वार्धक्याचे ओझे झुगारून वयाच्या 66व्या वर्षीही योगप्रसारात कार्यमग्न असलेले योगरत्न श्रीकृष्ण वसंत म्हसकर यांच्याविषयी...
वार्धक्यात अनेकजण अंथरुणाला खिळून अथवा दुसर्याच्या आशेवर जीवन कंठतात. उतारवयातही कार्यरत असलेले श्रीकृष्ण म्हसकर यांचा जन्म दि. 11 एप्रिल 1957 साली ठाण्यात झाला. श्रीकृष्ण यांचे बालपण तसे फारसे आर्थिक संपन्न नव्हते. गावी शेती करणारे वडील मुंबईला आल्यावर आधी छपाई क्षेत्रात, नंतर होमिओपॅथीची ‘प्रॅक्टिस’ करीत. गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत सारे गमवल्याने त्यांच्या कुटुंबाने शून्यातून सारे उभे केले. दोन्ही बहिणी संसारात स्थिरावल्या आहेत. बालपणापासून आई-वडिलांनी उत्तम संस्कार दिल्याने त्याचा फायदा आजही समाजजीवनात होत असल्याचे श्रीकृष्ण सांगतात.
श्रीकृष्ण यांचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण ठाण्यातील सरस्वती मंदिर, नौपाडा मीडल स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे मुंबईत उच्चशिक्षण घेऊन बी.कॉम,एलएलबी, एम.कॉम आणि डिप्लोमा इन फायनान्शिअल मॅनेजमेंट, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग’ची ‘सीएआयआयबी’ या पदव्या मिळवल्या. ‘डिप्लोमा इन ट्रेनिंग अॅण्ड डेव्हलपमेंट’, ’इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा ‘लायन्सिएट कोर्स’ आणि नुकतीच गेल्या वर्षी त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची एमए (योगशास्त्र) पदवी विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण केली. सुरुवातीला बँकेत 20 वर्षे सेवा बजावल्यानंतर, ‘वॉल स्ट्रीट फायनान्स’ येथे ‘व्हाईस प्रेसिडेंट’ म्हणून दोन वर्षे धुरा सांभाळली.
2000पासून टीजेएसबी बँकेत चीफ मॅनेजर म्हणून, बँकेचा विदेश विनिमय विभाग वाढवण्यात प्रमुख सहभाग दर्शविला. टीजेएसबी बँकेतून एक वर्ष अगोदर निवृत्ती घेऊन ‘फॉरेन एक्चेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (फेडाई) येथे ‘व्हाईस प्रेसिडेंट’ व ‘सेक्रेटरी’ या पदावर ते गेली चार वर्षे कार्यरत आहेत. 1990 पासून आजपर्यंत विदेश विनिमयाशी निगडित क्षेत्रात ‘ट्रेनिंग’ देण्यात विशेष सहभाग दर्शवून साधारण 1999 पासून ‘बँकिंग’, ‘इन्शुरन्स’, मानव संसाधन व ‘फॉरेक्स’ या विषयात ‘व्हिझिटिंग फॅकल्टी’ म्हणून विविध महाविद्यालये आणि ‘मॅनेजमेंट’ संस्थांशी ते निगडित आहेत. बँकिंग, फायनान्स, व्यवस्थापन, समुपदेशन आणि शिक्षण या विषयात विशेष रुची असल्याने श्रीकृष्णराव अजूनही कार्यरत आहेत. सध्या एका ‘फूड फॅक्टरी’मध्ये ते व्यवस्थापक आहेत.
