१३ ऑक्टोबर... वर्ष होतं २०१३. शिवसेनेचा तो ४८वा दसरा मेळावा. लाखो शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी जमले होते. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. मात्र, या घोषणा नेहमीप्रमाणे नव्हत्या. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी येणार की नाही येणार इथूनच चर्चेला सुरुवात झाली होती. तरीही जोशी मास्तर मेळाव्याला उशीरा का होईना पोहोचले. ते मंचावर आले आणि एकच उपस्थित जनसमुदायापैकी काही जणांनी जोशींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती.
काहींना हा नेमका प्रकार काय हे देखील कळत नव्हतं. आदित्य ठाकरे सर्व शिवसेना नेत्यांच्या पाया पडत होते. उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मनोहर जोशी, सुनील प्रभू, अरविंद सावंत आदी सर्वच नेतेमंडळींना आदित्यंनी अभिवादन केलं. नेहमीप्रमाणेच आदेश बांदेकर हे सुत्रसंचालन करत होते. इतक्यात जोशीबुवा मंचावरुन पायउतार झाले. पाठमोऱ्या जाणाऱ्या जोशींबुवांकडे एक नजर फिरवून काही घडलंचं नाही असं दुर्लक्ष उद्धव ठाकरेंनी केलं. अवघ्या दोन मिनिटांचा हा प्रसंग. पण जोशी मास्तरांना आयुष्यभर लक्षात राहील, असा ठरला होता.
त्याचं झालं असं की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ साली निधन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला जाऊ लागला होता. स्मारकाच्या बाबतीत होणारी दिरंगाई आणि शिवसेनेच्या नेतेमंडळींनी शरद पवार यांची घेतलेली भेट यावर मनोहर पंतांनी टिप्पणी केली आणि वादाला तोंड फुटलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 'जर आज बाळासाहेब असते तर त्यांच्या वडिलांच्या स्मारकाला इतका वेळ लागला नसता,' अशी टिप्पणी केली होती. अर्थात उद्धव ठाकरेंच्या एककलमी नेतृत्वाला आणि त्यांच्या कथित निकटवर्तीयांनी ही गोष्ट खटकणारीच होती आणि त्यातून जे व्हायचं नव्हतं ते झालंच. जोशी सरांच्या विरोधात शिवसेनेतील 'तो' एक गट सक्रिय झाला. त्यांनी जोशी सरांच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्याची परिणीती त्यावर्षीच्या दसरा मेळाव्यातील जोशी सरांच्या अपमानात झाली.
एकेकाळी बाळासाहेबांची सावली म्हणवले जाणारे जोशी सर अचानक त्यांच्याच दसऱ्या मेळाव्यातून पायउतार झाले होते. मेळाव्याला आल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कारही केला होता. जोशींचं वय त्यावेळी होतं ७५. उद्धव ठाकरे ५३ वर्षांचे. ज्यावेळी ठाकरे आणि जोशी आमने-सामने आले तेव्हा जोशी मास्तरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी जोशींकडे केवळ हस्तांदोलन केलं. दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीयं हे तिथून दिसून आलं होतं. यानंतर मंचामागे माध्यमांनी जोशींना गाठलं. या सगळ्या प्रकारावर जोशींची प्रतिक्रीया घेतली. ते म्हणाले, "माझा शिवसैनिकांवर कालही राग नव्हता आणि आजही नाही." सगळा प्रकार काहीसा शांत होईल, अशी स्थिती मंचावर होती. तितक्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा याच विषयाला हात घातला.
खरंतर उद्धव ठाकरेंना हा विषय तिथल्या तिथे संपवता आला असता. उपस्थित जनसमुदायाला शांत करुन मध्यस्ती करता आली असती. मात्र, असं म्हणतात ही सगळं मुद्दामहून घडवून आणलेलं होतं. याची कल्पनाही जोशींनाही असावी त्यामुळेच मेळाव्याला पोहोचताना त्यांची चलबिचल होत होती. मेळाव्यालाही ते उशीराच पोहोचले होते. उद्धव ठाकरेंनी इतका मात्तबर नेता पायउतार झाल्याबद्दल चिंता व्यक्त करायची सोडून घडलं ते योग्यच होतं, असं समर्थन केलं होतं. "उद्या जर का तुम्हाला मीही नको असेन तर अशाच प्रकारे पायउतार व्हायला तयार आहे.", असं म्हणतं जोशींच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांचं उद्धव ठाकरेंनी समर्थनच केलं होतं.
आता काळ बदललायं. शिंदे समर्थक गटांने उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन पायउतार केलयं. पक्ष, चिन्ह, भूमिका आणि आता दसरा मेळावाही ठाकरेंकडून निसटतोयं की काय, अशी स्थिती होतेयं. या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद लावू इच्छीत आहेत. दसरा मेळाव्यासाठी आता शिंदे समर्थकांनी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. आता ज्यांना परवानगी मिळेल त्यांना मेळावा घेता येणार आहे. असं म्हणतात शिवसेनेत निष्ठावंतांना डावलण्याचा टीझर म्हणजे २०१३ मध्ये झालेला दसरा मेळावा होता. पुढे मनोहर जोशी शिवसेनेतील सक्रीय राजकारणातून हळूहळू बाजूला झाले. मात्र, शिंदेंच्या भेटीनंतर ते पुन्हा सक्रीय होतील का? हे येणारा काळच ठरवेल.