गेल्या आठवड्यात ‘अॅमेझॉन रेनफॉरेस्ट डे’ साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर या जंगलाची नोंद का केली जाते? ब्राझीलमधल्या ‘अॅमेझॉन वर्षावना’चे पर्यावरणीय महत्त्व जगाच्या पटलावर मांडले जाते. तसेच, महाराष्ट्रातील जैवविविधता संपन्न अशा पश्चिम घाटांची नोंद जागतिक पातळीवर होण्यासाठी आपल्याला काय करता येईल, याचा ऊहापोह करणारा हा लेख...
आज आपण ‘अॅमेझॉन’ नावाच्या एका अद्भुत वर्षावनाबद्दल जाणून घेणार आहोत आणि सोबतच आपल्या पश्चिम घाट पर्वत शृंखलेचेदेखील महत्त्व जाणून घेऊ. पण, आज अचानक ‘अॅमेझॉन’ का? हा प्रश्न तुम्हा सगळ्यांनाच पडला असेल. जगभर दि. 5 सप्टेंबर ते दि. 8 सप्टेंबर दरम्यान ‘अॅमेझॉन रेनफॉरेस्ट डे’ साजरा केला जातो. खरंच ‘अॅमेझॉन’ इतकं महत्त्वाचं जंगल आहे का?
‘अॅमेझॉन’ हे जगातील सर्वात मोठे ‘रेनफॉरेस्ट’ अर्थात वर्षावन आहे, हे जंगल तब्बल 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात व्यापलेले आहे. ‘अॅमेझॉन’ वर्षावन हे दक्षिण अमेरिकेत स्थित असून, ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनाम आणि फ्रेंच गयाना या देशांमध्ये पसरलेले आहे. ‘अॅमेझॉन’ वर्षावन सुमारे 55 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे आणि पृथ्वीवरील सर्वज्ञात प्रजातींपैकी अंदाजे दहा टक्के प्रजाती या वर्षावनात आढळतात. ‘अॅमेझॉन’ वर्षावनात अंदाजे 390 अब्जपेक्षा जास्त झाडे आहेत, ज्यात 16 हजारांहून जास्त प्रजाती सापडतात. पण मनुष्याच्या कृत्याने या वर्षावनाची बेफाम कत्तल होत आहे. अनियंत्रित जंगलतोडीचा वेग आणि इतर हवामानातील बदलांमुळे ‘अॅमेझॉन’च्या क्षेत्रफळातकमालीची घट झाली आहे. संशोधन सांगते की 2030 पर्यंत ‘अॅमेझॉन’मधील 30 टक्क्यांहून अधिक झाडे नष्ट झालेली असू शकतात.
पण ‘अॅमेझॉन’ जतन करणे का महत्त्वाचे आहे? ऍमेझॉन ‘रेनफॉरेस्ट’ हे आपल्या ग्रहावरील जैविक दृष्ट्या सर्वात वैविध्यपूर्ण परिसंस्थांपैकी एक आहे ज्यात हजारो सस्तन प्राणी, कीटक, पक्षी आणि मासे राहतात. हे वन, एक प्रचंड कार्बन सिंकदेखील आहे, ज्यामध्ये एकूण 90 - 140 अब्ज टन कार्बन सामावून घ्यायची ताकद आहे. निसर्गातून व वातावरणातून कार्बनडायॉक्साईड काढून घेऊन ‘अॅमेझॉन’चे वर्षावन स्थानिक आणि जागतिक हवामान स्थिर ठेवण्यास मदत करते. ‘अॅमेझॉन’च्या नाशामुळे वातावरणातील कार्बन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि तसेच अनेक प्रजाती बेघरदेखील होतील. जागतिक तापमानवाढीच्या काळात, जेव्हा ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची धोक्याची घंटा निरंतर वाजते आहे, ‘अॅमेझॉन’सारखे जंगल आपण गमावणे, यासारखी चूक नाही. ‘अॅमेझॉन’चा होणारा नाश सूचित करतो की, सध्याच्या मानवी क्रियाकलापांचा पृथ्वीच्या सर्वात महत्त्वाच्या परिसंस्थांवर मोठा नकारात्मक प्रभाव होत आहे.
