हसन मुश्रीफांना ती 'स्क्रिप्ट' कोणी दिली ?

    11-Jan-2023
Total Views |
 
Hasan mushrif
 
 
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर भुमिका मांडली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्यापूर्वी चिठ्ठी काढल्याचे दिसले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या भुमिकेमागे कोणाची स्क्रिप्ट होती ? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.
 
 
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर, मुलीच्या घरावर, सरसेनापती संताजी घोरपडे या मुलांच्या कारखान्यावर आणि पुण्यातील काही व्यक्तींच्या घरावर ईडीने छापे टाकले. याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले, "आधी नवाब मलिक झाले, माझ्यावर कारवाई होणार आहे,आता किरीट सोमय्या म्हणतात की, अस्लम शेख. म्हणजे,विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टार्गेट करण्याचं ठरवलं आहे की काय? अशी शंका यातून निर्माण होते."
 
 
"मी सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करेनच परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना मी शांततेचं आवाहन करतो. चारच दिवसांपूर्वी कागल तालुक्याचे भाजपचे नेते यांनी दिल्लीत अनेक वेळा चकरा मारुन माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरु केले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की, चारच दिवसात मुश्रीफांवर ईडीची कारवाई होणार आहे.अशा पद्धतीने नाउमेद करण्याचं काम हे जे चाललं आहे ते अतिशय गलिच्छ राजकारण चाललं आहे. कारण जर राजकारणात अशा पद्धतीने कारवाया होत असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे. "असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या छापेमारीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.