नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली.
एमव्ही गंगा विलास क्रूझवर भारताचा वारसा आणि त्याच्या आधुनिकतेचा अनोखा मिलाफ याचे दर्शन घडेल असे सांगून पंतप्रधानांनी क्रूझ पर्यटनाच्या नवीन युगाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, यामुळे देशातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. केवळ परदेशी पर्यटकच नाही तर अशा अनुभवासाठी विविध देशांमध्ये प्रवास केलेले भारतीय आता उत्तर भारतात याचा आनंद घेऊ शकतात. क्रूझ पर्यटनाचा खर्च तसेच जागतिक दर्जाचा अनुभव लक्षात घेऊन क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी देशातील अन्य अंतर्देशीय जलमार्गांवरही अशाच प्रकारचा अनुभव देणारी सेवा नजीकच्या काळात सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारताच्या वाहतूक क्षेत्राला नदीमार्गाने प्रवास करण्याचा समृद्ध इतिहास लाभलेला असून देखील वर्ष २०१४ पूर्व काळात अशा प्रकारच्या जलमार्गाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आला ही बाब अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, २०१४ नंतर भारत स्वतःच्या प्राचीन सामर्थ्याचा उपयोग आधुनिक भारताच्या उभारणीसाठी करून घेत आहे. देशातील मोठ्या नद्यांच्या प्रवाहातील वाहतुकीसाठी जलमार्ग विकसित करण्याच्या उद्देशाने नवीन कायदा तयार करून तपशीलवार कृती योजना आखण्यात आली आहे. वर्ष २०१४ मध्ये देशात केवळ ५ राष्ट्रीय जलमार्ग अस्तित्वात होते तर आता देशात एकूण १११ राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्यात येत असून त्यापैकी दोन डझन जलमार्गांचे परिचालन सुरु देखील झाले आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच, आठ वर्षांपूर्वी नद्यांतील जलमार्गांच्या वापरातून केवळ ३० लाख टन मालाची वाहतूक होत होती त्यात आता तीन पटींनी वाढ झाली आहे असेही ते म्हणाले.