‘इन्स्टंट लोन’ अ‍ॅप्सचा मोठा झोल!

    17-Sep-2022
Total Views |

apps
 
 
 
आजच्या ‘इन्स्टंट’च्या जमान्यात कर्जही हल्ली ‘इन्स्टंट’ मिळू लागली. त्यासाठीचे हजारो अ‍ॅप्सही मोबाईलवर सहजगत्या उपलब्ध होऊ लागले. परंतु, तत्काळ कर्जपुरवठा करणारे हे अ‍ॅप्स हे फसवणुकीचे नवीन अड्डे असल्याचेच गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवरुन सिद्ध झाले आहे. अशा अ‍ॅप्सबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. त्यानिमित्ताने हे ‘इन्स्टंट लोन’ अ‍ॅप्सचे सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून नेटकर्‍यांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
 
 
 
असे म्हणतात की, माणसाला कुठलेही सोंग आणता येते, पण पैशाचे नाही.कारण, माणसाला कधीही कुठल्याही कारणास्तव आर्थिक गरज भासू शकते.त्यावेळी जर तत्काळ अर्थसाहाय्य हवे असेल, तर मग काय पर्याय उपलब्ध असतात? जवळचे मित्र, नातेवाईक किंवा कार्यालयातील सहकारी. पण, तरीसुद्धा आर्थिक गरज भागवता येत नसेल, तर मनुष्य साहजिकच इतर पर्याय शोधू लागतो. अशावेळी बँकेकडे जाऊन कर्ज मागणे हा पर्याय अनेकांना अव्यवहार्य वाटतो. कारण, ती प्रक्रिया साहजिकच वेळखाऊ, क्लिष्ट आणि अनेक कागदी घोडे नाचवल्यानंतर कदाचित तुम्हाला कर्ज मिळू शकते. मग अनेकांना आणीबाणीची परिस्थिती समोर दिसत असते.
 
 
अशावेळी ‘इन्स्टंट लोन’ म्हणजे तत्काळ कर्जाच्या अनेक जाहिराती हल्ली समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात झळकताना दिसतात आणि याचाच गैरफायदा अनेक लुटारू घेतात.यासाठीचे सावज शोधणे हा अनेकांचा पूर्णवेळ उद्योग असतो आणि आता बहुतांश व्यवहार हे ‘डिजिटल’ झाल्याने अशी ऑनलाईन फसवणूक करणे सोपे झाले आहे.
 
 
त्यातच कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आणि शेकडो लोक बेरोजगार झाले. हातावर पोट असणार्‍यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. त्याच काळात ‘इन्स्टंट लोन अ‍ॅप्स’चे जाळे देशभरात पसरले होते. घरबसल्या कर्ज मिळत असल्यामुळे, अनेकांनी हे ‘लोन’ अ‍ॅप्स डाऊनलोड करून गरजेपुरते कर्ज घेण्यास सुरुवात केली. पाच ते दहा हजार इतक्या रकमेचे कर्ज देत असल्याने, अशा ‘लोन’ अ‍ॅपद्वारे कर्ज मिळवण्याचे प्रमाणही अल्पावधीत वाढले.
 
 
इंटरनेट वापरून अर्थ व्यवहार करणे हे आता अगदी सर्वमान्य झाले आहे. सुटसुटीतपणा, भौगोलिक मर्यादा नसल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘आग तेथे धूर’ तसे ‘अर्थ तिथे गुन्हेगार’ हे गृहीतकही तितकेच सत्य. फसवणूक करणारे लोक गरजू लोकांच्या अशा गरजांचे भांडवल करतात आणि अशा परिस्थितीत कथित विश्वासार्ह कर्ज देण्याच्या बहाण्याने त्यांचे पैसे लुटतात. यालाच ‘लोन घोटाळा’ असे म्हणतात. हे सत्र वर्षानुवर्षे चालू आहे. आता फक्त त्यांचे मार्ग आधुनिक झाले आहेत. पूर्वी पाकीटमार होते, आता ‘हॅकर्स’ आहेत. लोन घोटाळ्यात फसवणूक करणारे गरजू, हवालदिल झालेल्या व्यक्तीस कर्ज लवकर आणि सहजपणे मिळवून देण्याची खोटी आशा दाखवतात. ते व्यक्तीच्या गरजेनुसार एक फसवा, पण आकर्षक प्लॅन बनवतात.
 
