मनाची श्रीमंती लाभलेले साहित्यिक

    18-Sep-2022   
Total Views |
 
raam
 
 
विपुल साहित्य संपदा नावावर असलेले आणि साहित्यातून वाचकांना आरसा दाखविणारे साहित्यिक राम नेमाडे यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया...
 
 
काही माणसं ही चुंबकाप्रमाणे असतात, त्यांच्यातील प्रतिभा, कलागुण, आंतर-बाह्य दिलखुलास व्यक्तिमत्त्व, निर्विकार मन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाच्या श्रीमंतीमुळे व मोठेपणामुळे ते इतरांना सहज आपल्याकडे खेचून घेतात. कुठल्याही प्रकारचे वर्ग, वर्ण, भेद याच्या पलीकडे अशा माणसांची दृष्टी आणि जगण्याचा दृष्टिकोन असतो. त्यामुळेच अशी माणसं सर्वांना हवीहवीशी वाटतात. त्यातही अशी व्यक्ती जर साहित्यिक असेल, तर ती माणसं जोडण्याचं महत्कार्य आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर करीत असतात. त्यांच्याजवळ असलेल्या साहित्याच्या प्रतिभेच्या बळावर या व्यक्ती आपल्या कल्पनाविश्वाच्या डोहात अगदी खोलवर जात माणूस जोडणारी शंख-शिंपले जणू वेचून आणत असतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे राम नेमाडे. त्यांचे व्यक्तिमत्व हे चुंबकाप्रमाणे आहे जे असंख्य लोकांना आपसूकच स्वतःकडे खेचून घेतात. त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचा, मोठेपणाचा आणि त्यांच्यातील एका चांगल्या, सु-संस्कृत माणसाचा प्रत्यय असंख्य लोकांना अनेकदा आलेला आहे. मानवी मनांमध्ये अनेक प्रकारचे ‘व्हायरस` असलेल्या आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगाच्या काळात मनाची श्रीमंती लाभलेले खूप कमी लोक आहेत. नेमाडे हे त्या पैकीच एक आहेत.
 
 
जळगाव येथे ‘अखिल भारतीय पहिले लेवा गणबोली साहित्य संमेलना`चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नेमाडे यांची निवड करण्यात आली होती. राम नेमाडे हे नाव आता साहित्यिक क्षेत्रात सर्वांना परिचयाचे झाले आहे. त्यांचं साहित्य संख्यात्मकदृष्ट्या न पाहता गुणात्मक दृष्टिकोनातून पाहावे. ते खूप उत्कृष्ट कवी तर आहेतच, पण सोबतच उत्तम ललित लेखक, कथाकारदेखील आहेत. नेमाडे यांचे साहित्य हे वाचकांना आरसा दाखवण्याचे काम करीत असते. मानवी मन हे अतिशय गुंतागुंतीचे असते. या मनरुपी फुलाच्या अनेक पाकळ्या आहेत, अनेक सुगंध आहेत. त्यांच्या साहित्यातून या सर्व नाजूक भावना प्रतिबिंबित होत असतात. त्यांच्या ‘ऋतुगंध` व ‘हिरवा चाफा` या कविता वाचतांना आपसूकच मनाला सुगंधित करतात. नेमाडे यांच्या लिखाणाचे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांचे लिखाण थेट मनाला साद घालते. त्यांच्या ‘हिरवा चाफा`मधील ‘वारा उधाणतो`, ‘ऋतुमानातुनी`, ‘वृक्ष देवोभव`, आणि ‘ऋतुगंध`मधील ‘पहाट`, ‘वृक्षलतांचे संमेलन `, ‘या शिवारात माझ्या`, ‘आकाश धरती` तसेच ‘माही लेवागणबोली आन्‌‍ इतर कविता`मधील ‘माही लेवागणबोली` व ‘रंगला रास` या कवितांमधील निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि माणसाशी असलेले नाते आंग्लकवी वर्डस्वर्थ यांच्या कवितांच्या आठवणी जाग्या करतात. ‘रंगला रास`मधील ‘शेंगाइनं वाकल्या तुरी` या ओळी जणू मातीतल्या सुगंधाची अनुभूती देतात.
 
