संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवणार्या महासत्तेला ‘कोड्यात’ टाकणार्या मंगेश सखाराम घोगरे या भारतीय तरुणाविषयी...
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील नेरुळचा रहिवाशी असलेल्या मंगेश घोगरे याचा जन्म पनवेल येथे १९८० साली झाला. मंगेशचे वडील निवृत्त चाकरमानी तर, आई गृहिणी. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच संगोपन झालेल्या मंगेशचे बालपण तसे आनंदात गेले. पनवेलच्या ‘सुधागड एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर पनवेलमधीलच ‘महात्मा एज्युकेशन सोसायटी’त माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मंगेशने ‘वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट’ (व्हिजेटीआय)मधून ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ आणि ‘एनएमआईएमएस’ची पदवी घेऊन नंतर अर्थ विषयात ‘एम.बीए’ केले.
सध्या तो बँकिंग क्षेत्रात असून एका जपानी अर्थविषयक गुंतवणूक कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे.
विद्यार्थी दशेत असताना आपणही अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, अशी इच्छा मंगेशने मनी बाळगली होती. पण, आर्थिक परिस्थितीमुळे त्याने मनाला मुरड घातली. तरीही विदेशात जाण्यासाठी लागणार्या पूर्वपरीक्षा देण्याचा त्याचा रतीब सुरूच होता. याच ईर्षेतून नवनव्या शब्दांची ओळख व्हावी, यासाठी वयाच्या १७व्या वर्षांपासूनच विविध इंग्रजी दैनिके व इतर माध्यमांमध्ये येणारी शब्दकोडी सोडवण्याचा छंद मंगेशला जडला. या शब्दकोड्यांच्या खाली शब्दकोडे बनवणार्याचे नाव असते. एक वाचक म्हणून पाहताना एक दिवस आपलेही नाव असेच यावे, असे मंगेशला वाटे. तेव्हापासून तो या शब्दकोड्यांच्या प्रेमात पडला.
‘इंजिनिअरिंग’ला शिकत असताना तर, वर्गात शब्दकोडे सोडवतो म्हणून अनेकदा प्राध्यापकांनी त्याला वर्गाबाहेरचा रस्ता दाखवला अन् हाच तरुण आज अमेरिकेसारख्या महासत्तेला कोड्यात टाकण्याचे दिव्य करून दाखवतोय. नोकरीच्या धावपळीतही त्याने शब्दकोड्यांच्या छंदाकडे दुर्लक्ष केलेले नाही. २०१७ साली अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी मंगेशने तयार केलेले शब्दकोडे प्रसिद्ध झाले होते. जगातल्या सर्वांत जुन्या आणि बड्या दैनिकात शब्दकोडे प्रसिद्ध होणारा तो पहिलाच भारतीय ठरला. याचे सार्यांनाच अप्रुप वाटले. किंबहुना, या शब्दकोड्यांमुळे मंगेश घोगरे या नावाची नोंद विकिपिडीयानेही घेतली असून शब्दकोडे हीच माझी जागतिक ओळख बनल्याचे तो अभिमानाने सांगतो.
राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५०वी जयंती, अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन, योग दिवस आदी निमित्ताने अमेरिकेच्या नामांकित ‘द न्यूयार्क टाईम्स’, ‘लॉस एन्जील्स टाईम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आदी वृत्तपत्रांत मंगेशची शब्दकोडी प्रसिद्ध झाली आहेत. नुकतेच भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या ‘योग’ विषयावर बनवलेले शब्दकोडे ‘लॉस एन्जिलिस टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे. भारताच्या प्राचीन आरोग्य संस्कृतीची ओळख असलेल्या योगावर समस्त अमेरिकनांना एका भारतीय युवकाने कोडे घालण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. महासत्ता असलेल्या देशातील नागरिकांमध्ये भारतीय योगाचे महत्त्व कसे ठसवू शकतो, याबाबत विचार करताना मला योग विषयावर कोडे बनविण्याची कल्पना सुचली आणि वर्षभर केलेल्या प्रयत्नानंतर ती प्रत्यक्षात साकारल्याचे मंगेश सांगतो. आतापर्यंत विविध विषयांवरील १३ शब्दकोडी त्याने बनवली आहेत.
शब्दकोडे अर्थांत ‘क्रॉसवर्ड’ बनवून अमेरिकनांना सोडविण्याचे आव्हान देणार्या मंगेश घोगरे याचा ‘रोटरी क्लब’ तसेच, विविध संस्था व माध्यमांच्या व्यासपीठावर सन्मान झाला आहे. मुंबईतील काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शने, सेमिनार्स तसेच कार्यशाळाही घेतल्याचे तो सांगतो. जगातील सर्वांत मोठी क्रॉसवर्ड टुर्नामेंट असलेल्या ’अमेरिकन क्रॉसवर्ड पझल टुर्नामेंट’मध्ये मंगेशला परीक्षक म्हणून बोलवले जाते. याशिवाय इंग्रजी दैनिकांमध्ये याच विषयावर स्तंभलेखनही केल्याचे तो सांगतो.
जगात कोडे सोडविणारे बरेचजण आहेत, परंतु बनविणारे फार कमी आहेत. अमेरिकेत तर शब्दकोडी बनवणार्या अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे मंगेशच्या शब्दकोड्याला वेगळे महत्त्व आहे.
‘लॉस एन्जिलिस टाईम्स’हे वृत्तपत्र शब्दकोड्यांच्या माध्यमातून भारतातील नामांकित वृत्तपत्र ‘द टाईम्स ऑफ इंडिया’सह ३०० वृत्तपत्रांना जोडले गेलेले आहे. त्यामुळे भारतात ‘टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेले शब्दकोडे तीन महिन्यांपूर्वी ‘लॉस एन्जलिस टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेले असते. विविध क्षेत्रात अभ्यास असलेल्या व्यक्ती ‘क्रॉसवर्ड’ बनवून वाचकांना विचार करायला भाग पाडतात. १०० वर्षांहून अधिक काळ ‘क्रॉसवर्ड’ची परंपरा असलेल्या या देशातील वाचकांना आपल्या ‘क्रॉसवर्ड’ची भुरळ घालण्यास भारतीय मंगेश घोगरे याला यश आले आहे.
शब्दकोडे म्हणजे निव्वळ टाईमपास असं मानलं जातं, हा रिकामटेकड्यांचा उद्योग... अशीही भलावण केली जाते. पण, बुद्धीला चालना देणारा शब्दकोड्याचा हा छंद आगळा आहे, या व्यासपीठाचा उपयोग आपल्या देशाला कसा होईल ? याचा विचार सातत्याने करीत असल्याचे मंगेश आवर्जून सांगतो. आजकालची तरुणाई मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी जाताना दिसते. पण, तुम्ही जे कराल त्यात सातत्य ठेवा. निष्ठेने परिश्रमपूर्वक काम केल्यास यश दूर नाही, असा संदेश तो या युवावर्गाला देतो. मेंदू तल्लख करणारे शब्दकोडे बनवणे हीदेखील एकप्रकारे समाजसेवाच आहे, असे मानणार्या मंगेशला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!