महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : शुभम पाटील, महेश फुलमाळी, शुभम थोरात स्पर्धेबाहेर

    13-Jan-2023
Total Views |

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा


पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व अस्थायी समितीच्या वतीने आणि संस्कृती प्रतिष्ठान आयोजित ६५ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी गादी व माती विभागाच्या ६५, ७४, ९२, ७० आणि ९७ किलो वजनी गटांच्या कुस्त्यांसह महाराष्ट्र केसरी किताबाच्या ८६ ते १२५ किलो वजनी गटातील अनेक प्रेक्षणीय कुस्त्या झाल्या.

तत्पूर्वी, झालेल्या गादी विभागाच्या ६५ किलो वजनी गटातील पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरचा आंतरराष्ट्रीय मल्ल सोनबा गोंगाणे याला कोल्हापूरच्या शुभम पाटीलने चांगलेच झुंजविले होते. मात्र अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेल्या सोनबा याने शुभम पाटीलवर ३-२ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पुणे जिल्ह्याच्या केतन घारे याने तर अवघ्या अर्ध्या मिनिटात सोलापूरच्या तुषार देशमुखचा १०-० अशा फरकाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

७४ किलोच्या उपांत्य फेरीत लातूरच्या आकाश देशमुखाने अहमदनगरच्या महेश फुलमाळीचा ८-७ ने तर सोलापूरच्या रविराज चव्हाणने पुणे शहरच्या शुभम थोरातचा ९-२ अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ९२ किलोच्या उपांत्य फेरीत पिंपरी चिंचवडच्या सौरभ जाधवने ठाण्याच्या धनंजय पाटीलचा ४-१, तर सोलापूरच्या कालिचरण सोनवलकरने परभणीच्या जयजीत गितेला १२-१ आशा फरकाने एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
त्याचप्रमाणे माती विभागातील ६५ किलोच्या उपांत्य फेरीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय युवा मल्ल सुरज कोकाटे याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कोल्हापूरच्या कुलदीप पवारला चारीमुंड्या चितपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीत लातूरचा राष्ट्रीय मल्ल पंकज पवार आणि सोलापूरच्या अनिकेत मगरचे ६-६ असे समान गुण झाले होते. मात्र सुपर टेक्निक (उच्च कलात्मक) आधारे विजय झाल्याने अंतिम फेरीत प्रवेश केला.
७४ किलोच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या साताप्पा हिरगुडेने पुण्याच्या शिवाजी टकलेला चारीमुंड्या चितपट करून अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत सांगलीच्या श्रीकांत निकमने अहमदनगरच्या ऋषिकेश शेळकेचा ८-५ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. ९२ किलोच्या उपांत्यफेरीत सोलापूरच्या श्रीनिवास पाथरुटने कोल्हापूरच्या रोहन रंडे याचा १०-० असा तर पुणे जिल्ह्याच्या बाबासाहेब तरंगे याने नाशिकच्या रोहन परदेशीचा ११-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

 महाराष्ट्र केसरी लढती सायंकाळी उशीरा सुरुवात


महाराष्ट्र केसरी किताबाच्या दोन्ही विभागातील कुस्त्या सायंकाळी उशीरा होणार आहेत. असे असले तरी कुस्ती शौकीनांनी दुपारी तीन वाजल्यापासून स्टेडियममध्ये आपली हजेरी लावली. लढती व्यवस्थितपणे पहाता याव्यात यासाठी स्टेडियम मधील मोक्याच्या जागा पकडण्यासाठी लढतींना सुरूवात होण्यापूर्वीच गर्दी केली होती. पुढील लढती या महाराष्ट्राचा नवीन ‘केसरी’ ठरविणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती 

महराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आयोजक मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, हिंदकेसरी अभिजित कटके, माजी खासदार अशोक मोहोळ, आदी मान्यवरांनी यावेळी स्पर्धेला हजेरी लावली. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड व लातूरचा शैलेश शेळके यांच्यात सलामीची लढत.