नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी यांच्या मर्जीतल्या एखाद्या व्यक्तीला कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते असे सांगितले जाते. कॉंग्रेसमधील चर्चेत असलेल्या नावांपैकी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत किंवा खासदार शशी थरूर यांची भावी अध्यक्षपदी वर्णी लागू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सोमवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिल्लीला जाणार असल्याची सूत्राकडून माहिती मिळते. त्याच दिवशी गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करू शकतात. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवाराने अशोक गहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास सांगितले आहे. २६ सप्टेंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवसाचा मुहूर्त साधून गहलोत उमेदवारी दाखल करू शकतात. २३ ऑगस्टला गुजरात दौऱ्यापूर्वी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींसोबत भेट घेतली होती. या बैठकीच्या दिवशी त्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असे सांगण्यात आले.
सोनिया गांधी यांच्या भेटीपासून अशोक गेहलोत प्रत्येक वेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय हायकमांड घेतील, असे सांगत आहेत. हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. यापूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गेहलोत यांनी जो निर्णय हायकमांड घेतील तो आपण पळणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच राहुल गांधींनी काँग्रेसची धुरा सांभाळावी, असेही गेहलोत यांचे म्हणणे आहे. गेहलोत हे गांधी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे राहुल गांधीनी अध्यक्षपदासाठी नकार दिल्यास गेहलोत यांच्या गळ्यात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ पडू शकते.
दरम्यान कॉंग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांच्या नावाला देखील खुद्द सोनिया गांधींकडून ग्रीन सिग्नल असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे शशी थरूर यांच्या नावाची चर्चा कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असल्याचे सांगितले जाते. शशी थरूर हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले मानले जातात.