सुसंघटित सैन्य? नव्हे, बेशिस्त लुटारू!

Total Views |
 crimes by russia soldier in ukraine


आक्रमक जर्मन सैन्याने रणांगणावर चुकीचे झेंडे दाखवून शत्रूला फसवणं, चुकीच्या बातम्या मुद्दाम पेरणं, व्याप्त प्रदेशातल्या नागरिकांना विशेषतः ज्यू नागरिकांना तडीपार करणं अशा अनेक गोष्टी अगदी पद्धतशीरपणे घडवून आणल्या होत्या. आता अगदी याच गोष्टी रशियन सेनापती करीत आहेत.


"अरे, हे प्रशिक्षित व्यावसायिक सैनिक आहेत की लुटारू? रशियाने शिस्तबद्ध सैनिकांऐवजी तुरूंगामधले कैदी मोकळे करून पाठवलेत की काय रणागंणावर?” एक वार्ताहर लिहितो.दुसरा लिहितो, ”यांना लढण्यापेक्षा लढाईत रिकामी झालेली नागरिकांची घरं लुटण्यात जास्त रस आहे. आणि काय त्यांचे गणवेश! काय त्यांची हत्यारं नि काय त्यांची वाहनं! लढाईत तोफगोळ्यांनी किंवा सुरूगांनी उद्ध्वस्त होण्याऐवजी हे जुनाट खटारा ट्रक्स आणि जीप्स, सुटे भाग मिळत नाहीत म्हणून बंद पडतील.”

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला आता ११ महिने उलटलेत. बलवान रशिया हां-हां म्हणता युक्रेनचा मोड करील, असं जे वाटत होतं, तसं काही घडलेलं नाही. उलट रशियन आक्रमण आता कुंथत चालू आहे नि युक्रेनियन प्रत्याक्रमण जोरदार होतयं, असंच एकूण दृष्य आहे.या लढाईकडे पाहताना युद्धवार्ताहरांना, युद्धअभ्यासकांना पदोपदी दुसर्‍या महायुद्धाची आठवण होते आहे. त्यावेळी आक्रमक जर्मन सेना आणि बचावासाठी लढणारी सोव्हिएत रशियन सेना यांची एकंदर अवस्था त्यांचे त्यावेळचे डावपेच हे जवळपास तसेच, मागील पानावरून पुढील पानावर चालू आहेत. कदाचित बाजू बदलल्या आहेत.त्यावेळी आक्रमक जर्मन सैन्याने रणांगणावर चुकीचे झेेंडे दाखवून शत्रूला फसवणं, चुकीच्या बातम्या मुद्दाम पेरणं, व्याप्त प्रदेशातल्या नागरिकांना विशेषतः ज्यू नागरिकांना तडीपार करणं अशा अनेक गोष्टी अगदी पद्धतशीरपणे घडवून आणल्या होत्या. आता अगदी याच गोष्टी रशियन सेनापती करीत आहेत.

जून १९४१ मध्ये पश्चिम युरोपातलं युद्ध दणावूनपेटलेलं असतानाच हिटरलने अचानक पूर्वेकडे सोव्हिएत रशियावर प्रचंड आक्रमण केलं. अफाट सैन्य आणि अपार युद्धसाहित्य यांच्यानिशी चढवलेल्या या हल्ल्याचं उद्दिष्ट होतं की, हिवाळ्यापूर्वीच सोव्हिएत रशियाचा पार निकाल लावून टाकायचा. त्यामुळे जर्मन सैन्याकडची सगळी हत्यारं, वाहनं, पुरवठा यंत्रणा, युद्धसंघटना, युद्धाचं यंत्र (मशिनरी) एकदम अद्ययावत, संघटित, शिस्तबद्ध होती. याउलट प्रतिकारासाठी घाईघाईने उभारण्यात आलेली सोव्हिएत सेना सर्वच दृष्टींनी मागास होती. जुनाट हत्यारं, जुनाट वाहनं, सैनिकांना धड गणवेश नाहीत. त्यांची धड संघटना नाही की, त्यांच्यात लढण्याची फारशी जिद्दही नाही. अशीच स्थिती सुरुवातीला होती. त्यामुळे सर्व आघाड्यांवर सपाटून मार खात सोव्हिएत सेनेची सतत पिछेहाट होत होती. मात्र, नंतर चित्र बदलत गेलं. सोव्हिएत सेना प्राणपणाने लढू लागली आणि थकलेली, पुरेसे अन्न नसल्यामुुळे उपासमार झालेली, हिवाळ्यात गरम कपडे आणि बूट यांचा नीट पुरवठा न झाल्यामुळे आजारी झालेली जर्मन सेना मार खात खात माघार घेऊ लागली.