श्रीकृष्णरावांचे योग क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. वयाच्या अठराव्या वर्षी ठाण्यातील घंटाळी मित्र मंडळातील गुरुवर्य श्रीकृष्ण व्यवहारे (अण्णा) यांच्याकडून त्यांना योगदीक्षा मिळाली. सर्वच क्षेत्राचा गाढा अभ्यास असल्याने योगक्षेत्राला त्यांनी वाहून घेतले. “साधारण 1980 मध्ये अण्णांचे गुरु का. बा. सहस्रबुद्धे घरी आले असता, माझी योगासने बघून प्रभावित होत उद्यापासून योगाभ्यासाला येण्याचे फर्मान सोडले. मग मागे वळून पाहिलेच नाही,” असे श्रीकृष्णराव सांगतात.
तेव्हापासून सुरु झालेला हा योगप्रवास आजपावेतो अखंड सुरू असून शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार असल्याचा विश्वास ते व्यक्त करतात. या कालावधीत घंटाळी मित्रमंडळाच्या बहुतेक सर्व प्रकल्पांत आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ज्यामध्ये कारागृहातील बंदिजनांसाठी योग आणि आनंदवन येथील दिव्यांग बांधवांसाठी योग यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 1998 साली महिनाभर पु. ल. देशपांडे यांना योग शिकवण्याचे भाग्य त्यांना लाभले. ऑगस्ट 2019 रोजी गुरुवर्य अण्णांच्या निधनानंतर योगविभाग प्रमुख पदाची सर्व जबाबदारी सहयोगी शिक्षकांच्या मदतीने ते पार पाडत आहेत. गेली सुमार दोन दशके मंडळाचा पदविका अभ्यासक्रमही ते घेतात. आजवर सुमारे चार हजार योगशिक्षक तयार करण्याचे भाग्य लाभल्याचे ते सांगतात. योगाची महती ’डोअर टू डोअर’ आणि ‘शोअर टू शोअर’ पोहोचवा, हा परमगुरू सत्यानंद सरस्वती यांचा आदेश त्यांचे मंडळ यथाशक्ती आचरत असून अमेरिकेतही अल्पकालीन योगवर्ग घेतले. ‘कोविड’ काळातही ऑनलाईन योगवर्ग सुरु ठेवले होते.
सर्वांशी जुळवून घेणारे, शांत, प्रसंगी चिडणारे श्रीकृष्णराव योगाभ्यासासोबतच संगीतप्रेमी आहेत. नेहमीच तंदुरुस्त असल्याने बॅडमिंटनही चांगल्या प्रकारे खेळतात, ज्याचा उपयोग क्रीडापटूंसाठीच्या योग प्रकल्पात झाल्याचे ते सांगतात. अण्णांच्या प्रेरणेने त्यांनी लिहिलेल्या ’घछजथ धजॠअ : ङखतए धजॠअ’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन 2012 साली झाले असून आतापर्यंत त्याच्या तीन आवृत्या निघाल्या आहेत. योगाभ्यासाला वाहून घेतलेल्या श्रीकृष्ण म्हसकर यांना ‘न्यू एज योग, मुंबई’ यांच्यातर्फे 2018 साली ‘योगरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
योगामध्ये ‘डॉक्टरेट’ करायचे राहून गेल्याचे ते सांगतात. भारतातील विविध क्रीडाक्षेत्रात योगसाधना उपयुक्त होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही ते व्यक्त करतात.
योगातून निरोगी समाज निर्माण करणार्या आपल्या मंडळाव्यतिरिक्त अन्य संस्थांमधून समाजसेवा तसेच संस्थात्मक कामात सहभागी होता आले नसल्याची कबुली ते देतात. नवीन पिढीला संदेश देताना ते, “आपल्या ध्येयपूर्तीसाठी कोणत्याही तडजोडी करू नका. एकाचवेळी सर्वांना खूश करता येत नाही, याचे भान ठेवा. देशात घेतलेले शिक्षण देशासाठी वापरण्याकडे कटाक्ष असू द्या. आपली संस्कृती महान आहे. ती पुढच्या पिढीकडे योग्य पद्धतीनेच जाईल,” यावर भर देण्याचे आवाहन ते करतात. अशा या ‘योगरत्ना’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!