‘अॅमेझॉन’ हे केवळ वन्यजीवांसाठीच घर नाही, तर 34 दशलक्षांहून अधिक लोक ‘अॅमेझॉन’मध्ये राहतात आणि जगण्यासाठी त्याच्या संसाधनांवर अवलंबून आहेत. ब्राझील व इतर दक्षिण अमेरिकेतील देशांतील सरकारी आणि आर्थिक परिणामांमुळे ‘अॅमेझॉन’ला ‘लीगल अॅमेझॉन’ नावाच्या क्षेत्राद्वारे मर्यादित केले जाते. ‘सुपरिटेंडन्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅमेझॉन’द्वारे 1966मध्ये त्याची नोंद करण्यात आली होती. 2008मध्ये ‘अॅमेझॉन’ला जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक म्हणून ‘शॉर्ट-लिस्ट’ करण्यात आले होते. पण दु:ख या गोष्टीचं होतं की, आपण या परिसराची समृद्धता ओळखतो, तरीही या समृद्ध वर्षावनाचा विनाश थांबवू शकलो नाही. 1970 पूर्वी ब्राझीलियन ‘अॅमेझॉन’ जंगलाने सुमारे चार दशलक्ष चौरस किलोमीटर व्यापले होते. तेव्हापासून सुमारे 20 टक्के आपण गमावले आहे. अर्थात, फक्त 50 वर्षांत मानवतेने एकचतुर्थांश नैसर्गिक सौंदर्य नष्ट केले आहे.
‘अॅमेझॉन’मध्ये जंगलतोड करण्याचे मुख्य कारण मानवी वस्ती आणि जमिनीचा विकास आहे. 1991 ते 2000 दरम्यान, ‘अॅमेझॉन’ जंगलाचे एकूण क्षेत्रफळ, पशुधन आणि रस्त्यांसाठी 4 लाख, 15 हजार वर्ग किमी वरून 5 लाख, 87 हजार वर्ग किमींपर्यंत वापरले वाढले आहे. हे क्षेत्र भारतातील आंध्रप्रदेश राज्याइतके आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे 1990 ते 2003 दरम्यान ‘अॅमेझॉन’मधील जंगलतोडीचा वार्षिक दर वाढला. 2004 पासून 2012 पर्यंत, वेगात कमालीची घट झाली होती खरी, पण ऑगस्ट ते जुलै 2013 दरम्यान, जंगलतोडीचा वेग पुन्हा वाढू लागला व यात तब्बल 92 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
दुर्दैवाने, तो वेग अजूनही वाढत आहे. याला इतर देशांचा सहभाग, तसेच कायदे आणि राजकीय निर्धार कारण आहे. बोलीव्हियात जंगलतोंडंले ते त्याचे परिणाम दुःखद आणि भयावह असू शकतात. यासाठीच, जागतिक पातळीवर ‘अॅमेझॉन रेनफॉरेस्ट डे’ साजरा केला जातो.
हे झाले ‘अॅमेझॉन’चे! यात नक्कीच वाद नाही की, ‘अॅमेझॉन डे’सारखा उपक्रम हा स्तुत्य आणि मानवतेच्या हिताचाच आहे. पण आपल्याकडे भारतातदेखील असेच एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. ते म्हणजे, पश्चिम घाट पर्वत शृंखला. पण ‘सह्याद्री दिवस’ किंवा पश्चिम घाट दिवस का नसावा?
