ज्ञानेश्वरी’तील वाङ्मयगणेश

    15-Sep-2022
Total Views |
dnyaneshvari shree ganesh
 
आज ‘ज्ञानेश्वरी’ जयंती. ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीचे गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे! ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही, तर हे श्रीगणेशाच्या रुपाचे खरे वर्णन आहे. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयची मूर्ती आहे, अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.
 
आज ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची जयंती. मनुष्याच्या जीवनाला उपयुक्त असे मार्गदर्शन करणारा कालातीत ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. शके १२१२ म्हणजे इ. स. १२९० या वर्षात लिहिली गेलेली ‘ज्ञानेश्वरी’ आजही ‘ग्रंथराज’ म्हणून गौरविली जाते. एखाद्या अशा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथाची जयंती समाजात साजरी होणं, हे त्या ग्रंथाच्या महानतेचं आणि समाजाच्याही प्रगल्भतेचं लक्षण आहे.
पूर्वीच्या काळी ग्रंथ हाताने उतरवून त्याची प्रत सिद्ध केली जात असे. या प्रक्रियेत काही पाठभेद उत्पन्न होत गेले, त्यामुळे संत एकनाथांनी शके १५०६ मध्ये ज्ञानेश्वरीचे पाठभेद दूर करून मूळचा शुद्ध ग्रंथ प्रसिद्ध केला.ते काम ज्या दिवशी संपले त्या तिथीची म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठी या दिवसाची नोंद उपलब्ध असल्यामुळे हा दिवस ‘ज्ञानेश्वरी’ची जयंती म्हणून साजरा होतो.
 
 
वेदोपनिषदांचे सार व्यासांनी भगवद्गीतेच्या रूपाने दिले. ज्ञानेश्वरांनी तेच ज्ञान प्राकृतात आणताना तत्त्वज्ञानाला भाषासौंदर्य, तरल काव्यप्रतिभा, अलौकिक उपमा रूपकादी अलंकार आणि अमृततुल्य माधुर्याची जोड दिली. ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ रचताना प्राचीन महाकाव्ये ज्या पद्धतीने लिहिली जात, त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्ञानेश्वर गेले आहेत.त्यामुळेच ते ग्रंथारंभाला श्रीगणेश शारदेला वंदन आणि श्रीगुरूंना अभिवादन करतात. ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीचे गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे! ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही, तर हे श्रीगणेशाच्या रुपाचे खरे वर्णन आहे. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयची मूर्ती आहे, अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.
 
 
‘ॐ’कार हे परब्रह्म स्वरुपाचे प्रथम नादरुप प्रतीक. त्याच्या उच्चाराने स्वरुपाची जाणीव निर्माण होते. या जाणिवेसोबत एकरुपतेचे भान येते व त्यातून घडते ते खरे ’नमन.’ तो खरा नमस्कार! विश्वनिर्मिती केल्यानंतर परमेश्वराने त्यावर उठवलेली आपली नाममुद्रा म्हणजे ’ॐ.’ अशा आदिबीज ओंकारापासून विस्तार पावत गेलेली शास्त्रदर्शने, त्यातून साकारलेले विस्तार पावत असलेले तत्त्वज्ञान, हा शब्दब्रह्मरुपी आविष्कार, हेच गणेशाचे खरे रूप. म्हणून तो आदिदेव. आपल्या कोणत्याही कृतीला याचे म्हणजेच तत्त्वांचे, विचारांचे अधिष्ठान असेल, तर ते निर्विघ्न पार पडतेच.
 
 
ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा॥
देवा तूचि गणेशु। सकलमतिप्रकाशु॥
म्हणे निवृत्तीदासु। अवधारिजो जी॥
आणि मग थेट
अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।
मकार महामंडल। मस्तकाकारे॥
हे तिन्ही एकवटले।
तेथ शब्दब्रह्म कवळले।
ते मियां श्रीगुरुकपा नमिले।
आदिबीज।
 
 
या गणेश स्तवनाच्या ओव्या आपल्याला माहिती आहेत. पण, माऊलींनी या ग्रंथसिद्धीसाठी जे मंगलाचरण लिहिले ते आहे २१ ओव्यांचे.
 
’ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मियां।’ या ओवीशी ते संपते. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयाची मूर्ती आहे, अशी कल्पना केली.
 
हे शब्दब्रह्म अशेष।
तेंचि मूर्ति सुवेष।
तेथ वर्णवपु निर्दोष।
मिरवत असे ॥३॥
 
सुरुवातीला त्याला सर्वांचे मूळ ’आद्य’, ज्याचे स्वरूप समजून घ्यायचे, तर वेदांचा आधार घ्यावा लागेल, असा ’वेदप्रतिपाद्य’ आणि जो केवळ आपल्या आतल्या संवेदनेने, जाणिवेनेच जाणता येऊ शकेल, असा सर्वव्यापी, आत्मरुप असा गणेश असे म्हटले आहे. तोच सर्वांच्या बुद्धीमध्ये अर्थाचा प्रकाश पाडतो.
 
 
असा हा श्रीगणेश म्हणजे संपूर्ण वेदवाङ्मयाची जणू उत्तम वेषधारी मूर्ती. त्याचे सुडौल शरीर ’वर्णवपु’ म्हणजे स्वर व्यंजनरुपी आहे, जे निर्दोषपणेझळाळत आहे! पुढे माऊलींनी त्याचा प्रत्येक अवयव, दागिने, फुले यांसाठीदेखील जी प्रतीके वापरली आहेत, त्यातून आपल्या समस्त प्राचीन वाङ्मयाचा ठेवा किती प्रचंड आहे, हे लक्षात येते.श्रीगणेशाची पूजा म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञानाची पूजा असे का म्हणतात, ते पटते.
 
 
स्मृती हे त्याचे अवयव आहेत आणि त्यांच्यातील अर्थसौंदर्यामुळे या अवयवांना डौल प्राप्त झाला आहे. १८ पुराणे म्हणजे त्याची आभूषणे व त्या अलंकारातील जी रत्ने आहेत, ते या पुराणातील तत्त्वज्ञान, तर त्यातील छंदमय पद्यरचना म्हणजे त्या रत्नांची कोंदणे. आमच्याकडील लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हे त्याचे विविधरंगी वस्त्र. त्या वस्त्राचा पोत इतका दर्जेदार, तलम, चमकदार दिसतो आहे, तो या काव्यातील शब्द आणि अर्थालंकारामुळे! त्याच्या पायातील लहान-लहान घंटा/घुंगरु म्हणजे जणू काव्यनाटिका. त्या नुपुरांचा झंकार म्हणजे त्यातील अर्थ! त्यातल्या तत्त्वसिद्धांतांची पाहणी कराल, तर उचित अशा पदांची लहान लहान रत्ने त्यातही दिसून येतील.
 
 
व्यासादी कवींची प्रतिभा म्हणजे त्याचे कटिवस्त्र. त्यांच्या शुद्धतेचे प्रतीक म्हणजे त्याच्या पदराला असलेल्या मौक्तिकमाला! जे निरनिराळे तत्त्वसंप्रदाय सांगितले जातात. (वेगवेगळे विचारप्रवाह ) ते याचे सहा हात आहेत. यांची मतभिन्नता दर्शविण्यासाठी त्याच्या प्रत्येक हातात निराळे आयुध आहे. तर्कशास्त्र हा हातातील परशु. न्यायदर्शन हा अंकुश. हातातील मोदक म्हणजे ब्रह्मरसाने भरलेला वेदान्त!
आपल्या परंपरेत बुद्धमताला (तत्त्वज्ञानाला) शून्यमत (अपुरे -परिपूर्ण नाही असे) मानले जाते. त्याची त्रुटी दर्शविण्यासाठी तुटका दात हातात आहे.
 
