सामाजिक कार्यासाठी ‘युनायटेड’

    13-Sep-2022   
Total Views |
sagar matale
 
 
 
नाशिकच्या सागर मटाले यांनी महाविद्यालयीन जीवनात आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेने ‘युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन’ची स्थापना केली. अशा या समाजसेवेसाठी ‘युनायटेड’ सागर यांची ही कहाणी...
 
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘नो युअर आर्मी’ हे नाशिक येथे भारतीय नौदलातील शस्त्रांचे आयोजित प्रदर्शन अत्यंत माहितीपूर्ण ठरले. सुमारे दहा लाख नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत देशाचे लष्करी सामर्थ्य जाणून घेतले. या प्रदर्शनासाठी ‘युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन’चे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यानिमित्ताने...
 
 
सागर मटाले यांना विद्यार्थीदशेपासून ‘समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो’ या भावनेने कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. त्यांच्या पालकांनीही सागर यांच्या या भावनेला प्रोत्साहन दिले. समाजात घडणार्या विसंगती, खोटेपणा, भ्रष्टाचार आणि पर्यावरणाची हानी पाहून सागर यांचे मन विषण्ण होई. त्यातच भारतीय संरक्षणदलाचे त्यांना विलक्षण आकर्षण होते.
 
 
त्यामुळे जवानांसाठी आपण काहीतरी करावे, असे त्यांना प्रारंभीपासून वाटे. निसर्गदत्त नेतृत्वगुण, शांत स्वभाव, मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे सागर तसे मित्रांमध्येही लोकप्रिय होतेच आणि त्यांच्या या समाजकार्याला अनुकूल स्वभावामुळे पुढे त्यांच्या सामाजिक जाणिवांनाही धुमारे फुटत गेले. स्थापत्त्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सागर मटाले यांनी वर्गणी गोळा करुन शिवजयंती साजरी केली.
 
 
त्यावेळी काही निधी शिल्लक राहिला. तेव्हा त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी, ‘हा निधी सामाजिक कार्यासाठी खर्च केला, तरच शिवजयंती खर्या अर्थाने साजरी होईल,’ असे सांगितले. त्यातून या तरुण समूहाला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. २०१४ मध्ये सागर मटाले यांनी त्र्यंबकरोडवरील श्रीगार्डा आश्रमातील विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असलेले फर्निचर तयार करुन दिले आणि इथूनच ‘युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन’ची पायाभरणी झाली.
 
 
त्यानंतर या चमूने अत्यंत भरीव कामगिरी करत अंधशाळेसाठी निधी संकलन, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांसाठी काम करणार्या ‘नाम फाऊंडेशन’ला निधी गोळा करून देणे, उरी हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबीयांकरिता निधी संकलित करुन मदत करणे, १९७७च्या पाकिस्तान, तसेच १९९९च्या कारगील युद्धातील जखमी, अपंग सैनिकांना कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप करणे अशी सामाजिक कार्ये अव्याहतपणे सुरू ठेवली आहेत.
 
 
विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या गटाला आता अधिकृत नाव आणि ओळखीची गरज होती. म्हणून सागर मटाले यांनी २०१९ मध्ये ’युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन’ची नोंदणी करुन कायदेशीर अस्तित्वाचे कोंदण दिले. त्यानंतर संस्थेतील पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध रुपात यशस्वी करुन संस्थेचे कार्य उंचीवर नेले. दरम्यान, ‘कोविड’च्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये पहिले ’लॉकडाऊन’ लागले.
 
 
त्यावेळी अचानक लागलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मुंबईहून अनेक लोक, कामगार पायी राज्याच्या विविध जिल्ह्यांत आपल्या गावी गेले. त्या लोकांना मोठ्या कष्टांचा सामना करावा लागला. त्यावेळी ‘युनायटेड वुई स्टॅण्ड फाऊंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात देशातील पहिली ‘कोविड’ विशेष रेल्वे नाशिकहून सोडण्यात आली.
 
 
त्यावेळी जवळच्या जिल्ह्यांतून अनेक लोक नाशिकमधून रेल्वेतून गावी जाता येईल, या अपेक्षेने आले. परंतु, येथे रेल्वे नव्हत्या आणि अपेक्षेने आलेले लोक नाशिकमध्येच अडकून पडले. त्यावेळी त्यांना जेवण देण्याचे मानवतेचे काम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अनेक संकटांवर मात करून केले. हे करत असताना या विद्यार्थ्यांनी आपले करिअर, अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही, हे विशेष.
 
 
कुठलीही संस्था सुरु केली की, पैशांची चणचण भासते. मात्र, या संस्थेतील विद्यार्थी कुठलाही उपक्रम हाती घेताना त्याची कार्यपद्धती, त्यासाठी लागणारा खर्च याचे अंदाजपत्रक समाजमाध्यमांवर टाकतात आणि मग लगेच यशाशक्ती मदत करणारे त्यांना निधी देतात. आजवर ८०० हून अधिक सदस्य संस्थेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करत आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील ‘सिटी सेंटर मॉल’ येथे भारतीय लष्कराचे सामर्थ्य दाखवणारे प्रदर्शन प्रचंड चर्चेचा विषय झाला. सुमारे दहा लाख नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेणे, जागा ठरवणे, यासाठी अभूतपूर्व परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी करुन दाखवला.
 
  
येणार्या काळात ‘टेरिटोरियल’ सैनिकांसाठी निधी गोळा करुन त्यांना व्यवसाय, धंदा सुरू करुन देण्यासाठी संस्थेचे कार्य सुरू आहे. त्यासाठी नाशिकमधील ३४ कुटुंबांची यादीही त्यांनी मिळवली असून निवृत्त झालेल्या ‘टेरिटोरियल’ सैनिकांना कुठलेही निवृत्ती वेतन नसते. त्यांच्या चरितार्थासाठी काम करण्याचा संस्थेचा मानस आहे. तसेच, भविष्यात भारतीय वायुदल, नौदल आणि लष्करांचे एकत्रित असे भव्य प्रदर्शन भरवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असणार आहे. सागर मटाले यांनी विधी शिक्षणासाठी प्रवेश घेतला असून न्यायदानात योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.
 
सागर मटाले आणि त्यांनी सुरू केलेल्या ‘युनायटेड वुई स्टॅण्ड’ या ग्रुपला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा...
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची