दाऊद आणि याकूबचे हस्तक असण्यापेक्षा मोदीशहांचे हस्तक असणं केव्हाही चांगलं!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंचा टोला
12-Sep-2022
Total Views | 62
150
छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथील आज सभेदरम्यान प्रचंड संख्येने लोकांची उपस्थिती दिसली. यावेळी, "बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती ? याचं उत्तर आजची विराट सभा आहे." असे मुख्यमंत्री म्हणाले. "ही पैशाने जमवलेली माणसं नाहीत ही माणसं प्रेमाने आले आहेत. रावसाहेब दानवे, भागवत कराड ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन घेतलेल्या निर्णयाला लोकांनी दिलेल्या पसंतीमूळे ही गर्दी आहे." असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गर्दीसाठी पैसे वाटप केल्याचा मुद्दा खोडून काढला.
"जे होणार असेल ते बोला जे होणार नसेल तर बोलू नका. मी दिलेला शब्द पाळतो. पळता येणार नाही असा शब्द देत नाही. जेव्हा अन्याय झाला, मुस्कटदाबी झाली ते संपूर्ण आपल्याला माहिती आहे. ही लढाई सोपी नव्हती. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि विरोधकांकडे गेलो. ग्रामपंचायत सदस्यही असा निर्णय घेताना १०० वेळा विचार करतो. मात्र ५० आमदारांनी असा धाडसी निर्णय घेतला."
"हे मिशन यशस्वी होण्यात कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद मागे होते. अडीच वर्षाचा वनवास होता. आमचा वनवास तुम्ही संपवला असं लोक मला म्हणाले. लोकांच्या भावना जाणून घेत आपल्याला काम करायचं आहे. हे तुमच्या मनातील सरकार हे शिवसेना भाजप युतीचे सरकार आम्ही स्थापन केले. प्रत्येकाला वाटतं आहे की हा आपला माणूस आहे. हा मुख्यमंत्री आपल्यातील आहे. सकाळी ४ वाजता रस्त्याच्या दुतर्फा लोक पैसे देऊन थांबतात का? मात्र या महाराष्ट्राच्या भल्यासाठी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पसंती दिलीय."
"माझ्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोणतेही अंतर नाही. जेव्हा माणूस आपल्यातील वाटतो तेव्हाच माणसं आमच्यापर्यंत येतात.काही लोक म्हणतात मुख्यमंत्री भलत्या गाठीभेटी घेत आहे. मी कालपर्यंत त्यांच्यापर्यंत जात होतो, आजही जाणं माझं कर्तव्य आहे. माझ्यातील कार्यकर्ता कदापि मारू देणार नाही. अजितदादा सकाळी ६ वाजता उठून काम करायचे. आधी दादा टीका करायचे आता तरीही टीका करत आहे. टीका करणं हा विरोधकांचा धंदा आहे. ताईंना मी माहिती देतो की हा एकनाथ सकाळी ६ पर्यंत जनतेसाठी काम करतो. या कामात कुठलाही खंड मी पडू देणार नाही. टीका करणाऱ्याला कसली चिंता आहे? त्यांना २ मुख्यमंत्र्यांची सवय आहे. त्यांचा रिमोट कंट्रोल आम्ही काढून घेतला आहे, म्हणून त्यांची अडचण झाली आहे. मात्र आम्ही जनतेमध्ये जाणार आणि चांगलं काम करत राहणार." अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
पुढे मुख्यमंत्री म्हणतात, "सभेतील सर्व माणसं आपली माणसं आहेत. काही रोड शो मध्ये खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतात. ही गर्दी प्रेमापोटी आले आहेत.आता बाळासाहेबांची शिवसेना कोण? शिवसेना भाजप युती म्हणून आपण निवडणूक लढवली. लोकांनी युती म्हणून मतदान केलं. दुर्दैवाने आपण करायला नको ते केलं. लोकांशी बेईमानी कोणी केली? जनतेचा विश्वासघात कोणी केला? बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा, हिंदूंशी प्रतारणा कोणी केली याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे." असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.