स्पॅनिश आक्रमकांनी आफ्रिकेत आणि अमेरिकेत नि पोर्तुगीज आक्रमकांनी भारतात केरळात, गोव्यात वसई, साष्टीमध्ये जे अनन्वित अत्याचार केले, त्याचं मूळ कुठेतरी या युरोपीय मानसिकतेत आहे. शत्रूचा नुसता राजकीय किंवा सामरिक पराभव करून त्यांचं समाधान होत नाही.
धर्मराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला. तो स्वत: राजधानी इंद्रप्रस्थातल्या यज्ञमंडपात व्रतस्थ होऊन यज्ञविधी करत होता. त्याचे चार भाऊ चारी दिशांना गेले आणि त्या त्या दिशांवर विजय मिळवून आले. म्हणजे त्या दिशांना असणारी सर्व भूमी जिंकून आले. म्हणजे प्रत्यक्षात काय घडलं? तर त्या त्या दिशांना असलेल्या सर्व राज्यांनी आणि त्या राज्यांच्या राजांनी-अधिपतींनी युधिष्ठिराचं सम्राटपद मान्य केलं. आज आपण आपला भारत हा एक देश असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश इत्यादी २९ राज्ये किंवा प्रांत असून या सर्वांचे मिळून आपलं प्रजासत्ताकसंघराज्य आहे, असं म्हणतो. प्राचीन भारतात आजच्या ‘प्रांत’ किंवा ‘राज्य’ या प्रशासकीय शब्दानांच ‘देश’ हा शब्द होता. त्यामुळेच ‘धृतराष्ट्र’ हा कुरू देशाच्या हस्तिनापूर राज्याचा अधिपती होता. उग्रसेन हा वृष्णि-अंधकांच्या मथुरा राज्याचा अधिपती होता.
वसुदेव हा यादवांच्या शूरसेन देशाचा अधिपती होता. असेच अंग, वंग, कलिंग, मगध, कोसल, सिंधु-सौवीर इत्यादी अनेक देश म्हणजे राज्ये होती. हे राजे एकमेकांशी युद्धे करून साम्राज्यविस्तार करीत असतं. त्यांच्या या दिग्विजयी युद्ध उपक्रमांचा कोणताही उपसर्ग सर्वसामान्य प्रजेला पोहोचत नसे, हा भाग फारच महत्त्वाचा आहे.हा मुद्दा समजून घेण्यासाठी रामायण-महाभारताच्या काळात म्हणजे त्रेता किंवा द्वापारयुगात जायला नको ; अगदी या वर्तमान कलियुगातलं इसवी सनाच्या १३व्या शतकातलं उदाहरण घेऊ. शिलाहार हे राजघराणं आजच्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या साधारणपणे पश्चिम आणि दक्षिण भागात इसवी सनाच्या आठव्या शतकात उदयाला आलं. आठवं शतक ते १२ व शतक असं साधारण चार शतकं त्यांनी राज्य केलं. इसवी सनाच्या ११व्या शतकात गोदावरीच्या खोर्यात म्हणजे आज आपण ज्याला ‘मराठवाडा’ म्हणतो, त्या भागात यादव हे नवं राजघराणं उदयाला आलं. १२व्या आणि १३व्या शतकात यादवांनी क्रमाक्रमाने शिलाहार राज्य संपवलं.
पण म्हणजे प्रत्यक्षात काय घडलं? यादवांनी शिलाहारांच्या जिंकलेल्या प्रदेशातल्या गावांमध्ये लुटालूट केली का? माणसांच्या कत्तली उडवणं बायका पळवणं, वृद्ध माणसं आणि लहान मुलं यांना सरसकट ठार मारून तरुणांना पकडून गुलाम बनवणं, देवळं फोडून लुटणं, कापणीला आलेली शेतं लुटून फस्त करणं, गावं पेटवून देणं, यातला एक तरी प्रकार घडला का? तर यातला एकही प्रकार घडलेला नाही. कारण, यादव आणि शिलाहार दोघेही राजे हिंदू होते. दिग्विजय किंवा साम्राज्यविस्तारांच्या त्यांच्या संकल्पना पूर्णपणे हिंदू होत्या. त्यात सर्वसामान्य प्रजेला छळणं कुठेच बसत नव्हतं. त्यामुळे सर्वसामान्य प्रजेच्या जीवनातबदल एवढाच घडला की, गावोगावचे पाटील-पटवारी-चौगुले जे कालपर्यंत शिलाहारांच्या महसूल अधिकार्याकडे सारा भरत होते, ते आज यादवांच्या अधिकार्याकडे सारा भरू लागले. बाकी त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणतीही उलथापालथ झाली नाही.बदललेल्या राजवटीने त्यांच्यावर कसलीही जुलूम, जबरदस्ती, अन्याय केेले नाहीत किंवा जाचक कर बसवले नाहीत.
