कथित पर्यावरण प्रेमाच्या मुद्द्यावरुन युवराज पुन्हा तोंडघशी!
अमित साटम यांचे आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र
28-Sep-2022
Total Views |
मुंबई : 'आपल्या कर्तृत्ववान कामगिरीसाठी आपले अभिनंदन. मुंबई क्लायमेटच्या भूलथापा मारण्याशिवाय आणि जनतेच्या पैशावर परदेश दौरे करण्याशिवाय तुम्ही काहीही केलेले नाही. पितृकृपेने तुमच्या पदरात पर्यावरण मंत्री पद पडले होते. मात्र तुम्ही पर्यावरण मंत्री असताना केलेल्या कर्तृत्वामुळे न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला बारा हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे आपण बजावलेल्या कामगिरीसाठी आपले मनापासून अभिनंदन,' या शब्दांत भाजपचे आमदार अमित साटम यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे.
ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात अमित साटम म्हणाले की, 'विश्वासघाताने, युतीधर्म तोडून आणि हिंदुत्वाशी तडजोड करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण पर्यावरण मंत्री होतात. मात्र, तुम्ही मंत्रिपदावर असताना केलेल्या कामगिरीमुळेच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला तब्बल १२ हजार कोटी दंड ठोठावला आहे. मुंबईकरांच्या जीवाला हानिकारक असलेला घनकचरा आणि सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्याने हरित लवादने हा दंड ठोठावला. त्यामुळे एकप्रकारे तुमच्या तुमच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे,' अशी टीका साटम यांनी केली आहे.
आता युरोपला जाण्याची गरजच नाही
कचरा व्यवस्थापनावर बोलताना अमित साटम म्हणाले की, 'मुंबईसाठी क्लायमेट ऍक्शन प्लॅनच्या भूलथापा मारण्याशिवाय आणि जनतेच्या पैश्यावर परदेश दौरा करण्याशिवाय आपण काहीही साध्य केले नाही. मलमिश्रीत काळेपाणी समुद्रात सोडून मुंबईच्या समुद्राला मात्र तुम्ही काळासमुद्र करून दाखवले. आपले कर्तृत्व एवढेच की आता ‘बॅल्क सी’ पाहण्यासाठी मुंबईकरांना युरोपात जाण्याची गरज भासणार नाही. कारण तो आपण मुंबईकरांना इथेच दाखवला आहे. तुमच्या कर्तृत्ववान कामगिरीसाठी आपले मनापासून अभिनंदन.'