नेपाळ... हिमालयाच्या कुशीत वसलेला एक निसर्गरम्य देश. जितकी निसर्गाने मुक्तहस्ते या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये उधळण केली, तितकीच सांस्कृतिक संपन्नता हेही या चिमुकल्या देशाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. हिंदू आणि बौद्ध संस्कृतीच्या दर्शनासाठी देशविदेशातून पर्यटक नेपाळला पसंती देतात. पण, जेव्हापासून नेपाळने अधिकृत हिंदूराष्ट्राचा दर्जा संविधानातून त्याज्य करून सेक्युलरवादाचा बुरखा पांघरला, तेव्हापासून मात्र या देशाची सांस्कृतिक घसरणच झालेली पाहायला मिळते. त्याहीपेक्षा भयावह बाब म्हणजे, याच सेक्युलॅरिझमच्या नावाखाली नेपाळच्या दर्याखोर्यांमध्येही आता मोठ्या संख्येने चर्च आणि क्रॉस उभे राहिले.यावरून प्रश्न पडावा की, नेपाळमध्ये तर धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आहे, मग नेपाळमधील हिंदू, इतर स्थानिक जनजाती यांना पशुपतीनाथापेक्षा येशू ख्रिस्त अचानक कसा जवळचा वाटू लागला?
नेपाळमध्ये असा चमत्कार एकाएकी घडला का? यांसारख्या प्रश्नांचा शोध घेतला असता, नेपाळच्या शीत हिमशिखरांआड दडलेली ख्रिस्तीकरणाची संथ प्रक्रिया भविष्यात या राष्ट्रात सांस्कृतिक भूकंप घडवून आणेल की काय, अशीच शंका उपस्थित व्हावी.विषयाच्या अधिक खोलात शिरण्यापूर्वी फक्त नेपाळमधील ख्रिश्चन धर्मीयांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया, जेणेकरून या ख्रिस्तीकरणाच्या गतीचा प्रारंभीच अंदाज यावा. १९५१ साली नेपाळमध्ये एकही ख्रिश्चन व्यक्ती असल्याची नोंद नाही. पण, १९६१ साली ही संख्या ४५८ असल्याचे समजते. पुढे २०११ साली हीच आकडेवारी ३ लाख, ७६ हजार आणि शेवटच्या जनगणनेनुसार, ही संख्या ५ लाख, ४५ हजारांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचाच अर्थ इतर कोणत्याही धर्मापेक्षा नेपाळमधील ख्रिस्तीकरणाचा वेग हा केवळ थक्क करणारा आहे, हेच अधोरेखित होते.आता हिंदूराष्ट्र आणि कट्टर हिंदू बांधव असलेल्या नेपाळींमध्ये ही जिझसशी कथित जवळीक अशी एकाएकी फोफावली का? तर नक्कीच नाही.
नेपाळमध्ये अगदी पद्धतशीरपणे मिशनरींचे एक जाळे उभारण्यात आले. यापैकी बहुतांशी मिशनरी हे दक्षिण कोरियाचे. म्हणजे नाकीडोळी नेपाळींसारखेच दिसणारे म्हणून या धर्मांतरणाच्या कार्यासाठी द. कोरियामधील मिशनरींची मोठी फौज तैनात करण्यात आली. त्यातही यापैकी बहुतांशी मिशनरी, पास्टर नेपाळमध्ये विद्यार्थी व्हिसा, पर्यटक व्हिसा किंवा व्यावसायिक व्हिसाचा वापर करून दाखल होतात. म्हणजे वरकरणी हे साधे द. कोरियन नागरिक वाटत असले तरी झग्याआड धर्मांतराचेच कार्य त्यांच्याकडून अविरतपणे सुरू असते. काहींनी सामाजिक संस्थांच्या नावाखाली नेपाळ सरकारकडून जमिनीदेखील खरेदी केल्या आणि कोरियन चर्च पैसे मोजून याच जमिनींवर टुमदार चर्च डौलाने उभे करते. यापैकी काही जण तर चक्क हॉटेल चालवतात, तर काही शिक्षक म्हणूनही शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत. परिणामी, नेपाळसारख्या छोट्याशा हिंदूबहुल राष्ट्रांतही एका सर्वेक्षणानुसार, चर्चची संख्या ही ७ हजार, ७५८ इतकी असून आगामी काळात ती दहा हजारांचा टप्पाही सहज ओलांडेल.
भारतातील वनवासींना ज्याप्रमाणे या मिशनरींकडून लक्ष्य केले गेले, तशीच धर्मांतरणाची पद्धत नेपाळमध्ये अवलंबली गेली. नेपाळमधील दलित, वनवासी, गरीब, मागास यांसारख्या समाजातील दुर्लक्षित घटकांना सुखसंपन्नतेचे आमिष दाखविले जाते. ख्रिस्ती धर्म स्वीकारलात की, अपमानाचे, हेटाळणीचे दिवस संपतील. जिझसने तुमच्यासाठी दरवाजे खुले केले आहेत. तुमच्या आयुष्यात हा मोठा चमत्कार असून हीच ती वेळ, यांसारख्या फसव्या आश्वासनांच्या जाळ्यात हे बांधव लीलया फसतात आणि त्यांची पावले चर्चकडे वळतात.
नेपाळमधील ख्रिस्तीकरणाचा हा वेग निश्चितच चिंताजनक असून याविरोधात नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनीही आवाज उठविला आहे. एवढेच नाही, तर नेपाळमधील धर्मांतरण कायदा हा कुचकामी ठरला असून त्याची अंमलबजावणीही होताना दिसत नाही. त्यामुळे नेपाळला पुन्हा एकदा हिंदूराष्ट्र घोषित करण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरलेला दिसतो. पण, एकूणच नेपाळमधील राजकीय अस्थिरता, माओवाद्यांचे वर्चस्व, गरिबी, बेरोजगारीची समस्या पाहता ख्रिश्चन धर्मांतरणाला आळा घालणे हे येथील सरकारसमोरही एक मोठे आव्हानच. पण, हे षड्यंत्र वेळीच गोठवले नाही, तर नेपाळ हे हिमालयातील नवे व्हॅटिकन म्हणून उदयास येईल, तो दिवस दूर नाही...