शांततापूर्ण राजवट बदलाची ही हिंदू किंवा भारतीय संकल्पना परकीय अ-भारतीय आक्रमकांना मान्यच नव्हती किंवा आकळलीच नव्हती, असं म्हणावं लागतं.ज्ञात इतिहासानुसार, अलेक्झांडर हा भारतावर स्वारी करणारा पहिला अभारतीय आक्रमक. इसवी सन पूर्व तिसर्या शतकात त्याने भारतावर आक्रमण केलं. युरोपातूनअनोतोलिया (आजचा तुर्कस्तान), मेसोपोटेमिया (आजचा इराक), पॅलेस्टाईन (आजचा इस्रायल) पर्शिया (आजचा इराण) हे सगळे देश जिंकत म्हणजे तिथलं जनजीवन उद्ध्वस्त करत तो भारताच्या गांधार (आजचा अफगाणिस्तान) प्रदेशात आला. तिथल्या छोट्या-छोट्या गणराज्यांनी त्याला प्रखर प्रतिकार केला. तेव्हा तिथेही त्याने तेच सूत्र वापरलं. नुसत्या सैन्याचा पराभव करून थांबायचं नाही, तर पराभूत गणराज्यातला मिळेल तो माणूस कापून काढायचा.
अलेक्झांडरनंतर साधारण इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं पाचवं शतक या कालखंडात भारतावर अनुक्रमे शक, कुशाण आणि हूण यांची आक्रमणं झाली. त्यांचाही तोच फॉर्म्युला होता. त्यांनी भारतीय-हिंदू राजांचा रणांगणात तर पराभव केलाच. पण, सर्वसामान्य जनतेवर अनन्वित अत्याचार केले. सजीव व्यक्तींंना ठार मारण्याइतकाच निर्जीव वस्तू किंवा वस्तू यांचा विध्वंस करण्यातही त्यांना आनंद वाटत असे. किंबहुना, जे जे उभं आहे, ते आडवं करून टाकण्यात त्यांना सुख मिळत असे. ‘खबरदार! अमुक तमुक ते झालं नाही किंवा झालं, तर याद राखा, उभा महाराष्ट्र आडवा करून टाकू,’ अशी ती एक वल्गना आपल्याकडे केली जाते, तिच्या मागची मनोवृत्ती ही अशी अ-हिंदू, अ-भारतीय आहे. येतंय का लक्षात?
हे शक, कुशाण, हूण हे साधारणपणे आज ज्यांना आपण ‘मध्य आशियाई देश’ म्हणतो, त्या भागातले होते.पुढच्या काळात त्यांना ‘तुर्कवंशीय टोळ्या’ म्हणायला लागले, असं सर्वसाधारणपणे म्हणायला हरकत नाही. या मध्य आशियाई तुर्कांना चीनच्या अधिपत्त्याखालून सुटण्यासाठी अरब-इस्लामी सेनापतींना मदत केली. अरबांनी त्यांना इस्लामाची दीक्षा दिली. पुढे या नव- इस्लामी तुर्कांनी एका बाजूला अरबस्तान-अनातोलिया जिंकून आपलं स्वतःचंच उस्मानी-उथमानी-ऑटोमन साम्राज्य उभारलं, जे आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडाच्या खूप मोठ्या प्रदेशावर इ. स. १२९९ ते इ.स १९२२ असं तब्बल सव्वासहाशे वर्षं टिकलं.