सह्याद्रीचे महत्त्वसुद्धा भारतासाठीच नाही, तर संपूर्ण सृष्टीसाठी अनन्यसाधारण आहे. हिमालय पर्वतांपेक्षा जुनी, पश्चिम घाटाची पर्वत शृंखला, असंख्य जैवभौतिक आणि पर्यावरणीय प्रक्रियांसह अत्यंत महत्त्वाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व करते. या परिसरातील उच्च पर्वतीय वनपरिसंस्था भारतीय मान्सून हवामान पद्धतीवर प्रभाव पाडते. प्रदेशातील उष्णकटिबंधीय हवामान नियंत्रित करणारीही परिसंस्था, पृथ्वीवरील मान्सून प्रणालीचे एक उत्तम उदाहरण सादर करते. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात नैऋत्येकडून वाहणार्या पावसाने भरलेल्या मान्सूनच्या वार्यांना रोखून हे घाट मुख्य अडथळा म्हणून काम करतात. पश्चिम घाटात जैविक विविधता आणि स्थानिकता यांचा अपवादात्मक उच्च स्तर आहे आणि जैविक विविधतेच्या जगातील ’उत्तम ठिकाणांपैकी एक’ म्हणून ही पर्वत प्रणाली ओळखली जाते.
पश्चिम घाटातील जंगलांमध्ये कुठेही नसलेल्या विषुववृत्तीय उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांचे काही सर्वोत्तम उदाहरणे समाविष्ट आहेत. जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या किमान 325 प्रजाती पश्चिम घाटात आढळतात. पश्चिम घाटातील जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या जीवांमध्ये 229 वनस्पती, 31 सस्तन प्राणी, 15 पक्षी, 43 उभयचर, पाच सरपटणारे प्राणी आणि एक माशाची प्रजाती आढळते. या एकूण 325 जागतिक स्तरांवर धोक्यात आलेल्या प्रजातींपैकी 129 प्रजाती असुरक्षित, 145 धोक्यात आणि 51 संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत केल्या गेलेल्या आहेत.
उच्च भूवैज्ञानिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यविषयक मूल्ये असलेले व जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी जागतिक महत्त्व असलेला या प्रदेशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. सुमारे 1 लाख, 40 हजार वर्ग किमी परिसरात पसरलेले हे घाट केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधून जातात. वैज्ञानिकदृष्ट्या बघता, पश्चिम घाट मानवतेच्या पूर्व काळाचे व तत्कालीन पर्यावरण व भूरचनेचेदेखील दाखले देते.
या व अशा अनेक गोष्टींनी हे सिद्ध होते की, पश्चिम घाट प्रणालीदेखील ‘अॅमेझॉन’ वर्षावनासारखीच महत्त्वाची आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या 100 वर्षांत 35 टक्के पश्चिम घाट पर्वत शृंखलेचा नाश झालेला आहे. मानवी क्रियाकल्पांनी या परिसराचा नाश होतो आहे. अनियंत्रित वृक्षतोड, झाडे कापून त्या जमिनीचा शेतीसाठी उपयोग, बर्याच मोठ्या शहरांमध्ये शहरीकरणानेदेखील भरपूर प्रमाणात पर्वतांचा नाश होतो आहे.
याच नाशामुळे आपण नजीकच्या काळात वाढलेल्या भूस्खलनाच्या घटना, अनियमित पाऊस, अचानक होणार्या ढगफुटी व अतिवृष्टीसारख्या घटना तसेच सरासरी तापमानात झालेली वाढ अनुभवत आहोत. ‘राष्ट्रीय पश्चिम घाट दिवस’ हा उपक्रम या नाशाच्या विरोधात जागरूकता निर्माण करणारे एक महत्त्वाचे पाऊल होऊ शकते. आपल्यापैकी कित्येकांना आपले पश्चिम घाट किती महत्त्वाचे आहेत व आंतरराष्ट्रीय स्तरावर का ओळखले जातात, हेदेखील ठाऊक नसावे. पण या लेखानंतर, आपणदेखील सह्याद्री संवर्धनासाठी आणि पश्चिम घाट पर्वत प्रणालीच्या रक्षणासाठी जागृत व्हाल, असे वाटते.