वर्षा सहल म्हणजे पर्यटकांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. त्यातच यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवाच्या औचित्यावर भारतीय पुरातत्त्व विभागाने ५ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळांवर विनामूल्य प्रवेश जाहीर केला आहे. नागरिकांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आनंद घेता यावा याकरिता ऐतिहासिक स्थळे आणि स्मारकांमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आला आहे.
याचसाठी केंद्र सरकारकडून देशभरातील तब्बल १०० स्मारकांची निवड करण्यात आली आहे. तसेच यात कुलाबा किल्ला, जंजिरा किल्ला, घारापुरी लेणी, रायगड किल्ला इत्यादींचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच या उपक्रमाअंतर्गत भारतीय पुरातत्व खात्याच्या मुंबई विभागातर्फे स्वच्छता अभियान देखील राबविण्यात येणार आहे.