 
सांख्यमताचा सत्कार म्हणजे त्याचा वरदहस्त, तर अभयहस्त म्हणजे धर्माची प्रतिष्ठा आणि गणेशाची सोंड म्हणजे तर ब्रह्मसुख. केवळ परमानंद! ती प्रतीक आहे अतिशय निर्मल, विवेकपूर्ण अशा योग-अयोग्यतेच्या विचारांचे! यासंदर्भातला परस्परातला संवाद म्हणजे त्याचे दात आणि त्या संवादातली नि:पक्ष वृत्ती म्हणजे त्या दातांची शुभ्रता.आपल्या आत स्फुरण पावणारे ज्ञान म्हणजे त्याचे बारीक डोळे. त्याचे दोन्ही कान म्हणजे धर्ममीमांसा व ब्रह्ममीमांसा.
 
 
सर्व ऋषिमुनी भुंग्याप्रमाणे सतत श्रवणचिंतनाचा मधुर गुंजारव करत त्याच्या गंडस्थलातून पाझरणार्या ज्ञानमदरूप अमृताचे सेवन करत आहेत, असे वाटते! द्वैत-अद्वैत ही दोन गंडस्थळे आहेत, ती वादविवादात तितकीच तुल्यबळ असल्यामुळे एकमेकांना खेटून बसली आहेत व ती श्रुती, स्मृती, वेद, पुराणे यातील तत्त्वार्थरुप पोवळ्यांच्या आभूषणाने तेजस्वी दिसत आहेत. उत्तम ज्ञानाचा मकरंद उदारपणे देणारी दहा उपनिषदे म्हणजे फुले, असे सर्व वर्णन झाल्यावर मग ‘अ’कार म्हणजे दोन्ही पाय, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट व ‘म’कार म्हणजे मोठे गोल मस्तक.
 
 
हे तिन्ही एकत्र आल्यावर जो ओंकार तयार होतो, त्यात सर्व साहित्यविश्व सामावते म्हणून त्या आदिबीजाला मी सद्गुरुकपेने नमन करतो आणि मग वाणीचे नित्यनूतन अपूर्व असे विलास दाखवणारी, चातुर्य, शब्दकलाश्री, सर्व विद्या कला यांची सम्राज्ञी विश्वमोहिनी अशी जी शारदा, तिला नमन करतो.
 
 
हे मंगलाचरण म्हणजे पुढे जे काही अतिशय विशुद्ध असे ज्ञान मिळणार आहे, त्याची नांदीच आहे. संपूर्ण गीता वा ज्ञानेश्वरीत कुठेही कर्मकांडाचे अवडंबरच काय समर्थनही नाही. या मंगलचरणातही जिथे जिथे तेज आहे, ते ज्ञानाचे, तत्त्वार्थाचे व सौंदर्य आहे, ते अर्थामुळे आणि याचा आस्वादही घ्यायचा आहे तो आपल्या जाणिवेने! केवळ रुक्ष, गंभीर, कोरडे तत्त्वज्ञानच श्रेष्ठ असे नाही, तर ते कलालालित्य, प्रासादिकता यांनी रसपूर्ण केलेले असा रसमय ज्ञानमय मोदकच माऊली आपल्याला खाऊ घालत आहेत, असे वाटते. ज्ञानेश्वरी ही संपूर्ण तत्त्वज्ञान समजून घेण्याची आधुनिक काळातली पहिली पायरी मानता येईल.
 
 
‘ज्ञानेश्वरी’मुळे श्रीमद्भगवद्गीता समजते. गीतेमुळे महाभारत, भागवत वाचावे वाटते. त्यातून वेद उपनिषदांचा अभ्यास करावा वाटतो, अशी खालून वर संसार ते मोक्ष नेणारी ही साखळी आहे, असे जाणकार सांगतात. पहिल्याच इयत्तेत याची गोडी निर्माण करण्याचे काम माऊली अतिशय चातुर्याने करतात, हे नक्की!
 
विनीता तेलंग