 
उदाहरणार्थ, जर एका स्थापित बँकेत कर्ज मिळवण्यासाठी, अर्ज करणार्‍या व्यक्तीचा ‘क्रेडिट स्कोअर’ तेवढा चांगला नसेल किंवा खूप कमी वेळेत व्यक्तीला मोठ्या रकमेची गरज असल्यास, फसवणूक करणारे ते कसे काही मिनिटांमध्ये व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार कर्ज मिळवून देऊ शकतात, हे खूप हुशारीने पटवून देतात. लोन घोटाळ्यास भरीस पडल्यास त्याचे दोन मुख्य परिणाम होतात - एकतर फसवणूक करणारा ‘सिक्युरिटी’ (गॅरंटर) म्हणून काही आगाऊ रक्कम मागू शकतो, जी कधीही परत केली जात नाही किंवा प्रोसेसिंग फी, लेट फी, व्याज आणि अशा इतर बर्‍याच खर्चाच्या बहाण्याने तुमच्याकडून एकूण रक्कम काढू शकतो.
 
 
अशाप्रकारे शेवटी कर्ज घेणार्‍या व्यक्तीचे मोठे आर्थिक नुकसान होते. गुन्हेगार तुमच्याशी अनेकदा मेसेज, ई-मेल किंवा फोनद्वारे संपर्क साधतात आणि तुम्हाला त्यांचे लोन ‘डाऊनलोड’ करण्यास सांगून तुमचे तपशील भरून झटपट कर्ज मंजुरी मिळवण्यास सांगतात. ‘डाऊनलोड’केल्यावर, ते तुमच्या फोनवरील प्रत्येक गोष्टीत प्रवेश मिळवण्याची विनंती करतात - तुमची संपूर्ण संपर्क सूची (अड्रेस बुक), फोटो आणि व्हिडिओ इत्यादी. तुम्ही तुमचा आधार, पॅन, पत्ता आणि तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम यासारखे मूलभूत तपशील भरल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यात रोखरक्कम जमा झालेली दिसेल. पण, यावर खूश व्हायचे क्षण अगदी थोडे असतात.
 
 
कारण, खरी गंमत आता पुढे सुरू होते. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी अशा ‘लोन’ घोटाळ्यात बळी पडलेल्या आणि देऊ केलेले पैसे स्वीकारणार्‍यांना वसुली एजंटांकडून हरप्रकारे त्रास दिला जातो आणि गैरवर्तन केले जाते. अश्लील संदेश, अश्लील चित्रे आणि अपमानास्पद मजकूर व्यक्ती तसेच त्याच्या/तिच्या संपर्क यादीतील इतरांना पाठवले जातात. काही बाबतीत ‘सायबर’ गुन्हेही घडतात व आपली सर्व माहिती वापरून खोटी खाती, प्रोफाईल्स निर्माण केले जातात.
पुढे काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत, जे तुम्हाला लागलीच सांगतील की, तुमच्याशी संपर्क साधणारा व्यक्ती एक लोन घोटाळेबाज आहे.
 
 
1) कर्जदात्याची संस्था ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ सोबत अधिकृत नोंदणीकृत केलेली नाही आणि कोणत्याही ज्ञात बँक किंवा वित्तीय संस्थेशी निगडित नाही.
 
2) प्ले-स्टोअरवर लोन उघड नाही. कर्जाच्या नियम व अटींचे तपशील उघड करत नाही, कर्ज मंजूर करण्याआधी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासत नाही.
 
3) कर्जदाता नोंदणीकृत नाही, त्यांच्या कार्यालयाचा पत्ता, संकेतस्थळाचा पत्ता नाही.
 
4) कर्जाचे वितरण करण्याआधी आगाऊ स्वरूपात कर्जाच्या शुल्काची मागणी केली जात आहे
 
5) कोणतेही क्रेडिट सत्यापन केले गेले नाही आणि असे सांगितले जाते की, कर्ज क्रेडिट मुक्त आहे.
 
6) कर्जदाता खूप कमी व्याज दरावर कर्ज देऊ करेल आणि ते फक्त मर्यादित कालावधीसाठी वैध आहे.
लोन घोटाळ्यापासून आपला
 
बचाव कसा करावा?
 
 
1) कधीच कोणाला तुमचे वैयक्तिक तपशील आधार, पॅन, बँक खाते क्रमांक इत्यादी फोन, ई-मेल किंवा इतर माध्यमातून शेअर करू नका.
 