या सगळ्या घटनांची पुन:पुन्हा आठवण यावी, अशा घटना उत्तर डोनबास प्रांतातल्या खारकीव्ह आघाडीवर सतत घडत आहेत. मुळात युक्रेनचा या खारकीव्ह शहराचा इतिहास कमालीचा रक्तलांच्छित आहे. १९४१ ते १९४३ या कालखंडात शहरावर ताबा मिळवण्यासाठी जर्मन आणि सोव्हिएत रशियन सैन्यामध्ये चार वेळा भीषण लढाया झाल्या होत्या. त्यातली मे १९४२ मधली लढाई सर्वात हिंसक होती. एकाच लढाईत तीन लाख सोव्हिएत सैनिक ठार झाले आणि जर्मनीचा विजय झाला. ओस्कोल नदीच्या परिसरातल्या दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असणार्‍या या शहरात जेव्हा जर्मन सैन्याने प्रवेश केला, तेव्हा तिथे काय शिल्लक होतं? चांद्रभूमीप्रमाणे सर्वत्र मोठमोठे खड्डे पडलेली भूमी, अर्धवट उभ्या इमारती, प्रेतांचे खच आणि जखमांनी विव्हवळणारे आसन्नमरण नागरिक. आज रशियन आणि युक्रेनियन सेना त्याच खारकीव्ह शहराच्या परिसरात, ओस्कोल नदीच्या खोर्‍यात लढत आहे. एका अर्थाने ते आपल्या पूर्वजांच्या सांगाड्यांवरच लढत आहेत.


WW2-German-soldiers-marching


खारकीव्ह परिसरातल्या स्टारओक्लिस्क नावाच्या लष्करी ठाण्यावर कब्जा करण्यासाठी रशियन सेना आणि युके्रनियन सेना अगदी शर्थ करीत आहेत. या स्टारओक्लिस्कचा इतिहास तर फारच भीषण आहे. दि. १ सप्टेंबर, १९३९ या दिवशी हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं नि दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्यावेळी हिटलर आणि स्टालिन यांच्यात मैत्रीचा तह झालेला होता. त्यामुळे दि. १७ सप्टेंबर, १९३९ रोजी सोव्हिएत सेनाही पूर्वेकडून पोलंडवर तुटून पडल्या.असंख्य पोलीस सेनापती, अधिकारी, सैनिक, पोलीस आणि नागरिक यांना पकडून सोव्हिएत प्रदेशातील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये ठेवण्यात आलं. तसेच या स्टारओक्लिस्कच्या लष्करी छावणीत सुमारे २५ हजार पोलीस सेनाधिकारी आणि पोलीस अधिकारी कैदेत होते. या कैद्यांची जबाबदारी सोव्हिएत अंतर्गत गुप्तचर खात्याकडे होती. त्या खात्याचं नाव ‘एनकेव्हीडी’, जसं परराष्ट्रीय गुप्तचर खातं ‘केजीबी’ तसं हे अंतर्गत गुप्तचर खातं ‘एनकेव्हीडी.’

