नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगातील सर्वात लांब नदीवरील समुद्रपर्यटनासाठी सज्ज क्रुझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याचप्रमाणे वाराणसीमध्ये गंगापात्रात टेंट सिटीच्या उद्घाटनासह १ हजार कोटींहून अधिक अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीदेखील करणार आहेत.
एमव्ही गंगा विलासविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, गंगा विलास हे जगातील सर्वात लांबीचे नौकेद्वारे (क्रुझ) होणारे नदीपर्यटन आहे. याद्वारे आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडून घेण्याची आणि भारताच्या विविधतेचे सुंदर पैलू शोधण्याची अनोखी संधी याद्वारे प्राप्त होणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी एमव्ही गंगा विलासविषयी माहिती देणारी चित्रफीतदेखील ट्विट केली आहे.
एमव्ही गंगा विलास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आपला प्रवास सुरू करेल आणि बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढपर्यंत पोहोचण्यासाठी भारत आणि बांगलादेशमधील २७ नदी प्रणाली पार करून ५१ दिवसांत अंदाजे ३ हजार २०० किमी प्रवास करेल. गंगा विलासमध्ये सर्व लक्झरी सुविधांसह तीन डेक आहेत, ३६ पर्यटकांची क्षमता असलेले १८ सूट आहेत. पहिल्या फेरीत स्वित्झर्लंडचे २३ पर्यटक संपूर्ण सहलीसाठी जाणार आहेत. क्रुझच्या ५१ दिवसांच्या प्रवासाचा कार्यक्रम जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आखण्यात आली आहे. या सहलीमुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्मात रमण्याची संधी मिळेल.
टेंट सिटी ठरणार पर्यटनासाठी गेमचेंजर
या प्रदेशातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी गंगा नदीच्या काठावर टेंट सिटी साकारण्यात आली आहे. हा प्रकल्प शहरातील घाटांच्या समोर विकसित करण्यात आला आहे. ज्यामुळे वाराणसीमध्ये राहण्याची सोय होईल. हे वाराणसी विकास प्राधिकरणाने सार्वजनिक खाजगी भागीदारी स्वरूपात विकसित केले आहे. जवळपासच्या विविध घाटांवरून बोटीतून पर्यटक टेंट सिटीमध्ये पोहोचतील. दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत टेंट सिटी सुरू राहणार असून पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने तीन महिने तंबू काढण्यात येतील.
जल पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन - पायाभरणी
पंतप्रधान यावेळी पश्चिम बंगालमधील हल्दिया मल्टी मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील चार ठिकाणी फ्लोटींग जेटीचे उद्घाटन, बिहारमध्ये पाच सामुहिक घाटांची पायाभरणी, गुवाहाटीमध्ये ईशान्य भारतासाठी सागरी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन, पांडू टर्मिनट येथे जहाज दुरूस्ती सुविधेची पायाभरणीदेखील पंतप्रधान मोदी करणार आहेत.