डेटासुरक्षा आणि विश्वासार्हता!

    14-Sep-2022   
Total Views |
syber sequrity
 
 
 
बलाढ्यातील बलाढ्य कंपन्या कालानुरुप संदर्भहीन झाल्याचा इतिहास आपल्याला २१व्या शतकातही जुना नाही. विज्ञान-तंत्रज्ञान असो वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील बलाढ्य कंपनीला गाशा गुंडाळावा लागतो, हे चांगले लक्षण तर मुळीच नाही. डेटा चोरी आणि ग्राहकांशी नसलेल्या प्रामाणिकतेमुळे भविष्यात असा धोका जर सोशल मीडियातील ‘जाएंट’ कंपन्यांना बसणार नाही ना, याचा विचार करण्याची आज गरज आहे. एखाद्या बलाढ्य कंपनीचे कालबाह्य होण्याच्या प्रक्रियेत थेट रोजगार अवलंबून असलेल्यांना किमान काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळूनही जाते. मात्र, अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अप्रत्यक्षरित्या अवलंबून असणार्यांचे काय होणार, हा प्रश्न आहे.
 
 
 
‘जनरेशन झेड’ म्हणजेच १९९७ते २०१२ मध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या (२३ ते १० वयोगट) सर्वेक्षणात अशीच एक बाब सोशल मीडिया कंपन्यांची चिंता वाढवणारी आहे. या वर्गातील अनेक सोशल मीडिया युझर्स विशेषतः फेसबुक युझर्स ‘अॅक्टिव्ह’ नसल्याचे दिसून आले. आभासी क्षेत्रातील मित्रांच्या दुनियेवरून त्यांचा विश्वास काहीसा उडाल्याचे दिसून आले, तर १९८१ ते १९९६ म्हणजेच २६ ते ४१ दरम्यान असलेल्या युझर्सनी फेसबुक वापरणे जास्त पसंत केल्याचे निदर्शनास आले आहे. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या नव्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत १३ ते १७ वर्षांच्या ३२ टक्के युवा फेसबुकचा वापर करत आहेत. हा आकडा २०१४-१५ दरम्यान तब्बल ७१ टक्के इतका होता.
 
 
 
इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या सगळ्याची नव्याने भर पडल्याने फेसबुक युझर्सच्या ऑनलाईन असण्याचा आलेख घसरत चालला. हा प्रघात एका दिवसात पडलेला नाही. सलग पाच वर्षे फेसबुक वापरण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत गेले. अमेरिकेतील आकडेवारीनुसार, १३ ते १७ वर्षांतील केवळ ३२ टक्के युझर्स नियमितपणे फेसबुकचा वापर करत आहेत. इतक्या मोठ्या कंपन्यांवर विश्वासार्हता गमावण्याची वेळ का येते, याचे चिंतन कंपन्यांनी स्वतःच केले पाहिजे. नवी पिढी डेटाचोरी आणि गोपनीयैतेबद्दल प्रचंड संवेदनशील आहे, हे विशेष. अनेकदा या वर्गाला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही.
 
 
 
कारण, हा वर्ग ना मतदार असतो किंवा निर्णयक्षम असतो. मात्र, या दोन्ही बाबींबद्दल सक्षम होण्यासाठीचा १३ ते १७ हाच वयोगट असतो. अनेकदा भविष्यातील निर्णय आणि मतमतांतरे याच वयोगटात बिंबवली जातात. सर्वेक्षणातील पाच वर्षांत हळूहळू सोशल मीडिया वापरातील घट हीच गोष्ट पटवून देते. डेटाचोरीच्या भीतीने या वयोगटाने फेसबुक हा मंच वापरणे बंद केले. याउलट फेसबुकची ‘मातृत्व’ संस्था असलेल्या इन्स्टाग्रामवर एकूण युझर्सपैकी ६२ टक्के युवा आहेत. युवा वर्गाला आपल्या मंचावर खेचून ठेवण्यासाठी ‘मेटा’ या कंपनीचे यश नक्कीच म्हणावे लागेल. मात्र, या वर्गातील युझर्स फारच लवकर नव्या गोष्टी मिळाल्या नाही तर लवकर कंटाळतात.
 
 
 
याचमुळे वारंवार सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या नवनवीन फिचर्सद्वारे युझर्सना आकर्षित करतात. एव्हाना फेसबुकलाही कळून चुकलेले आहे की, त्यांचा २३ ते १० वर्ष वयोगटातील एक मोठा वर्ग त्यांच्यापासून दुरावलेला आहे. मात्र, त्यापुढील पिढी फेसबुकचा वापर अद्याप करत आहे आणि त्यात सातत्यही आहे. फेसबुकने वरील वयोगटातील युझर्सना आकर्षित करण्यासाठी बरेच प्रयत्न करून पाहिले आहेत. मात्र, ते फोल ठरले. नव्या पिढीला ६० सेकंदापेक्षा व्हिडिओ पाहण्यातच जास्त रस आहे, असेही सर्वेक्षण सांगते. त्याच कारणास्तव युट्यूब शॉर्ट्स, फेसबुकवरही ‘रिल्स’ हे फिचर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
 
 
 
भारतातील मोबाईल युझर्सबद्दलही असाच एक अधिकृत अहवाल प्रकाशित झालेला आहे. त्यात ७३ टक्के युझर्स मोबाईलचा वापर करत आहेत. त्यातील ३० टक्के मुलांना मानसिक आजाराशी निगडित समस्यांचा सामना करावा लागतो. दहापैकी तीन मुलांमध्ये चिडचीड किंवा भीतीची चिंता सतावते. सोशल मीडियाचा जास्त वापर हा उत्प्रेरकांमध्येही बदल घडवतो. याच सगळ्यात आता सोशल आणि ‘डिजिटल मीडिया’ साक्षरताही महत्त्वाची ठरणार आहे. कंपन्यांनी वेळीच न केलेले आत्मचिंतन त्यांना कालबाह्य ठरवू शकते. पण, त्या तसे होऊ देणार नाहीत. झाल्यास नवे पर्यायही उपलब्ध असतील. मात्र, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल. त्यामुळे ‘सायबर’ सुरक्षेच्या माध्यमातून कंपन्यांनी युझर्सचा विश्वास कायम जपणे हेच गरजेचे आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. तीन वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन.