आपण सगळे घाईघाईत उतावीळ होऊन जीवन का जगतो आणि आपले आयुष्य वाया का घालवतो? ज्यात जीवन जाणवत नाही, ते जगायचे तरी कसे? जीवनाच्या प्रत्येक क्षणाची जाण बरेच काही देऊन जात असते, ते क्षण जसेच्या तसे नैसर्गिकपणे जगता येत नसतील, तर त्याला जगणं तरी कसे म्हणायचे? हेन्री डेव्हीड थोरो यांनी जीवनाविषयी खूप सुंदर शब्दांत वर्णन केले आहे. आपले जीवन खूप मूल्यवान आहे. फक्त जीवन नाही, तर प्रत्येक दिवस आणि मिनीट आणि क्षण our lives are so precious not just 'life' but every single day and moment.' थोरोचे हे शब्द आणि वॉल्डन पॉण्डची (walden pond)ची प्रतिमा जिथे त्याने ‘जीवनात काय शिकावयाचे आहे, ते सगळे शिकले’ हे शब्द आपले डोळे उघडून आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात कशी करायला पाहिजे, हे शिकवितात वा त्याची आठवण करून देतात. प्रत्येक क्षणांत जीवन डोकावत असतं, फुलत असतं. आपण आपल्या स्वत:च्या आयुष्यात जे-जे पूर्वी केलेले सगळे पूर्ववत करू शकत नाही. आपल्या बिखरलेल्या प्रेमाला पुन्हा संजीवनी देऊ शकत नाही.
‘कार्प डायम’ (carpe diem) या लॅटिन म्हणीनुसार प्रत्येक दिवस हा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, असे मानून जगणे. जगण्यालायक सुंदर जीवन निर्माण करायचे झालेच, तर एक महत्त्वाची गोष्ट माणसाला करता आली पाहिजे, ती म्हणजे, निवड, चॉईस. तुमचा भूतकाळ किंवा वर्तमान काहीही असो, पण तुम्हाला ‘कदम कदम बढाए जा’ या उक्तीनुसारआपण पुढे जाण्यासाठी मार्ग निवडू शकतो. तुम्हाला अडचणी नाकारून सकारात्मक अनुभवावर लक्ष केंद्रित करता येईल का? तुमच्या मनात कदाचित ‘मी किती सहन करत आहे, हे कुणाला माहीत,’ असा विचार घोळत असेल. पण, एक लक्षात घ्यायला पाहिजे की, तुम्ही संकटकाळात असाल किंवा आनंदाच्या काळात असाल, तरीही पुढची पायरी प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल कसे वाटते किंवा जीवनाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन कसा असावा, हे तुमच्याशिवाय दुसरे कोणी नियंत्रित करू शकत नाही.
आपल्या जगण्यालायक सुंदर जीवनावर लक्ष केंद्रित करायचे असल्यास पहिली गोष्ट विकसित करायची असते, ती म्हणजे, आपला दृष्टिकोन. आपल्या सामान्य जीवनात लोक ज्या सर्वसाधारण गोष्टीकडे समस्या म्हणून पाहतात, त्या गोष्टींबद्दल आपण पुनर्विचार कसा करायचा किंवा आपला दृष्टिकोन कसा बदलावयाचा, याची काही उदाहरणं आपण पाहूया. एखादी व्यक्ती वयोवृद्ध होत आहे, अशावेळी आपल्या पिकत जाणार्या केसांबद्दल व चेहर्यावर निर्माण होणार्या सुरकुत्यांबद्दल त्याला तिरस्कार वाटायला लागतो. आपल्या हातून वेळ निसटून जात आहे.
त्यामुळे वृद्धत्वाचा तिरस्कार तर वाटतोच, पण आपण मागे वळून पुन्हा वेळेला नियंत्रित करू शकू का? पुन्हा तारुण्यात शिरू शकू का? या विचाराची रुंजी मनात होत राहते. पण, या नकारात्मक विचारांच्या पिंजर्यातून बाहेर यायचे असेल, तर सकारात्मक विचारांचा भिन्न दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. ‘मी माझ्या जीवनाचा पूर्ण अनुभव घेऊ शकणारा भाग्यवान माणूस आहे. माझ्या पांढर्या केसांत आयुष्याचा अमाप आणि प्रगल्भ अनुभव दडलेला आहे. माझ्या चेहर्यावरील सुरकुत्यांमध्ये मी प्रसन्नपणे हास्याचा अनुभव घेत होतो, याचे रहस्य दडलेले आहे,’ असे विचार जीवन समृद्ध करतात.
कधीकधी असाच एक दुर्भागी नकारात्मक विचार अनेक लोकांना सतावत असतो. तो म्हणजे, माझ्या घराची किती दुर्दशा झाली आहे, घर कसे गोंधळाने भरलेले आहे, अस्ताव्यस्त झालेले आहे, घरातील प्रत्येक जण आपापल्या दुनियेत वावरत आहे. अशात तुम्ही खूप आजारी असाल, तर तुम्हाला वाटेल की, माझ्या कुटुंबाला माझी किंवा माझ्या गरजांची अजिबात जाणीव नाही. त्यांना माझी काळजी नाही, हा विचार खरेतर वेदनादायी आहे. हवालदिल करणारा आहे.
पण, या सगळ्या परिस्थितीत भिन्न दृष्टिकोन असणारा सकारात्मक विचार करता येण्यासारखा आहे. तो म्हणजे, माझे गोंधळलेले घर माझ्या कुटुंबातील व्यक्ती किती व्यस्त आहेत, याचे द्योतक आहे. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टीत गुंतलेला आहे. मी या सगळ्या भरलेल्या घरातील गोंधळाचा आनंद घेईन, धावपळ आहे. पण, त्याबरोबर घरात विधायकता नांदत आहे. कदाचित ते जेव्हा शांत होईल, तेव्हा मला ते रिकामे वाटेल. आज ते भरलेले घर आहे, हे खरेतर माझे महद्भाग्य आहे.
जीवनात आपल्याला जे जे हवे आहे, ते आपण मिळवू शकत नाही, पण आपण अनेक अशा गोष्टी वा कृती करु शकतो, ज्या आपल्याला हव्या असणार्या, पण मिळू न शकणार्या गोष्टीइतका समान अनुभव देऊ शकतात. जर आपण अशा ठिकाणी वा अशा परिस्थितीत असू, जी आपल्यासाठी आनंददायी नाही, तर ती परिस्थिती आपण कशी बदलू शकू, याचा विचार करायला हवा. जर एखाद्याची स्वप्ने मोठी असतील, तर ती स्वप्ने प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपण काय योजना बनवू शकतो? तुमचे स्वत:चे नशीब बनवायचे म्हणजे काय करायचे असते? आपण कसे विचार करू शकतो आणि आपल्यासाठी उपयुक्त ठरणारे निर्णय कसे घेऊ शकतो, याची निवड आपल्याला करता यायला हवी. आयुष्य लहान आहे आणि आपण ते फक्त एकदाच जगतो. अशावेळी प्रत्येक क्षणाचा पुरेपूर मनसोक्त फायदा घ्यायचा, तर जीवन जगायला शिकायला पाहिजे.
डॉ.शुभांगी पारकर