दुसर्या बाजूला या तुर्कांनी गांधार पूर्णपणे इस्लामी बनवला आणि ११व्या शतकापासून भारतावर सतत स्वार्या सुरू केल्या. यात महंमद गझनी, घोरी, खिलजी, लोदी ते बाबर सगळे आले. या प्रत्येकाने हिंदू राजांच्या सेनांचा तर पराभव केलाच, पण सर्वसामान्य जनतेवर अतोनात जुलूम केले. सर्वसामान्य जनता हिंदू होती म्हणून त्यांनी हे जुलूम केले, हे तर आहेच. पण, औरंगजेब सुन्नी होता, तर आदिलशहा आणि कुतूबशहा हे शिया होते.
अगदी हाच प्रकार आपल्याला कथित सुधारेलल्या युरोपिय आक्रमकांबद्दलही पाहायला मिळतो. ज्युलियस सीझर हा प्रगत अशा रोमन साम्राज्याचा अधिपती होता. त्याने इजिप्तवर स्वारी करून टॉलेमी या तिथल्या ग्रीक राजाचा प्रराभव केला. ठीक आहे. टॉलेमीला ठार मारून त्याने त्याची बहीण क्लिओपात्रा हिला पळवली किंवा क्लिओपात्रा स्वतः होऊन सीझरबरोबर पळून गेली, इथपर्यंत ठीक आहे. पण, टॉलेमीच्या कित्येक पिढ्यांपूर्वीपासून जमत आलेला असंख्य मौल्यवान ग्रंथांचा संग्रह असलेलं अलेक्झांड्रिया इथलं विशाल ग्रंथालय जाळून टाकण्याची सीझरला काय गरज होती?
स्पॅनिश आक्रमकांनी आफ्रिकेत आणि अमेरिकेत नि पोर्तुगीज आक्रमकांनी भारतात केरळात, गोव्यात वसई, साष्टीमध्ये जे अनन्वित अत्याचार केले, त्याचं मूळ कुठेतरी या युरोपीय मानसिकतेत आहे. शत्रूचा नुसता राजकीय किंवा सामरिक पराभव करून त्यांचं समाधान होत नाही. कत्तली, लुटालूट, जाळपोळ अत्याचार, विध्वंस झाल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही आणि हा शत्रू परकीय असला पाहिजे असं नव्हे; आपल्या मताला विरोध करणारा तो आपला शत्रू.
१९१७ साली रशियन कम्युनिस्टांनी राज्यक्रांती केली. झारच्या राजेशाही अंमलात सरदार, जमीनदार, सरंजामदार यांना तर ठार मारण्यात आलंच. पण, लोकशाहीवादी नेत्यांनाही ठार मारण्यात आलं. १९१७ ते १९२०-२१ पर्यंत हा खाटिकखाना सुरू होता. इथपर्यंतही एकवेळ ठीक म्हणता येईल, पण कम्युनिस्ट सरकारचं बस्तान पक्कं बसल्यावर लेनिनने सामुदायिक शेती असं धोरण स्वीकारलं आणि त्याला विरोध करणार्या आपल्याच देशबांधवांना सरळ ठार मारायला सुरुवात केली. सोव्हिएत रशियाविषयी लेखन करणारे एक ख्यातनाम लेखक रॉबर्ट काँक्वेस्ट यांच्या मते, १९१७ ते १९२१च्या रशियन यादवी युद्धात सुमारे दोन लाख लोक ठार झाले. पण, १९२१ ते १९२४ या काळात आपल्या ‘न्यू इकोनॉमिक पॉलिसी’ला विरोध म्हणून लेनिनने किमान तीन लाख शेतकर्यांना ठार मारलं. ते कुणी परके नव्हते. त्याचेच रशियन देशबांधव होते. १९२४ साली तो स्वतःच मेला.
