दि. ७ जानेवारी रोजी ‘जिओ रोटी घर’ संस्थेतर्फे वनवासी कल्याण आश्रमाच्या जांभिवली येथील वसतिगृह व ४५ कुटुंबं असलेल्या एका पाड्यावर सोलापुरी चादरींचेवाटप केले. या सेवा उपक्रमाला वनवासी कल्याण आश्रमाची कार्यकर्ती म्हणून मी उपस्थितहोते. या सेवा उपक्रमाबद्दल माहिती...
सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी यांच्यामार्फत ‘जिओ रोटी घर’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाशी संपर्क साधला होता. ‘जिओ रोटी घर’ विविध आयामातून सामाजिक कार्य करते. संस्थेचे राजेश शहा या सगळ्या सामाजिक कार्यासाठी सदैव पुढे असतात. संस्थेला वनवासी पाड्यातील गरजूंसाठी सेवाकार्य करायचे होते. वनवासी कल्याण आश्रमाच्या साहाय्याने जांभिवली येथील वसतिगृह आणि पाड्यावर सेवा उपक्रम राबवायचे ठरले. या उपक्रमात ‘जिओ रोटी घर’चे कार्यकर्ते सुभाष आंबोकर, आंबोकर, झेंडे सहभागी झाले होते. वनवासी कल्याण आश्रमातर्फे मी व नरेंद्र आंबुर्ले हे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी १०.३० वाजता मुंबईहून निघालो. वसतिगृहात पोहोचल्यावर मुलांनी सुहास्यवदनाने आमचे स्वागत केले. ’राष्ट्रपती पुरस्कार’ प्राप्त ठमाताई पवार यांचीही केंद्रावर भेट झाल्यामुळे खूपच आनंद झाला.
गेल्यागेल्याच दिसल्या त्या मुलांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत ठेवलेल्या चपला. त्या चपला ठेवण्याच्या पद्धतीवरुनच केंद्रातील शिस्तीची चुणूक दिसली. सभागृहात गेलो तर तिथे सर्व मुले शिस्तीत बसली होती. उपस्थित पाहुण्यांना मी ठमाताई पवार यांचा परिचय करुन दिला. अर्थात, ठमाताईंचे कार्य इतके मोठे आहे की, त्यांच्या कार्याचा सांगोपांग आढावा घेता आला नाही. त्यानंतर मुंबईहून गेलेल्या कार्यकर्त्यांनी मुलांना आपला स्वतःचा परिचय करुन दिला. पाहुण्यांसमोर मुलांनी-
‘सर्व तुम्ही आश्रमात या. आश्रमात हाय काय, आश्रमात आल्याबिगर उमगायचं नाय नाय’हे कल्याण आश्रमाच्या कार्याचे वर्णन करणारे गीत गायले. वसतिगृह प्रमुख ईश्वर चौधरी यांच्या पत्नी पूनम चौधरी यांनी वसतिगृहाची स्थापना केव्हा, कशी झाली, याबद्दल माहिती सांगितली. तसेच वसतिगृहात राहून शिकून गेलेली मुले आज बँका, पोलीस खात्यात, सरकारी कार्यालयामध्ये उच्च पदांवर नोकरीस असल्याचे सांगितले. हे माजी विद्यार्थी संस्थेचे कार्यकर्ते म्हणूनही कार्यरत आहेत.यानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्याने त्यांची दिनचर्या कथन केली. मुले सकाळी ५.३०ला उठतात. त्यानंतर सर्व आन्हिके आटोपून प्रातःस्मरण करतात. त्यानंतर योगासने करुन अंघोळ, आरती, चहा, नाश्ता झाल्यावर एक ते दीड तास अभ्यास करतात. ११ ते ५ शाळा. शाळेतून आल्यावर दूध, नाश्ता. त्यानंतर शाखा. शाळेचा अभ्यास.
८ वाजता जेवण करुन राहिलेला अभ्यास पूर्ण करणे व पसायदान म्हणून दीपनिर्वाण करून झोपणे, अशी मुलांची दिनचर्या ऐकून खूप छान वाटले. यानंतर मुलांना सोलापूर चादर व फळांचे वाटप केले. पूनमताईंनी बनवलेल्या सुग्रास भोजनाचा मुलांबरोबर आनंद घेतला. जेवणानंतर ठमाताईंनी ‘आपुल्या ध्येयावरी असू दे दृष्टी तुझी रे पुरी’ हे आपल्या ध्येयावर कशी निष्ठा ठेवावी, याविषयी सुंदर गीत गाऊन दाखवले. पाहुण्यांना वसतिगृहाच्या आवारात लावलेली आंबा, पेरु आदी फळझाडे दाखवली. ईश्वर पवार यांनी गोमय खत व गोमयची झाडांवर फवारणी केल्यामुळे झाडांची जोमाने वाढ होते व फळेही मोठी व चविष्ट येतात, असे सांगितले. पूनमताईंनी आवारात मिरच्या, टोमॅटो, काही भाजांच्या वेली लावल्या असल्याचे सांगितले. ईश्वर पवार व ठमाताईंसोबत पाड्यावर जाऊन प्रत्येक घरातील एका व्यक्तीला सोलापूर चादरीचे वाटप करुन सर्वांचा निरोप घेऊन संध्याकाळी ४ वाजता परतीच्या वाटेला लागलो. ’जिओ रोटी घर’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भविष्यात जमेल, तशी वनवासी कल्याण आश्रमाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
-सुनीता आंबुर्ले