मुंबई : शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेना कुणाची यावरून सुरु झालेला वाद आता प्रत्येक गोष्टीत प्रवेश करताना दिसत आहे. दादरच्या शिवाजी पार्कवर गेल्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची परवानगी नेमकी कुणाला मिळणार ? शिंदे गट मेळावा घेणार की ठाकरे गट आपले वर्चस्व कायम राखणार ? या वरून वाद प्रतिवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरु असताना ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याची स्थिती आहे.
मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज करूनही निर्णय न आल्यामुळे ठाकरे गटाचे नेते आज थेट महापालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयावर धडकणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध मुंबई महापालिका हा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
परवानगीवरून ठाकरे गटात अस्वस्थता
महापालिकेकडे अर्ज करूनही मुंबई महापालिका प्रशासन आम्हाला परवानगी देत नाही, असा दावा ठाकरे गटातील नेत्यांनी केला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर पक्षावर नियंत्रण कुणाचे यावरून सुरु झालेली लढाई न्यायालयात पोहोचली आहे. न्यायालयात दोन्ही गटाकडून कायदेशीर दाखले देण्यात येत असून न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना कुणाची याचा निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे काही नेते आणि इतर काही बडी नेतेमंडळी आज पालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयावर धडकणार असून महापालिका अधिकाऱ्यांना परवानगीसाठी होणाऱ्या विलंबाची जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुले परवानगी न मिळाल्याने अस्वस्थ झालेला ठाकरे गट आता रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...म्हणून परवानगीचा मुद्दा प्रतिष्ठेचा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यावरून होणाऱ्या वादाला महत्त्व असण्यामागे आणखी एक कारण आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची शिवसेनेचा दसरा मेळावा या नावाने महापालिकेकडे नोंद आहे. या मेळाव्यासाठी ज्या गटाला परवानगी मिळेल तोच गट शिवसेना म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. जर मेळाव्याची परवानगी शिंदे गटाला मिळाली तर तर शिंदे गट अधिकृत शिवसेना आहे असा दावा करू शकते तर ठाकरे गट देखील अशाच प्रकारचा दावा करण्याची शक्यता आहे. या सर्व कायदेशीर पेचांमुळेच परवानगीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे परवानगी नक्की कुणाला मिळणार ? याकडे शिवसेनेसह इतर सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिंदे गटाकडून बीकेसी मैदान बुक
शिवाजी पार्कबाबत निर्णय घेण्यात होणारी दिरंगाई आणि निर्णय कुणाच्या बाजूने लागणार याबाबत असलेली संदिग्धता यावरून शिंदे गट सतर्क झाला आहे. शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेल्या शिंदे गटाने संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेत बांद्रा कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदान सभेसाठी बुक करून ठेवले आहे. शिंदे गटातील पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित बाजू म्हणून हे मैदान बुक करण्यात आले असून मैदानाचे शुल्क देखील भरण्यात आले आहे. त्यामुळे जर कदाचित शिंदे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली नाही, तर शिंदे गट बीकेसीवर आपली सभा घेईल, असे त्या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.