नृत्य‘तनुश्री’

    08-Sep-2022   
Total Views |
 

tanushree
 
 
 
बालवयातच नृत्याचे धडे गिरवून शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत झालेल्या तनुश्री सुहास दिवाण या ठाण्यातील हरहुन्नरी नृत्यांगनेविषयी...
 
 
मुंबईत मुलुंड येथे १९८७ साली जन्मलेल्या तनुश्रीचे बालपण ठाण्यात गेले. दिवाण कुटुंब तसे सुखवस्तू. तनुश्रीचे वडील स्टेट बँकेचे व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले, तर आई रोहिणी या ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त असून सध्या एका स्थानिक दैनिकात पत्रकारिता करतात. तनुश्रीची धाकटी बहीण तेजश्री विज्ञान शाखेतील पदवीधारक असून, तिने पर्यटन क्षेत्राची कास धरली आहे. अशा चौकोनी कुटुंबात आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या तनुश्रीला बालपणीपासूनच नृत्याची आवड होती. वयाच्या साडेचार वर्षी लहान शिशुमध्ये शिकत असतानाच तिने ‘भरतनाट्यम’चे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
 
 
 
पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण डॉ. बेडेकर विद्यामंदिर येथे घेत असताना इयत्ता पाचवीत शाळेच्या स्नेहसंमेलनात मंगळागौरीवर आधारित नृत्याची पहिली ‘कोरीओग्राफी’ तिने केली आणि पाचही तुकडीतून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. इयत्ता नववीतअसताना गुरू उर्मिला अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तनुश्री भरतनाट्यम विशारद उत्तीर्ण झाली. नृत्य शिकत असतानाच ‘चिल्ड्रन्स थिएटर’ आयोजित नृत्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय अशी बक्षिसे मिळवली. पुढे अकरावी ते बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण तिने श्री माँ बालनिकेतन शाळेमध्ये घेतले. त्याचवेळी ओडिशा येथे राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रीय नृत्य स्पर्धेत तिला चेअरमन अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले.
 
 
 
बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी लोणावळा येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय नृत्य स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्या महाविद्यालयाला मिळवून दिली. नृत्यकलेचे एक एक आयाम पार करीत असतानाच एका किरकोळ दुर्घटनेने तिच्या नृत्याच्या सरावात खंड पडला. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात ऐन दिवाळीत घरातच पडून उजव्या पायाच्या घोट्याचे ‘डिसलोकेशन’ आणि ‘फ्रॅक्चर’ झाले. हा अपघात तनुश्रीसह तिच्या कुटुंबासाठी वेदनादायी ठरला. २०१२-१३ मध्ये ऑपरेशन झाले.
 
 
 
पायाच्या ऑपरेशनच्या दिवशी ऑपरेशन टेबलवरच तिने डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, भविष्यात मी नाच करू शकेन ना? मला भरतनाट्यम करता येईल ना?” त्यावेळी डॉक्टरांनी सध्या एक दीड वर्ष तरी काहीच करता येणार नाही. असे सांगितल्याने तनुश्री हबकली. ‘माझी नृत्यकला माझा श्वास आणि ‘फॅशन’ आहे, मी पुन्हा कधी उभी राहणार आणि कधी नृत्य करणार,’ हा एकच प्रश्न तिच्या मनात काहूर माजवत होता. कारण, उजव्या पायात २४ टाके, स्क्रू आणि दोन रॉड होते. जे वर्षभरात हळूहळू काढण्यात आले. त्या आठवणींनी तनुश्री गहिवरून जाते.
 
 
 
भरतनाट्यमसारखी शास्त्रीय नृत्यशैली जिथे (कल) हा भाग महत्त्वाचा असतो. त्याच ठिकाणी शस्त्रक्रिया होऊन पायाचा भाग हलका झाल्याने दीड-दोन वर्षे तरी तिला नृत्य सादर करण्यास मनाई केली होती.परंतु, नृत्याची आवड आणि जिद्द तिला स्वस्थ बसून देत नव्हती. म्हणून कोरिओग्राफर नकुल घाणेकर यांच्या ‘डिफरन्ट स्ट्रोक’मधून पाश्चात्य नृत्य शैलीतील लॅटिन नृत्य अंतर्गत ‘बॉली हिपहॉप’, ‘रूयेदा साल्सा’, ‘मिरेंगे’, ‘बछाटा’ आदी नृत्यप्रकार अवगत करत गेली. यापैकी आफ्रिकन ‘बछाटा’ नृत्यप्रकार ती स्वतः कोरिओग्राफ करते. याच ‘डिफरन्ट स्ट्रोक’मध्ये २०१७ पासून ‘ट्रेनर’ म्हणून शिकवत असून विद्यार्थी म्हणूनही कथ्थक नृत्याचे धडे गुरू नकुल घाणेकर यांच्याकडून शिकत असल्याचे तनुश्री सांगते.
 
 
 
२०१६ मध्ये जयपूर येथे राष्ट्रीय पातळीवर पार पडलेल्या शास्त्रीय नृत्यशैली प्रकारात आठ मिनिटांच्या भरतनाट्यम नृत्यामध्ये तिने प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक पटकावून स्वतःला सिद्ध केले. या यशामुळे तिच्यातील उमेद पुन्हा जागृत झाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. ठाण्यातील ‘टॅग’ या संस्थेत सलग २५ मिनिटांचा भरतनाट्यम नृत्यप्रकार सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर उत्तर प्रदेश येथील अलिगढमध्ये शास्त्रीय तसेच लोकनृत्य स्पर्धेत भाग घेऊन लावणी नृत्यात रौप्यपदक मिळवले, तर हैदराबाद येथे उपशास्त्रीय नृत्यस्पर्धेत कास्य पदकाला गवसणी घातली.
 
 
 
नृत्याचा हा विलोभनीय प्रवास सुरू असताना ठाणे, मुंबई येथील नामांकित आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाच वर्षं तिने नृत्यशिक्षिकेची भूमिका पार पाडली आहे. याशिवाय ठाण्यातील ‘उपवन संस्कृती आर्ट फेस्टिवल’ आणि ‘संघर्ष फेस्टिव्हल’मध्येही तिने सहभाग नोंदवला. तिच्या या कामाची पोचपावती म्हणून ऐन ‘कोविड’ काळात शाळा बंद असताना एका शैक्षणिक संस्थेत नृत्यविभागाची प्रमुख म्हणून दोन वर्षे ऑनलाईन काम करण्याची संधी तिला मिळाली. सध्या ती ‘ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल’मध्ये ‘प्लॅनर’ या शैक्षणिक अभ्यासक्रमाची ‘डान्स प्लॅनर’ म्हणून संपूर्ण देशाच्या शाखेत कार्यरत आहे. याच दरम्यान २०२० मध्ये ‘झी मराठी’वरील ‘रियालिटी शो’मध्ये निवड करण्यात आलेल्या पहिल्या 16 मध्ये तिची निवड झाली. अशा या हरहुन्नरी नृत्य ’तनुश्री’ला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.