मुंबई : कार्डिलीयानंतर मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर आणखी दोन भव्य प्रीमियम लक्झरी क्रूझ सेवा लवकरच सुरू होणार असून यासंदर्भात मुंबई पोर्ट ॲथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपनीबरोबर बैठक पार पडली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान परवानगी मिळाल्यानंतर या दोन क्रूझ उन्हाळ्यात दाखल होणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
मागील वर्षी मुंबईत देशातील पहिली आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद पार पडली होती. त्या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून भारतामध्ये क्रूझ सुरू करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार आता मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर आणखी दोन लक्झरी क्रूझ सुरू करण्याच्या हालचालींचा वेग वाढला असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मुंबई पोर्ट ॲथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या दोन कंपन्यांनी मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर क्रूझ चालवण्याची अनुमती मागितली असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस युद्ध पातळीवर उभारण्यात येत असून जुलै २०२४ पर्यंत हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याची माहिती समोर आलाय आहे. सध्या ४० टक्के क्रूझ टर्मिनसचे काम पूर्ण झाले असून आतापासून देशांतर्गत क्रूझ सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून विचारणा करण्यात आल्याचेही मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान सध्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिसवरून मुंबई ते गोवा, मुंबई ते लक्षद्वीप आणि मुंबई ते कोचीदरम्यान कार्डिलिया क्रूझची सेवा सुरू असून एकूण ११ पॅसेंजर डेक आणि ७९६ केबिन्स असलेल्या या भव्य कार्डिलिया क्रूझमध्ये एकाच वेळी तब्बल १ हजार ८४० हून अधिक पाहुण्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे.