नवी दिल्ली: जम्मू – काश्मीरच्या राजकारणामध्ये नवी सुरुवात करणारे काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गलाम नबी आझाद यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टिआरएफ) संघटनेने तसे पोस्टर सार्वजनिक केले असून आझाद यांना भाजपचा एजंट ठरविले आहे.
जम्मू-काश्मीरच्या राजकारणात गुलाम नबी आझाद यांचा प्रवेश हा अचानक झाला नसल्याचे पोस्टरमध्ये म्हटले आहे. आझाद यांचा राजकारणातील प्रवेश विचारपूर्वक केलेल्या धोरणाचा भाग आहे. आझाद यांनी आपल्या जुन्या पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये राहून पक्ष सोडून जम्मू-काश्मीरच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. पक्ष सोडण्यापूर्वी आझाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बंदद्वार बैठक घेतली होती. त्याचप्रमाणे आझाद यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांचीदेखील भेट घेतल्याचा दावा पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.
विस्थापित काश्मीरी पंडितांचा वापर भाजप आपल्या राजकारणासाठी करत असल्याचा आरोप टिआरएफने केला आहे. जम्मू – काश्मीरमध्ये सर्वकाही ठिक असल्याचे भासवून तेथे निवडणुका घेण्यासाठी आझाद यांना जम्मू – काश्मीरमध्ये सक्रीय करण्यात आले असल्याचा आरोप टिआरएफने केला आहे. काश्मिरी हिंदू राहुल भट्टचा संदर्भ देत टिआरएफने म्हटले की राहुल भट एनएसए डोवाल यांच्या थेट संपर्कात होता. ते लक्षात आल्यानंतर आम्ही राहुल भट याची हत्या केली, असेही टिआरएफने म्हटले आहे.