एकता-एकात्मता व आंतरराष्ट्रीय शांतता-सुरक्षा

    14-Sep-2022   
Total Views |
bharath

 
 
 
राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा काही परस्पर संबंध आहे का? संविधानात हे शब्द शोभेसाठी आलेले नाहीत. या दोघांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे.
 
 
आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत ‘राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता...’ असे शब्द शेवटी आलेले आहेत. या शब्दांची निर्मिती १९४९ साली झाली. या शब्दातील भाव त्यावेळी जितका महत्त्वाचा होता, तेवढाच महत्त्वाचा आजदेखील आहे. आपल्या संविधानाच्या राज्य धोरणाच्या निदेशक तत्त्वात ‘कलम ५१’ आहे. हे कलम सांगते की, “आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रांराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी...प्रयत्नशील राहील.”
 
 
राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा काही परस्पर संबंध आहे का? संविधानात हे शब्द शोभेसाठी आलेले नाहीत. या दोघांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता बलशाली झाली की, आपण शक्तीसंपन्न होतो. जगाचा व्यवहार असा आहे की, जो शक्तीसंपन्न आहे, त्याचे ऐकायचे. दुर्बळांच्या शब्दांना कुणी काहीही किंमत देत नाही. दुर्बळांचे शब्द कसे असतात? अंगावर फाटकी वस्त्रे घातलेला माणूस जर प्रवचन देऊ लागला की, प्रत्येक व्यक्तीने अंगावर उत्तम कपडे घातले पाहिजेत, तर त्याचे प्रवचन कोण ऐकणार? लोक म्हणतील, ‘अगोदर स्वतःच्या लंगोटीची चिंता कर आणि मग दुसर्याच्या डोक्यावर टोपी आहे की नाही याची काळजी कर.”
 
 
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, या घडीला कशी आहे? युक्रेनवर रशियाने आक्रमण केलेले आहे. मध्यपूर्व अशांत आहे. इस्लामी दहशतवाद अधूनमधून डोके वर काढत असतो. पॅसिफिक महासागरात चीनचे हातपाय पसरणे चालू आहे. भारत-चीन सीमा अशांत आहे. पाकिस्तानातून दहशतवादी प्रशिक्षित होऊन भारतात घुसतात. इराक, सीरिया आणि लिबिया आजही अस्थिर देश झालेले आहेत. सीरियातून ४० लाख मुसलमान लोकांनी स्थलांतर केले. तुर्कस्तान आणि युरोपातील देशात निर्वासित होऊन ते गेले आहेत. श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांची राजवट आलेली आहे. युक्रेनमध्ये आलात तर आम्ही अणुबॉम्बचा वापर करू, अशी धमकी पुतीन यांनी पाश्चात्य देशांना दिली आहे.
 
 
जागतिक मानवजातीचा विचार करता तिच्या अस्तित्त्वापुढे जे धोके निर्माण झालेले आहेत, ते फार भयानक आहेत. अणुयुद्धाचा धोका, पर्यावरणनाशाचा धोका, कोरोना आणि अन्य नवीन रोगराईचा धोका, गरीब आणि श्रीमंत असे जे विभाजन झाले आहे, तोदेखील धोका आहे. हे विभाजन गरीब देश आणि श्रीमंत देश असे आहे. जो सोशित, पीडित, वंचित असतो, तो गरीब असतो. त्याच्याकडे गमावण्यासारखे काही नसते, मिळविण्यासारखे भरपूर असते, अशी मानवजात नंतर संघटित होते, आक्रमक होते, विध्वंसक होते आणि त्यांच्या झंझावाताखाली कधी रोमन साम्राज्य, कधी बायझेन्टाईन साम्राज्य, कधी इराणी साम्राज्य, कधी चिनी साम्राज्य, कधी भारतीय छोटी-छोटी राज्ये, नाश पावतात.
 
 
या संकटातून जगाला कोण वाचवील? आपल्या घटनाकारांनी त्याचे उत्तर दिले आहे, ते म्हणजे भारताने त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. घटनाकारांना असे का वाटले? आपली लंगोटी अगोदर ठीक करा आणि मग जगाची चिंता करा, हे त्यांना समजत नव्हते का? न समजण्याइतके ते अडाणी नव्हते. मग तरीही त्यांनी घटनेत हे शब्द का आणले? त्याचे उत्तर असे की, जगाच्या कल्याणाची चिंता करणे हे भारताचे जीवनलक्ष्य आहे. भारत कशासाठी आहे? भारत स्वतःसाठी नाही, भारत मानवजातीसाठी आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ आणि ‘सर्व मानवजात ही सर्व माझी आत्मिय सृष्टी आहे’ हा भारताचा विचार आहे. नुकताच गणेशोत्सव झाला आणि प्रत्येक घरात वेदमंत्रात गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली.
 
 
त्या मंत्राचे अर्थ काय आहेत, याकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो. आपले लक्ष मोदकात आणि सजावटीत असते. पण, ते मंत्र सांगतात की, ही पूजा मी चतुःस्पाद, द्वीपाद आणि सर्व प्राणी, वनस्पती यांच्या कल्याणासाठी करीत आहे. पूजा असते माझ्या घरात, पण विचार असतो विश्वकल्याणाचा, हा आपला संस्कार आहे. आपल्या घटनाकारांनी आपला हा सनातन विचार, विश्वकल्याणाचा ध्येयवाद संविधानाच्या कायद्यात आणला.
 
 
हे विश्वकल्याणाचे लक्ष्य साध्य करायचे असेल, तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता बळकट झाली पाहिजे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता कशात असते? ती बंधुभावनेत असते. आपण सर्व भारतीय एकमेकांचे बंधुभगिनी आहोत, हीच भावना राष्ट्राची एकात्मता आणि एकता बळकट करते. ही भावना पगडी-पागोट्याचे राजकारण करून वाढविता येत नाही.
 
 
ब्राह्मणद्वेषाचे राजकारण करून वाढविता येत नाही. दगडुशेठ हलवाई गणपतीकडे पाठ फिरवून ही भावना वाढविता येत नाही. ‘हिंदू दहशतवाद’ म्हणून ही भावना वाढविता येत नाही. ही भावना पूर्वी जातींचे राजकारण करून आणि ‘महादलित’ शब्दप्रयोग करून वाढविता येत नाही. हिंदूंना शिव्या घालणार्या बिशप यांना गळाभेट देऊन राष्ट्रीय एकता आणि एकात्मता वाढविता येत नाही. ‘संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, गणतंत्र धोक्यात आहे,’ असल्या १०० टक्के खोट्या आरोळ्या ठोकून, लोकांची दिशाभूल करून ही भावना वाढविता येत नाही.
 
 
जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतात चालणार्या राजकारणाचा विचार केला, तर जगाची अपेक्षा काय आणि आमचे राजकीय नेते काय करतात, यातील विसंगती पाहून दुःख होते. आमच्या राजकारण्यांची एकच विषयसूची आहे, ‘मोदी नकोत’ हा त्या विषयसूचीचा मंत्र आहे. त्यासाठी हे आमचे राजकारणी नेते काहीही करायला तयार असतात. ममता म्हणतात, “सर्व देशात आता ‘खेला होबे’.
 
 
राहुल गांधी म्हणतात, “संघ आणि भाजपने गेल्या आठ वर्षांत जे नुकसान केले आहे, ते मला भरून काढायचे आहे.” पवार म्हणतात, “विरोधी पक्षाचे महागठबंधन झाले तर मोदींना सत्तेवरून घालविता येईल.” केजरीवाल म्हणतात, “मी जनतेला फुकटखाऊ बनवितो. मोफत वीज, पाणी आणखी काय काय देऊ करतो. लोक आळशी आणि लाचार झाले की आपल्या मागे येतील.”
 
 
यापैकी एकही नेता असे म्हणत नाही की, मला भारताला महान करायचे आहे. कारण, ती जगाची गरज आहे. मानवजातीला जीवंत ठेवायचे असेल आणि मानवाची दुःख दूर करायची असतील, तर भारताने सामर्थ्यशाली आणि समृद्ध होणे ही प्राथमिक गरज आहे. ही प्राथमिक गरज पूर्ण करण्यासाठी भारत एकात्म होणे गरजेचे आहे. जाती, वर्ण, उपासना, भाषा आणि राजकीय विचारश्रेणी, हे सर्व विषय भेद निर्माण करणारे विषय ठरतात. या भेदांना गाडून देशाला उभे करायचे आहे आणि यासाठी माझा प्रयत्न चालू आहे, असे एखादा तरी विरोधी पक्षातील राजकीय नेता म्हणतो का? तो म्हणणार शिवाजी महाराजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणे चूक आहे.
 
 
तो म्हणणार, ब्राह्मणवादाने देशाचे नुकसान केले आहे म्हणून ब्राह्मणांना बाजूला सारले पाहिजे. आणखी एखादा म्हणणार की, सत्ता ओबीसी जातींकडेच राहिली पाहिजे. कारण, त्यांची बहुसंख्या आहे आणि मी ओबीसीचा नेता आहे, असे सर्व राजकारण हे देशात जातीय विद्वेष पसरविणारे, धार्मिक तेढ वाढविणारे, संभ्रम निर्माण करणारे, अराजकाला निमंत्रण देणारे, स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा स्वार्थ साधणारे, आपण श्रीमंत बनून जनतेला आर्थिक गुलामीत ढकलणारे आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जनतेने खरोखरच साक्षर झाले पाहिजे.
 
 
केवळ अक्षरओळख होऊन पुरेसे नाही. तसेच, केवळ कौशल्य संपादनही पुरेसे नाही. आजच्या घडीला कोण देशाचा विचार करतो आणि कोण स्वतःचा आणि स्वतःच्या घराण्याचाच विचार करतो, याचा विवेक आपण केला पाहिजे. आपल्या संविधानाने आपल्यावर (विवेकवादी) बनण्याची जबाबदारी टाकली आहे आणि आपण खरोखरच विवेकवादी झालो, तर संविधानात म्हटल्याप्रमाणे आपला भारत राष्ट्रीय एकता आणि एकात्मता याने परिपूर्ण होईल, असा भारत हीच जागतिक शांततेची हमी असेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.