वसतिगृहातील वाह्यातपणा

    21-Sep-2022   
Total Views |

c u
 
 
चंदिगढमधील ‘एमएमएस’ प्रकरणावरुन अपेक्षेप्रमाणे पंजाबमध्ये वादंग उठला. विद्यापीठाच्या वसतिगृहातीलच एका विद्यार्थिनीने तिच्या सोबतच्या इतर विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे चक्क नकळत व्हिडिओ काढले आणि ते हिमाचल प्रदेशातील काही मुलांबरोबर निर्लज्जपणे शेअरही केले. आता यामागे नेमकी काय कारणं होती, ते तपासाअंती स्पष्ट होईलच. खरंतर एका विद्यार्थिनीनेच आपल्या सोबत राहणार्‍या विद्यार्थिनींची अशी बदनामी करणे हे सर्वस्वी धक्कादायकच म्हणावे लागेल. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून हिमाचल प्रदेशातून पंजाब पोलिसांनी संबंधित मुलांना अटक केल्याचेही समजते. पण, मुळात या अशा घटनांमुळे खासकरून महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐेरणीवर आला आहे.
 
 
महिला वसतिगृहांतील गैरप्रकार मुळी नवीन नाहीच. यापूर्वीही अशा कित्येक घटना समोर आल्या आहेत. परंतु, अशाप्रकारे विद्यार्थिनीकडूनच आपल्या सहध्यायींचे, मैत्रिणींचे अश्लिल व्हिडिओ तयार करणे ही विकृतीच म्हणावी लागेल. मुळात हल्ली अशा अश्लिल व्हिडिओंचा इतका सुळसुळाट झाला असताना वसतिगृहातील त्या विद्यार्थिनीने आर्थिक लाभांसाठी तर हे असले उद्योग केले नाहीत ना, याचीच प्रथमदर्शनी शंका यावी. कारण, असले व्हिडिओ तयार करून त्याबदल्यात पैसे पदरात पाडून घेण्याचेही गैरप्रकार सर्रास घडत असतात. त्यातच हल्ली मोबाईलचा सर्व ठिकाणी वाढलेला वापर पाहता, अशा प्रकारांना आळा घालणेही तितकेच आव्हानात्मक. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींनीही जागरुक राहणे गरजेचे आहे.
 
 
वसतिगृहात आपण ज्या मुलींसोबत राहतोय, त्यांचे बोलणे, वागणे संशयास्पद आढळल्यास त्याची संबंधितांकडे तक्रार करणे हे केव्हाही योग्य. अशा दीदीगिरी करणार्‍या, कळपाने वावरणार्‍या मुलींना ‘रॅगिंग’किंवा अन्य कुठल्याही कारणास्तव घाबरून अन्य मुलींनीही दबून जाता कामा नये. शिवाय आपल्या खोलीत, आपल्या स्वच्छतागृहांत, शौचालयांत वावरतानाही सावधानता बाळगावी. सहसा, सोबत मुलगीच आहे ना, म्हणून निर्धास्त राहणेही धोकादायक ठरू शकते. तसेच, वसतिगृह प्रशासनानेही अधिक सतर्क राहून वेेळोवेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, नियमांचा केवळ बागुलबुवा न करता त्यांचे काटेकोरपणे पालन कसे होईल, याकडेही लक्ष देणे क्रमप्राप्तच!
 
 
मोबाईल साक्षरता अभ्यासक्रम
 
 
एका वर्षांच्या नवजात बालकापासून ते अगदी प्रौढांपर्यंत मोबाईलमुळे उद्भवणार्‍या शारीरिक, मानसिक आरोग्यावरील दुष्परिणामांची अनेकदा चर्चा रंगते. परंतु, या चर्चांचे रुपांतर कुठल्याही ठोस कृतीत वा धोरणांत होताना मात्र दिसत नाही. त्यामुळे आजचे युग मोबाईलचे असून भविष्यही तंत्रज्ञानकेंद्रित असणार आहे, हे निश्चित. तेव्हा, त्या अनुषंगाने मूल्यशिक्षण, पर्यावरणाच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवरच आता मोबाईल साक्षरता अभ्यासक्रमही शालेय पातळीवर विकसित करण्याची वेळ आली आहे. मोबाईल हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक. त्यामुळे तो नाकारण्याचे मुळी कारणच नाही.
 
 
प्रत्येकासाठी त्याची उपयोगिताही निराळी. कोणासाठी मनोरंजन, तर कोणासाठी मोबाईल म्हणजे त्यांचे कार्यालयच. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून बळजबरीने, मारुन-मुटकून दूर ठेवणे हा त्यावरील एकमात्र उपाय नाही. कारण, जेवढे आपण त्यांना मोबाईलपासून दूर नेऊ, तेवढेच त्याविषयीचे आकर्षण वाढीस लागते आणि मग गुपचूप मोबाईल हाताला चिकटतोच. पूर्वी काहींना टीव्हीचे व्यसन असे. पण, टीव्ही बंद केला की विषय संपायचा. पण, आजच्या पालकांना मोबाईल असा बंद करणेही सोयीस्कर नाहीच म्हणा. त्यामुळे घरगुती पातळीवर सर्वप्रथम पालकांनी स्वत:चा मोबाईल वापर निर्धारित करण्यापासून ते आपल्या पाल्याला कधी, किती वेळ आणि मोबाईलवर काय बघू द्यायचे, हे सर्वप्रथम ठरवणे गरजेचे.
 
 
केवळ पालकच नाही, तर शालेय अभ्यासक्रमातही मोबाईलसह इंटरनेट वापराचे लहानपणापासून धडे दिले, तर मुले नक्कीच ‘सायबर साक्षर’ होण्यास हातभार लागेल. मोबाईलचा वापर किती, कसा, कुठे करावा, त्याचे फायदे काय, तोटे काय, ‘सायबर’ सुरक्षा यांसारख्या तांत्रिक बाबींची आजच्या पिढीला त्यांच्या शालेय जीवनातच ओळख होणे, हे त्यांच्या भावी आयुष्यासाठीही तितकेच मार्गदर्शक ठरावे. लैंगिक शिक्षण हवे की नको, याची जशी वर्षानुवर्षे गाडी केवळ चर्चेच्या रुळावरच अडकली, तसे ‘मोबाईल साक्षरता’ या विषयाबाबत होता कामा नये. सरकारी पातळीवर याविषयी त्वरित तोडगा निघणारा नसेल, तर शैक्षणिक संस्थांनीच पालकांना विश्वासात घेऊन या विषयावर चर्चासत्र, शिबिरांचे आवर्जून आयोजन करावे. ‘कोविड’ काळातही ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण आत्मसात केली होतीच. पण, भविष्याची पावले ओळखून आपल्या मुलांना आता मोबाईल साक्षरही करुया!
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची