अदृश्य ‘लव्ह जिहाद’विरोधी लढ्यासाठी सज्ज व्हा : योगिता साळवी

दै.‘मुंबई तरुण भारत’च्या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

    12-Jan-2023
Total Views |

Yogita Salvi

 
नाशिक : ‘’संस्कारक्षम पिढी घडण्याच्या काळातच अनेक युवती ’लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अलगदपणे अडकतात. भूलथापांना बळी पडून स्वतःसह पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असून, या अदृश्य ‘लव्ह जिहाद’विरोधी लढ्यासाठी आता सज्ज व्हा,” असे आवाहन दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले.
 
 
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथील पी. पी. पाटील महाविद्यालयात दै. ‘मुंबई तरुण भारत’ व भारतीय किसान संघ आयोजित ’माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ या उपक्रमांतर्गत साळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. साळवी पुढे म्हणाल्या, ”सोशल मीडिया’चा अतिरेकी वापरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्याभासी दुनियेत अनेकांशी ओळख होत आहेत. त्यामुळे नको ते प्रसंग उद्भवत आहेत. तरुणी ’लव्ह जिहाद’सारख्या घटनांना बळी पडत असून, त्याचे भीषण दूरगामी परिणाम समाजावर दिसून येत आहे.” असे साळवी म्हणाल्या. ‘’भारतात स्वातंत्र्य आहे मात्र या स्वातंत्र्याच्या नावाखाली तरूणींनी स्वैराचारी पद्धतीने वागू नये,” असे आवाहन करत “संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनीदेखील सजग रहाणे गरजेचे आहे,” असे साळवी यांनी नमूद केले.

 
”आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लव्ह जिहादसारखी प्रकरणे घडत असून, त्याविरोधात आता आक्रमक होण्याची गरज आहे. मुलाची पत्रिका पाहण्यापेक्षा त्याचे प्रथम आधारकार्ड बघा, श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, रुबिका पहाडीया यांसारखे हत्याकांड रोखण्यासाठी स्वतःला आणि स्वतःच्या धर्माला ओळखा,” असे आवाहनही साळवी यांनी यावेळी केले.
 
रा. स्व. संघाचे कार्यवाह अरूण मोरे, भारतीय किसान संघाच्या कपिला मुठे, उपाध्यक्ष रामदास पाटील, जिल्हा कार्यकारीणीचे अनंत मोरे, माजी अध्यक्ष सुभाष तिडके, संपर्कप्रमुख प्रतिमा मोरे, स्वयंरोजगार प्रमुख शारदा मोरे, महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप अनारसे, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता जोशी, कल्पना शिंदे, मंजुषा यादव, कल्पना शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
 
‘महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक जागरूकता’‘ यावर दै. ‘मुंबई तरूण भारत’ने राबविलेले अभियान समाजदृष्टीने महत्वाचे आहे. ‘लव्ह जिहाद’, महिलांचे हक्क आणि अन्य सामाजिक प्रश्न यांसह विविध विषयांची दखल घेऊन सरकार दरबारी हक्काने प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ तरूण भारतने उपलब्ध करून दिले आहे.


- रामदास पाटील, भारतीय किसान संघ, उपाध्यक्ष