2) कर्जदात्याची विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी नेहमी त्यांचा वास्तविक पत्ता आणि संकेतस्थळाचे मूल्यांकन करा.
 
3) तुमचा वनटाईम पासवर्ड किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाहीसोबत शेअर करू नका.
 
4) कर्जाची ऑफर समजून घ्या. कारण, घोटाळे करणारे नेहमीच काहीतरी संशयास्पद लाभ देण्याची लालूच देतात.
भामट्यांचे फोन क्रमांक हे नोएडा, पश्चिम बंगाल, झारखंड भागात रजिस्टर आहेत. ‘सायबर’ पोलिसांच्या मते, असे पाच-दहा नव्हे, तर तब्बल 300हून अधिक अ‍ॅॅपद्वारे फसवणूक होते. ‘सायबर सेल’ अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, हे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय पातळीवरून नेटवर्कचा वापर करत असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे ‘सायबर’ पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने या फसवणुकीची दखल घेतली आहे आणि गेल्या दोन वर्षांत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, कर्ज सेवा प्रदात्याला देय असलेले सर्व शुल्क हे कर्जदेयकाने भरले पाहिजे, कर्जदाराने नाही. नियामक मार्गदर्शक तत्त्वांमधील त्रुटी दूर करून ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी बँका आणि संलग्न वित्तसंस्था बँका जबाबदार असतील. क्रेडिट मर्यादा आपोआप वाढवण्यासाठी कोणताही अतिरिक्त भार नसावा, असेही त्यात नमूद केले आहे. तसेच, ‘आरबीआय’ने म्हटले आहे की, ‘डिजिटल’ कर्जाची किंमत कर्जदाराला अगोदरच जाहीर केली पाहिजे व ती एकतर्फी बदलणे वैध नाही. एप्रिलमध्ये, ‘आरबीआय’च्या कार्यकारी गटाला 600 बेकायदेशीर कर्ज देणारी अ‍ॅप्स सापडली. ‘डिजिटल’ फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे, केंद्रीय बँक आता ‘तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या’ (केव्हायसी) निकषांवर पुनर्विचार करत आहे, ज्यामुळे अपुरेपणा ओळखता येईल आणि ती जागा भरून काढता येईल.
 
 
चिनी सायबर गुन्हेगार अनेकदा बेरोजगार तरुणांना आणि आर्थिकदृष्ट्या तणावाखाली असलेल्या समाजातील निम्न स्तरातील लोकांना प्रथम हेरतात, जे गुन्हेगारी सिंडिकेट आणि टोळ्यांचे सहज सावज बनतात. ते अनेक देशांमध्ये बेकायदेशीरपणे घोटाळ्याचे कामकाज चालवत आहेत, अशी अनेक प्रकरणे आढळून आली आहेत आणि कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी चीनच्या शेजारील देशांमध्ये अशा बेकायदेशीर कारवाया वाढल्या आहेत. नुकतेच काठमांडूमधील बेकायदेशीर कॉल-सेंटरवर नेपाळ पोलिसांनी छापा टाकला आणि 190 लोकांना अटक केली. ज्यात पाच चिनी नागरिक आणि दोन भारतीयांचा समावेश आहे.
 
 
नेपाळच्या गुप्तचर संस्थांनी भारतीयांना लक्ष्य करून ‘सायबर’ गुन्ह्यांसाठी चिनी नागरिकांकडून नेपाळी लोकांचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काठमांडू आणि इतर भागात चिनी लोकांनी बेकायदेशीर ‘कॉल सेंटर्स’ स्थापन केली होती. स्थानिकांना भरघोस पगार आणि कमिशनचे आमिष दाखवून, अपमानास्पद कॉल आणि अश्लील फोटोंद्वारे भारतीयांकडून पैसे उकळण्याचे घाणेरडे काम केले होते. नेपाळने बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या 1 हजार, 500 हून अधिक चिनी नागरिकांना मायदेशात पाठवले आहे. या गुन्ह्याचा हा आहे आंतरराष्ट्रीय पैलू आहे. तेव्हा, एकूणच अशा लोन अ‍ॅपच्या जाळ्यात न अडकता सर्वसामान्यांनी आपली अर्थसुरक्षा करणे नितांत गरजेचे आहे.
 
 
-दीपक शिकारपूर