आता ही जी अमानुष, राक्षसी, निर्घृण मनोवृत्ती आहे, ती फक्त कम्युनिस्टांमध्येच होती किंवा आहे, असं समजण्याचं कारण नाही. भारतीय-हिंदू जनमानस सोडून इतर सर्व जनसमूहांमध्ये ती आहे. कोलंबसाने अमेरिका खंडाचा शोध लावून तिथं स्पेन देशाचा झेंडा रोवला. पुढच्या काळात स्पॅनिश दर्यावर्दींनी मध्य आणि दक्षिण अमेरिकेवर वारंवार मोहिमा काढून तिथल्या ताम्रवर्णी स्थानिक लोकांच्या बेछूट कत्तली केल्या. भयानक लुटालूट, विध्वंस आणि मनसोक्त बाटवाबाटवी केली. आफ्रिकेतल्या काळ्या गरीब लोकांना गुलाम बनवून गुराढोंराप्रमाणे त्यांना अमेरिकेतल्या शेतीत नि मळ्यांत राबवायला सुरुवात केली ती स्पॅनिश लोकांनीच!
आपण एकवेळ हे समजू शकतो. स्पॅनिशांच्या दृष्टीने ताम्रवर्णी अमेरिकन आणि कृष्णवर्णी आफ्रिकन हे परके होते म्हणून त्यांनी त्यांची कत्तल उडवली. पण, एवढ्यावर संपत नाही. १९२२ साली इटलीत बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाने सत्ता हाती घेतली. १९३३ साली जर्मनीत अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाने सत्ता हाती घेतली. या काळात युरोपातल्या सगळ्याच देशांमधल्या जनतेला सोव्हिएत रशियातल्या साम्यवादी राजवटीची मोहिनी पडली होती. राजेशाही किंवा लोकशाहीपेक्षा साम्यवाद ही शोषित-वंचितांची राजवटच आपलं कल्याण करेल, असं सर्वसामान्यांना मनापासून वाटत होतं. त्यानुसार स्पेनमध्ये डाव्या विचारांच्या समाजवादी पक्षाचं सरकार सत्तारुढ झालं होतं. पण, इटली आणि जर्मनीत उजव्या विचारसरणीची फॅसिस्ट आणि नाझी सरकारं आली म्हटल्यावर स्पेनमधल्या उजव्या पक्षाला जोर चढला. त्यांचा नेता जनरल फ्रान्सिस्को फ्रॅको याने डाव्या सरकारविरुद्ध सशस्त्र बंड पुकारलं.
जुलै १९३६ ते एप्रिल १९३९ अशी साधारण पावणेतीन वर्षं संपूर्ण स्पेन देश या भीषण यादवी युद्धात होरपळून निघाला. असं म्हटलं जातं की, देशातलं प्रत्येक घर, प्रत्येक कुटुंब या किंवा त्या पक्षातून एकमेकांविरुद्ध लढलं. डाव्या आणि उजव्या दोन्ही पक्षातल्या लोकांनी सापडेल तिथे एकमेकांच्या कत्तली केल्या. लुटालूट केली. गावं जाळली. सैनिक आणि नागरिक मिळून दोन्हीकडची किमान पाच लाख माणसं ठार झाली. किती संपत्ती नष्ट झाली, किती कुटुंब, किती घरं कायमची उद्ध्वस्त झाली याची तर गणतीच नाही. अखेर जनरल फ्रँको जिंकला आणि त्याच्या उजव्या पक्षाच्या सरकारने म्हणजे खरं पाहता त्याने एकट्याने १९७५ साली मरेपर्यंत हुकूमशाही राजवट गाजवली.
अलीकडेच स्पेनमधला एक सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ फ्रान्सिस्को फर्नांदेझ याला दक्षिण स्पेनमध्ये काही अज्ञात सामुदायिक थडगी सापडली. यादवी युद्धात ठार मारून गाडून टाकलेले असे अज्ञात मुडदे स्पेनमध्ये वरचेवर सापडत असतात. फर्नांदेझने अशा अज्ञात सामुदायिक थडग्यांना मोठं नमुनेदार नाव दिलं- ‘अंडरग्राऊंड लँडस्केप ऑफ टेरर.’साम्राज्यविस्ताराच्या हिंदू संकल्पना आणि अ-हिंदू संकल्पना या अशा आहेत.