 
मानवी जीवनात प्रेमाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना प्रेम हाच जीवनाचा श्वास आहे. या भावना अतिशय हळव्या आणि कोमल असतात. त्या कवितांमधून मांडणे ही तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. कवींवर ही खूप मोठी जबाबदारी असते. नेमाडे यांची प्रेमगीतेही या सर्व गोष्टींना अनुसरून आहेत आणि ती प्रेम या विषयाला पुरेपूर न्याय देतात. ‘तू आलीस तेव्हा`,‘शतदा जन्म घेईन`, ‘नवा डाव`, ‘प्रेमाचा मधुमास`, ‘सांगायचे ते सखी`, ‘मौन इशारा` या सर्व कविता शेक्सपियरच्या कवितांची आठवण करून देतात. साहित्यिक क्षेत्रातील त्यांच्या वाटचालीकडे एक नजर टाकल्यास त्यांच्या साहित्यिक विश्वातील श्रीमंतीची प्रचिती येते.राम नेमाडे यांना आतापर्यंत, एकनाथराव खडसे (ताम्रपट लेखन), डॉ. अशोक रामचंद्र नारखेडे (अमृत महोत्सवी मानपत्र), डॉ. डी.एन. पाटील(अमृत महोत्सवी मानपत्र), आदी सन्मान मिळालेले आहेत.
 
 
नेमाडे हे अनेकांसाठी एक प्रकारचे प्रेरणा आणि ऊर्जाकेंद्रच आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच अशी किमया आहे की, त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. असे स्वच्छ प्रतिमेचं मन असलेलं व्यक्तिमत्त्व मिळणे आजकाल कठीण होत चालले आहे. ते केवळ साहित्यिक क्षेत्रासाठीच प्रेरणास्रोत नाहीत, तर सामाजिक क्षेत्रासाठीदेखील तितकेच स्फूर्तिदायक आहेत. कारण अशी माणसं भेटणं दुरापास्त होत चालले आहे. तेव्हा अशा लोकांना सांभाळून ठेवणे ही एक समाज घटक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे अशी त्यांच्या वाचकांची भावना आहे.
 
 
इतर क्षेत्राप्रमाणे आजकाल साहित्य क्षेत्रातदेखील काही प्रमाणात प्रदूषण झालेले आहे, असे म्हटल्यास वावगे नाही. आजकाल दोन-चार पुस्तके लिहिली तरी लोक पार हवेत उडायला लागतात. नेमाडे मात्र याला अपवाद आहेत. किंबहुना ते नवोदितांना पुरेपूर मदत आणि सतत प्रोत्साहन देत असतात.नवोदितांचे कविता संग्रह छापून यावे म्हणून नेमाडे आग्रह धरत असतात. नवोदितांच्या कवितांवर संस्कार करणे, शुद्धलेखन तपासणं, त्या पुस्तकांना प्रस्तावना देणे ही कामे ते स्वयंस्फूर्तीने आणि आनंदानं करतात. दुसऱ्याच्या लिखाणाला साधी कौतुकाची थाप न देणाऱ्यांच्या गर्दीत नेमाडे यांच्यासारख्या मोठ्या मनाचे लोक मात्र खुल्यामनाने नवोदितांना प्रोत्साहन देत आहेत हा एक अपवादच म्हणावा लागेल. आतापर्यंत त्यांनी १५-१६ पुस्तकांना अभिप्राय व प्रस्तावना दिल्या आहेत. नेमाडे यांचा मनमिळाऊ स्वभाव, विनम्र स्वभाव ही एक दैवी देणगीच आहे म्हणूनच ते भाषाप्रभू आहेत. प्रत्येकाच्या हृदयात मनाची श्रीमंती लाभलेला माणूस म्हणून नेमाडे यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे. तसेच त्यात साखरेचा गोडवा निर्माण करणाऱ्या माईंचाही सिंहाचा वाटा आहेच, किंबहुना त्या त्यांची सावलीच आहेत, असे म्हणणेच योग्य ठरेल. अशा या साहित्यिकाला त्यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत`कडून हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.