मुंबई : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेली रुपी बँक आता इतिहासजमा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला असल्याने आता २२ सप्टेंबर पासून रुपी बँकेचा व्यवसाय बंद करावा लागणार आहे. आर्थिक गैरव्यवहार, व्यवसायातले अनियमितता, वाढते बुडीत कर्ज यांनी ग्रासलेल्या या बँकेवर रिझर्व्ह बँकेने अखेर कारवाई केली. अनेकदा नोटिशी बजावून सुद्धा,प्रशासकामार्फत व्यवसाय सुधारण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा रुपी बँकेच्या आर्थिक स्थितीत काहीच फरक पडला नाही आणि अखेर १० ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने रूपे बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला.
या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी बँकेला ६ आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण या कालावधीत बँकेच्या परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला गेला नाही. रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ च्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. आता बँकेतील ठेवीदारांच्या पैश्याचे काय होणार हा मोठा प्रश्न असताना आता २२ सप्टेंबर नंतर कोणालाही बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. ५ लाख रुपयांपेक्षा कमी ठेवी असणाऱ्या ग्राहकांना त्यांचे सर्व पैसे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे (DICGC) परत मिळतील असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील एक महत्वाची बँक असलेली रुपी बँक आत कायमची पडद्याआड जाणार आहे.
रुपी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या कुठल्याही नियमावलीचेपालन केले नसल्याचा ठपका बँकेवर ठेवण्यात आला आहे. २०१३ पासून बँकेवर कारवाई सुरु आहे . आर्थिक ताळेबंद व्यवस्थित नाही म्हणून रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेला नोटीस बजावून आर्थिक निर्बंध घातले होते. त्यानंतर सुधीर पंडित यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेली ८- ९ वर्षे अनेक उपाययोजना योजूनही रुपी बँकेच्या व्यवसायात काहीच फरक पडला नाही. कर्जदारांवर कारवाई करूनसुद्धा बुडीत कर्जाचे प्रमाण कमी झाले नाही, तेव्हा शेवटी रिझर्व्ह बँकेने ही परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. आता १०० वर्षांचा इतिहास असलेली एक महत्वाची सहकारी बँक इतिहास जमा होणार आहे.