सोव्हिएत रशियाची ही दोन्ही गुप्तचर खाती अत्यंत क्रूर, अमानुष म्हणून कुख्यात होती. जगातल्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये पापी माणसाला मेल्यानंतर कसकशा नरक यातना भोगाव्या लागतात, त्याची अत्यंत भयंकर वर्णनं आहेत. पण, ही सगळी वर्णनं फिकी पडतील, अशा भयंकर यातना सोव्हिएत रशियाची ही गुप्तचर खाती जीवंतपणीच माणसाला भोगायला लावीत असत, तर या ‘एनकेव्हीडी’च्या अधिकार्‍यांनी मे १९४० मध्ये स्टारओक्लिस्क छावणीतल्या २५ हजार कैद्यांपैकी २२ हजार कैद्यांना थंडपणे गोळ्या घालून ठार मारलं आणि त्यांची प्रेतं जवळच्या कातिन नावाच्या जंगल प्रदेशात फेकून दिली. पुढे जून १९४१ मध्ये जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यावर पोलंड आणि रशियाची मैत्री झाली. “पोलीस सेनापतींनी आमची २५ हजार लढाऊ माणसं आम्हाला परत द्या,” अशी मागणी रशियाकडे केली. स्टालिनने उत्तर दिलं, “लढाईच्या धामधुमीत आम्ही त्या सगळ्यांची केव्हाच सुटका केली. आता ते लोक नेमके कुठे आहेत, कल्पना नाही. बहुधा मांचुरियात असावेत. आम्ही त्यांचा तपास करून सापडतील तसतसे तुमच्याकडे पाठवू.” काय आहे की नाही खास साम्यवादी साखरेच्या पाकात घोळलेली नमुनेदार भाषा! युद्धेतिहासात या कत्तलीला ‘कातिनची कत्तल’ असं नाव आहे.

आज त्याच परिसरात लढणार्‍या रशियन सैन्याला अशा कत्तली उडवणं शक्य नाहीये. पण, जिंकलेल्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर ते युक्रेनियन नागरिकांना हलवून रशियन प्रदेशात, अंतर्भागात पाठवून देत आहेत.एकीकडे युक्रेनियन सेना त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी दाखवलेल्या धैर्यामुळे युरोपीय राष्ट्रांच्या आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे हिमतीने लढत आहे. आता हिवाळा सुरूच आहे. युक्रेनियन सैन्याकडची युद्धसामग्री, गरम कपडे, बूट आणि इतर अत्यावश्यक साधनसामग्री बर्‍यापैकी अद्ययावत आहे, तर दुसरीकडे महाबळी भासणारी रशियन सेना सगळ्याच बाबतीत फुसकी दिसते आहे. त्यांच्याकडची युद्धसामग्री जुनाट, गंजकी आहे. त्यांना गरम कपडे आणि बूटच नव्हे, तर साध्या गणवेशांचीही चणचण भासते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, लढणार्‍या सैनिकांचं नीतिधैर्य आणि उद्दिष्ट. दुसर्‍या महायुद्धाच्या सुरुवातीला दरिद्री भासणार्‍या सोव्हिएत सेनेला स्टालिनने आदेश दिला होता की, ‘पितृभूमीसाठी लढा.’ हा संदेश हृदयापर्यंत पोहोचलेला रशियन कामगार आणि शेतकरी सर्व प्रकारच्या प्रतिकूल स्थितीतही बेभानपणे झुंजला आणि जिंकला. हा बेभानपणा पितृभूमी रशियाच्या रक्षणासाठी होता; साम्यवादाच्या नि श्रमिकांच्या राज्याच्या रक्षणासाठी नव्हता.

