राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत!

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची निवासस्थानी घेतली भेट

    03-Sep-2022
Total Views |

Ajit Doval
 
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत घातपात घडवण्याच्या काही धमक्या आल्या होत्या. तसेच श्रीवर्धन येथे सापडलेल्या संशयित बोटीमुळे तेव्हापासूनच मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. या घटनांच्या पार्श्वभूमिवर अजित डोवाल मुंबईत आल्याची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान डोवाल यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, तर राजभवनावर जाऊन राज्यपालांचीही भेट घेतली.
 
डोवाल यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील वरिष्ठ आयपीएस ऑफिसर उपस्थित होते. या बैठकीपूर्वी त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे अजित डोवाल यांचा मुंबई दौरा आणि भेटीगाठींचं सत्र यामुळे राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे.