लिसेस्टरमधील दंगलीचे वास्तव

    24-Sep-2022
Total Views |

Leicester
 
 
इंग्लंडमधील लिसेस्टर शहरात नुकतीच उसळलेली दंगल म्हणजे, सोशल मीडियाची एक वाईट बाजू जगासमोर मांडणारे आणखीन एक ज्वलंत उदाहरण! केवळ ‘फेक न्यूज’च्या जोरावर ही दंगल भडकवण्यात काही लोक यशस्वी ठरले. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, इंग्लंडसारख्या प्रगत देशामधील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रेदेखील या अपप्रचाराला बळी पडली. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, हिंदूंच्याच विरुद्ध हे बंड का? लिसेस्टरच का? खरोखर तिथे काय घडलं? आता पुढे काय? ही दि. 19 जानेवारी, 1990च्या काश्मीर नरसंहाराची पुनरावृत्ती होतेय का? अशाच काही प्रश्नांची शहानिशा करणारा हा लेख...
 
 
युकेमध्ये हिंदूंची संख्या तेथील एकूण लोकसंख्येच्या केवळ 1.6 टक्के एवढी आहे. म्हणजेच साधारणपणे 10 लाख, 60 हजार आहे (2011च्या जनगणनेप्रमाणे ती आठ लाख होती.) परंतु, हिंदू बांधवांचे युकेच्या ‘जीडीपी’मध्ये मात्र 6.5 टक्के एवढे योगदान आहे. इथे वसलेले सर्व हिंदू हे या देशातील संस्कृती आणि देशातील लोकांबरोबर अगदी मिळून मिसळून राहणारे. अर्थात, आपण आपले सणवार अगदी थाटामाटात साजरे करतो. परंतु, येथील स्थानिक जनतेलादेखील या समारंभाचा एक अविभाज्य भाग बनवतो. आपला सगळ्यात मोठा सण असलेला दिवाळी, हा लंडनमधील ट्रॅफल्गार चौकात अगदी थाटामाटात साजरा होतो, तर अशा प्रकारे भारतीयांनी इथे येऊन स्वतःच्या मेहनतीवर आणि प्रतिभेवर इथे प्रतिष्ठा मिळवली आहे. पण, कदाचित काही लोकांच्या डोळ्यात हे खुपत असेल का?
 
 
तर मग लिसेस्टरच का?
 
युकेमधील लिसेस्टर शहरात हिंदूंची लोकसंख्या ही अख्ख्या युरोपमध्ये दुसर्‍या स्थानावर येते. ख्रिश्चन हे लिसेस्टरच्या एकूण लोकसंख्येमध्ये 1 लाख, 81 हजार, 882 एवढे आहेत, मुस्लीम 1 लाख, 04 हजार, 413 एवढे, हिंदू 85 हजार, 327 एवढे आणि शिखांची संख्या 24 हजार, 700 इतकी. लिसेस्टर तसं इतर मोठ्या शहरांपेक्षा छोटं शहर (73.3 चौ.किमी) म्हणजेच हिंदू हे दाटीने राहतात. त्यामुळे कदाचित हल्ला करायला सोपं - म्हणजे थोडक्या प्रयत्नात जास्त हानी घडवून आणता येते. अजून एक कारण असंही असू शकेल की, लिसेस्टर म्हणजे हिंदूंच्या बालेकिल्ल्यात हात घातला की, मग आपोआपच देशातील सगळे हिंदू घाबरतील, असाही एक छुपा अजेंडा असू शकतो.
 
 
लिसेस्टरमध्ये नेमकं काय झालं?
 
युकेमध्ये भारत-पाकिस्तानच्या क्रिकेटचे सामने कैक वेळेस झाले आहेत आणि त्यातही दोन-तीन सामने सोडता, इतर सर्व सामने भारतानेच जिंकले आहेत. जेव्हा जेव्हा भारत जिंकतो तेव्हा तेव्हा युकेमधील वेगवेगळ्या गावांमध्ये सगळे भारतीय अगदी जल्लोषात बाहेर पडतात. यात नवीन असं काहीच नाही. त्याचप्रमाणे आशिया करंडकमधील भारत-पाकिस्तान सामना दि. 28 ऑगस्टला पार पडला, ज्या सामन्यात भारत विजयी ठरला. त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी लिसेस्टरमध्ये देखील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने बाहेर पडले. अर्थात, काही लोकांच्या हातात तिरंगादेखील होता, तर हा जोश चालू असताना एक व्यक्ती त्यांना शिव्या देत भिडली आणि एकाच्या हातून तिरंगा हिसकावून त्याचा त्याने अपमान केला आणि तिथे असलेल्या इतर भारतीय क्रिकेटप्रेमींना हाणामारी सुरू केली. हे बघून तेथील भारतीय जमावाने त्या माणसाला काबूत केलं, त्याची समजूतही काढली आणि त्याला मार्गी लावलं. अर्थात, या गरमागरमीत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ असे नारे इतर लोक देऊ लागले आणि नंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले. याला एक ेपश-ेषष घटना समजून विषय तिकडेच संपू शकला असता.
 
 
पण, इथे एन्ट्री होते ‘सोफिस्टिकेटेड गुंडां’ची. 15-20 वर्षांपूर्वी गुंड म्हणजे रांगडा, शिवीगाळ करणारा, मारधाड करणारा, बर्‍याच वेळेस स्थानिक राजनेत्याचा पाठिंबा असलेला, असं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. नंतर नंतर हातात भाले, तलवार आणि मग पिस्तुलं वगैरेपर्यंत त्या गुंडांची उत्क्रांती झालेली दिसून येते. पण, आजच्या आधुनिक काळात हे गुंड अगदी शक्तिशाली शस्त्राने सज्ज झाले आहेत आणि ते शस्त्र आहे - सोशल मीडिया. तर हे गुंड कोण - तर ते आहेत ‘द इंडिपेन्डेंट’ या मुख्य प्रवाहातीवल वृत्तपत्राचा माजी उपसंपादक आणि डाव्या विचारसरणीचा - सनी हुंडाल, विनोदी कलाकार - गुझ खान आणि सीरिया, ‘इसिस’, ‘अल कायदा’ आणि इतर अशा दहशतवादी संघटनांना मदत करणार माजिद फ्रीमन आणि इतर मंडळी यांनी हे ‘सोशल मीडिया’ नावाचं धनुष्यबाण बाहेर काढलं आणि त्याला ‘फेक न्यूज’चे बाण लावून ट्विटरवरून हमखास सोडू लागले.
 
 
पहिली खोटी बातमी ही पसरवली की, त्या क्रिकेटप्रेमींनी ‘डेथ टू मुस्लिम्स’ (मुसलमानांना मृत्यू) अशा घोषणा दिल्या आणि आम्हाला भीती वाटत आहे (काही वर्षांपूर्वी भारतात असहिष्णुतेचा पूर आला होता - तसाच) अशी तक्रार पोलिसात नोंदवली. याला जगभरात ‘व्हिक्टिम-कार्ड’ म्हणून ओळखलं जातं-म्हणजे आपण दुसर्‍याच्या गालात मारायची आणि नंतर आपणच मोठ्याने रडायचं की, तो मला मारेल याची मला भीती वाटते म्हणून! पोलिसांमध्ये तक्रार नोंदवल्यामुळे त्यालाच सूत वाक्य समजून मुख्य पोलीस अधिकारी यांनी दि. 31 ऑगस्टला त्या घोषणेची (डेथ टू मुस्लिम्स) पुनरावृत्ती केली - काहीही शहानिशा न करता. त्या वेळेसचे व्हिडिओ उपलब्ध आहेत - त्यामुळे थोडी चाणाक्ष बुद्धी वापरून दिलेल्या तक्रारीत किती तथ्य आहे, हे तपासून बघायला हवं होतं. पण, या साहेबांनी आता ‘फेक न्यूज’ला सरकारी मान्यता दिल्यामुळे त्या ‘सोफिस्टिकेटेड गुंडां’ना अजूनच चेव चढला आणि अजून बर्‍याच सृजनशील (घातक) अशा बातम्या बाहेर येऊ लागल्या आणि याचा हवा तो परिणाम झाला.
 
 
लगेचच दुसर्‍या दिवशी म्हणजे दि. 1 सप्टेंबरला त्या पोलीस अधिकार्‍याने स्वतःची चूक दुरूस्त करत दुसरा इमेल पाठवला की, ‘डेथ टु मुस्लिम्स’ असं कुठेच म्हंटल नव्हतं. त्यामुळे हा ईमेल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, अशी विनंती त्यांनी सगळ्यांना केली. पण, एकदा का त्यांच्या तक्रारीला दुजोरा देणार पहिला सरकारी बाण निघाला की, त्यालाच या गुंडांनी धरून ठेवलं आणि हा दुरूस्तीचा ईमेल ‘फेक न्यूज’च्या धुमश्चक्रीत गायब झाला.
 
 
या सगळ्यात (लिसेस्टर पूर्व या मतदारसंघाच्या) क्लावडिया वेब नावाच्या खासदार महिलेने तिचा ‘फेडरेशन ऑफ मुस्लीम ऑर्गनायझेशन्स’ यांना पाठिंबा व्यक्त केला आणि लिहिलं की, दि. 28 ऑगस्टला झालेल्या हिंदू आणि मुस्लीम लोकांमध्ये झालेल्या घटनेची ती निंदा करते. इथे हळूहळू रंग कसा बदलला हे दिसून येतो - चकमक ही दोन देशांच्या क्रिकेटप्रेमींमध्ये झाली होती - तिथे हिंदू आणि मुस्लीम असं काहीच नव्हतं!
 
 
मग दि. 4 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये दुसरा सामना रंगला, ज्या सामन्यात पाकिस्तानचा क्रिक्रेट संघ विजयी ठरला. त्या वेळेस सगळ्या हिंदू घरांमध्ये गणेशचतुर्थीचे कार्यक्रम चालू होते. सामना संपल्या संपल्या शे-दोनशे मुस्लीम शहरात निघाले. त्यातल्या एका टोळीने गणेशपूजा चालू असलेल्या घरात घुसून त्या मूर्तीवर आणि तिथे जमलेल्या सर्व भाविकांवर अंड्यांचा भडीमार केला. अर्थात, हे बघून त्या घरातील मंडळी बाहेर आली, तर त्यांच्यातल्या मुलावर एकाने मोठ्या चाकूने हल्ला केला, नशिबाने तो वाचला. त्याला वाचवायला आलेल्या त्याच्या काकूवर मग त्याने हल्ला साधला आणि तिचं नाक फोडलं.
 
 
मग दि. 5 आणि 6 सप्टेंबरला अजून भरभरून अशीच लोकं रस्त्यावर उतरली. ज्या ज्या घराबाहेर भगवे झेंडे दिसले, अथवा पताका दिसल्या, अथवा झेंडूची माळ दिसली अथवा ‘शुभ-लाभ’ लिहिलेलं दिसलं अथवा कारमध्ये गणेश किंवा हनुमानच्या मूर्ती दिसल्या, त्या सर्व घरांवर आणि कारवर दगडफेक सुरू केली आणि काचा फोडल्या. खुले चाकू घेऊन सगळे अगदी बिनधास्तपणे धुमाकूळ घालत होते आणि हो, विसरला असाल तर हे सर्व इंग्लंड देशातल्या एका शहरात होत होतं. या सगळ्यात हिंदू मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. दोन हिंदू माणसांवर चाकूने हल्ले झाले आणि एक जण रुग्णालयात आहे.
 
 
 
हे सगळं झाल्यावर प्रशासनाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये परत खापर हिंदूंवरच फोडण्यात आलं- काही पुरावा नसताना ते म्हणे की, 2014च्या अगोदर आम्ही सगळे आनंदाने राहत होतो आणि भारतात त्यानंतर झालेल्या सत्तांतरामुळे ही असहिष्णुता वाढली होती! या बदललेल्या वागणुकीत भाजपचा हात आहे आणि इथे असलेली सगळी मंदिरं म्हणजे रा.स्व.संघाचे ‘सेंटर्स’ आहेत म्हणे, ज्याच्यात मुस्लीमविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. ‘हिंदू दहशतवाद’ हा रा. स्व. संघामुळे या शहरात पसरला, अशी आणि इतर पुरावारहित विधानं करुन येथील पोलिसांची आणि स्थानिक नेत्यांची दिशाभूल करण्यात येत आहे.
 
 
दंगलीचा परिणाम
 
याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे, तेथील हिंदू बांधव घाबरले आहेत. पोलीस आपल्याला कितपत संरक्षण देतील, याची त्यांना अजिबात शाश्वती नाही. तेथील राजकीय नेतेदेखील उघड उघड दुसर्‍यांची बाजू घेत आहेत. त्यामुळे तीन-चार दिवस मुलांना कोणी शाळेत पाठवलच नाही. झेंडे खाली आले आहेत. कारमधून गणपती बाप्पा आणि हनुमानजी केव्हाच गायब झाले आहेत. ‘शुभ-लाभ’ मिटवण्यात आले आहेत. दुर्गापूजेसाठीचा दुर्गा मूर्ती आता भीतीने चार भिंतींच्या आतच तिच्या सिंहावर बसलेली आढळते. देवीभोवती गरबा खेळत असलेल्या लहानग्यांना हे काय नृत्य करत आहेत, म्हणून आज प्रश्न विचारले जात आहेत. पुढे जाऊन असेच हाल बर्मिंगहॅम, मँचेस्टर, लंडन आणि इतर जागी स्थित असलेल्या हिंदूंचे होतील, अशा धमक्याही देण्यात येत आहेत. त्यामुळे युकेमधील हिंदू बांधवांना दिवाळीचे दिवे घरातच लावावे लागतील का? त्याच्या प्रकाशानेही कदाचित आपली घरं फोडली जातील, या भीतीने यंदा हे दिवेदेखील लागणार नाहीत का? इंग्लंड दुसरं काश्मीर बनतंय का?
 
 
 
- सत्येन
 
 
 (लेखक मागील 19 वर्षे युकेमधील लंडन शहरात वास्तव्यास असून पेशाने आयटी क्षेत्रात मॅनेजर आहेत.)