आज त्या भूमिकेत युक्रेनियन सेना आहे. त्यांना आपला देश पुन्हा एकदा रशियाचा मांडलिक, आश्रित बनायला नको आहे. उलट गंजक्या भंगारात काढायला झालेल्या हत्यारांनिशी लढणार्‍या रशियन सेनेसमोर कोणतंही उद्दिष्ट नाही. याचा अपरिहार्य परिणाम त्यांच्या नीतिधैर्यावर झालेला आहे . त्यांना लढण्याचा उत्साहच नाही. अगदी अशीच स्थिती सप्टेंबर १९३९ मध्ये होती. स्टालिनच्या आणि सर्वोच्च सेनाधिकार्‍यांच्या आदेशानुसार, सोव्हिएत सेनेने पोलंडवर आक्रमण केलं खरं, पण युद्ध साहित्य आणि अन्य साधनसामग्रीबाबत सोव्हिएत सेना अत्यंत मागास होती. पोलीस सेना त्यांच्याही पेक्षा मागास होती, म्हणूनच केवळ सोव्हिएत सेना जिंकली.

सगळ्यात गंमतीदार भागा आहे तो राजनैतिक संकल्पनांचा. अगदी झार सम्राटांच्या काळापासून रशियन राज्यकर्ते आणि मुत्सद्दी याचं असं म्हणणं आहे की, रशियाच्या आसपासचे सगळे छोटे-मोठे देश हे वास्तविक रशियाचेच आहेत. त्यांनी रशियाचे मांडलिक, आश्रित किंवा फार तर मित्र बनून राहाण्यातच त्यांचं हित आहे. या संकल्पनेला ‘दि रशियन वर्ल्ड’ असं म्हणतात. या संकल्पनेनुसार, झार सम्राटांनी यथाशक्ती साम्राज्यविस्तार केला. त्यांना अफगाणिस्तानमार्गे खाली उतरून हिंदी महासागर आणि भारतावरही कब्जा करायचा होता. झारांची साम्राज्यशाही उलथून टाकून शोषित-वंचित-श्रमिकांचं राज्य म्हणवणार्‍या साम्यवाद्यांनी तर झारांनाही लाज वाटेल, असं साम्राज्य पसरवलं. तेही साम्राज्य कोसळलं. पण, रशियाची साम्राज्यतृष्णा मावळलेली नाही. फक्त आता ‘दि रशियन वर्ल्ड’ असा उघड उघड साम्राज्यवादी शब्दप्रयोग न करता, ते ‘स्फिअर ऑफ इन्फ्लूअन्स - प्रभावक्षेत्र’ असा साजूक शब्दप्रयोग वापरतात. आपले विचारवंत कसे ‘स्वैराचार’ असं उघड न म्हणता ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ असा शब्द वापरतात, अगदी तसंच!तर रशियान राजनेत्यांच्या मते, रशियाने युक्रेनवर सैनिकी आक्रमण केलेलं नाहीच मुळी.

युक्रेन हा आमच्या ‘प्रभावक्षेत्रा’मधला देश आहे. तो मधल्या काळात आमच्यापासून दूर होऊन युरोप-अमेरिकेच्या कच्छपी लागला आहे. या वाट चुकलेल्या मुलाला पुन्हा सन्मार्गावर आणण्यासाठी म्हणजे आमच्या ‘प्रभावक्षेत्रा’ मध्ये आणण्यासाठी आम्ही ही एक ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ ‘विशेष लष्करी कारवाई’ करीत आहोत, इतकंच! आता हे करताना रशियन सैनिकांद्वारे जिंकलेल्या गावंमधल्या नागरिकांना लुटणं, त्यांच्या घरांमधून हव्या त्या वस्तू आणि त्यांच्या पोरीबाळी उचलून नेणं, कुणी विरोधाला उभं राहिल्यास त्याला तिथेच ठार मारून त्याचा मुडदा रस्त्याकडेला फेकून देणं वगैरे लीला का घडत आहेत, याबद्दल रशियन प्रतिनिधी मौन पाळून आहेत. युरोपीय अभ्यासकांच्या मते, युक्रेन लढत असलेली लढाई ही एकप्रकारे संपूर्ण युरोपच्या भवितव्याची लढाई आहे. कारण, युक्रेन देश हा युरोप खंडांच गव्हाचं कोठार मानला जातोे. २०२२ साली युद्ध सुरू असूनही ते २६.६ दशलक्ष टन झालं.









 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.