता अभ्यागत शिक्षकांना अधिक पसंती दिली जाते. यामुळे शिक्षणाचे आणि समस्त शिश्रण क्षेत्राचे भविष्य ‘आयसीयु’त आहे, अशी वेदना व्यक्त कराविशी वाटते आहे.
प्रा. राजेंद्र महाजन हे स्थायी शिक्षकांचे प्रातिनिधिक उदाहरण आहेत. ते सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना समजलेच नाही की विद्यादान, ज्ञानदान, कलादान करण्याची सरकारी वेळ आता पूर्णत्वास आली आहे. आजचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ३५-४० लाखांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘मन की बात’मध्ये सांगून टाकले की, कष्ट करणारा हा कधीच थकत नसतो. मला तर काम केल्याने अधिक ऊर्जा मिळते. खरंय, मोदीजी बोलले ते... प्राचार्य महाजनांसारखे संवेदनाक्षम शिक्षक हे कधीच कामाने थकणारे नाहीत. ते काम करून ऊर्जा निमार्र्ण करणारे असतात. भारताच्या आत्तापर्यंतच्या मा. राष्ट्रपतींपैकी बहुतांशी राष्ट्रपती हे शिक्षकी पेशातूनच आलेले आहेत.
ही बाब जितकी अभिमानाची आहे तितकीच चिंतन करायला लावणारीदेखील आहे. बघा ना, ज्या देशाचे राष्ट्रपती हे अधिकाधिक संख्येने शिक्षकी पेशातूनच आलेले आहेत, त्याच देशातील (महाराष्ट्रापुरता विचार करता) शिक्षण क्षेत्रात स्थायी पदावरील शिक्षक सेवानिवृत्त झालेली त्यांच्या जागेवर ‘अभ्यागत’ शिक्षक भरले जातात. ते त्यांची सेवा ‘अभ्यागत’ स्तरातील देतात. कारण, ती त्यांची गरज म्हणून स्विकारलेली सेवा असते. तरीही ते स्वतंत्र भारताचे नागरिक घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कायमस्वरूपी उपयोगी पडणारे ज्ञानदान करीत असतात. असो...
प्राचार्य महाजन सरांच्या माध्यमातून आणखी एका स्थायी शिक्षकाची संख्या, महाराष्ट्रातील कलाध्यापकांच्यातून कमी होणार... वैयक्तिक प्रा. राजेंद्र महाजन यांच्या कलाध्यापनातील विविध कंगोरे शोधण्याचा आपण प्रयत्न केला. आता त्यांच्या कलोपासनेतून साकारलेल्या कलाकृतींबद्दल मागोवा घेण्याचा प्रयत्न करू या...!! प्रा. राजेंद्र महाजन हे व्यासंगी कलाशिक्षक जसे आहेत, तसे ते सृजनशील दृश्यकलाकार म्हणून अधिक रमणारे व्यक्ती आहेत. तीन दशकांच्या त्यांच्या कलोपासनेत अश्मयुगीन, मध्यमयुगीन, ऐतिहासिक आणि आधुनिक कलाप्रवाहांच्या कालखंडांचा त्यांनी संशोधनाच्या भावनेतून अभ्यास केलेला आहे. मग अश्मयुगीन अवशेष असो की, प्राचीन-मध्ययुगीन गुंफा असो, लेणी स्थापत्य, भित्तीचित्रे, शिलालेख, शिल्पे, मंदिरस्थापत्य आणि इतिहासाशी संबंधित सर्वच घटकांचा ते सूक्ष्मपणे अभ्यास करताना दिसतात. नोंदी-टिपणे-कात्रणे आणि लिखाण या तर त्यांच्या नित्याच्याच बाबी. परंतु, या सार्या बाबींना त्यांनी त्यांच्या ‘कॅनव्हॉस’वर बोलायला लावले आहे.
मग अजिंठा डोंगरांतील अजिंठा चित्रे आणि परिसर वेगळ्या ‘मूड’ने त्यांच्या ‘कॅनव्हॉस’वर अवतराना दिसतात, तर डोंगरराजी-घनदाट जंगल, शेती आणि नैसर्गिक परिसर त्यांच्याही नकळत त्यांच्या ‘कॅनव्हॉस’वर उत्तरेला असतो. म्हणूनच त्यांची ‘रंगपॅलेट’ ही स्वयंभू भासते. त्यांचं रंगलेपन हे अपवादात्मक वाटते. त्यांचे चित्रविषय हे ‘युनिक’ असतात. म्हणूनच त्यांची प्रत्येक कलाकृतीही चिरंजीव असते. ती कधीच निवृत्त होत नाही. तिला नियत वयोमानाची अट पण नसते. कारण, ती अजिंठा चित्र शैलीच्या रंगांप्रमाणे, सतत ताजीतवानी असते. अशा या महान कार्य करून वेगळा आदर्श घालून देणार्या मतप्रिय कलाध्यापकास सेवानिवृत्तीनिमित्ताने नव्हे, तर सेवानिवृत्तीनंतरच्या तणावरहित कलोपासनेस अधिक गतिमानता यावी यासाठी आभाळभर शुभेच्छा...
महाजनो येन गतः स पन्थाः
पुराणात आचार्य व्यास यांनी लिहिलेलं आहे, “धर्मस्य तत्वं निहितं गुहायाम्! महाजनो येन गतः स पन्थाः! अर्थात, धर्माचं रहस्य अथवा स्वरूप इतकं गूढ आहे, खोल आहे की, ते गुंफांमध्ये लपलेलं आहे. त्यामुळे सर्वच जणं त्यांचा अभ्यास करू शकत नाहीत, म्हणून योग्य मार्ग हाच आहे की ज्यांनी याचा कष्टपूर्वक अभ्यास केला आहे, योगदान दिले आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच जाणं योग्य राहील... प्रा. राजेंद्र महाजन हे ‘ललित कला केंद्र’च नाही, तर समस्त कलाक्षेत्रात असलेल्या महाजनांपैकीच एक आहेत. त्यांच्यासाठीचे वर्णन यथार्थ ठरणारा हा संदर्भ अभिमान वाढविणारा आहे.