मुंबई (प्रतिनिधी) :बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा एकदा दोन वाघांचे आगमन होणार आहे. राष्ट्रीय उद्यानाची टीम चंद्रपुरवरून वाघाची एक जोडी घेऊन निघाली असून गुरूवारी सकाळी ती मुंबईत दाखल होईल.
राज्यातील सर्वाधिक वाघांची संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळून येते. येथील वनक्षेत्राच्या बरोबरीनेच शहराच्या आसपासच्या भागातही वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या आसपासच्या भागात मानव-वाघ संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावर राज्य वन्यजीव मंडळाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने काही उपाय सुचवले. त्याअंतर्गत चंद्रपूर शहराच्या आसपास वाढणाऱ्या वाघांच्या संख्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिवास सुधारणेबरोबरच काही वाघांना त्या परिसरातून हलवण्याचेही सुचित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आत चंद्रपूरातील वाघाची एक जोडी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात येणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक या जोडीला चंद्रपूरवरून घेऊन निघाले आहे. गुरूवारी सकाळपर्यंत त्यांचे मुंबईत आगमन होईल. मध्यांतरी गुजरातकडून घेतलेल्या सिंहाच्या एका जोडीच्या बदल्यात राष्ट्रीय उद्यानाने त्यांना वाघाची एक जोडी दिली होती. आता चंद्रपूरातून वाघाची जोडी दाखल झाल्यानंतर उद्यानातील पिंजराबंद वाघांची संख्या सहा होणार आहे. चंद्रपूरातून वाघाची जोडी ही प्रजननाच्या हेतूने मुंबईत आणण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानातील एका अधिकाऱ्याने दिली.